जुलै महिना आला की, हटकून आठवण होते 26 जुलैची … एक आठवण निगडित ‘कारगिल’शी,
दुसरी मुंबईच्या पावसाळी आकांताशी.
कारगिल युद्ध झाल्यापासून ‘कारगिल दिन’ साजरा केला जाऊ लागलाय. खरं म्हणजे ‘साजरा करणे’ हा वाक्प्रचार वापरावासा वाटत नाही. तरीही वापरला जातोच.
तीन वर्षांपूर्वी ‘कारगिल दिना’ला आम्ही दस्तुरखुद्द कारगिलमध्येच होतो. तेथील सैनिकांचे, बटालियन्स इत्यादींचे काही अधिकृत शासकीय कार्यक्रम झाल्यावर सामान्य नागरिकांना त्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली. आम्ही मोठ्या हौसेने त्यांच्याशी संवाद साधला. फोटो काढले. (ते तर पाहिजेतच..) त्यांचे अनुभव ऐकताना अंगावर रोमांच तर उभे राहातच होते, पण मनात अनेक अनुत्तरित प्रश्नांची गर्दीच जास्त झाली होती.
कारगिल काय किंवा त्यापूर्वीच्या, नंतरच्या चकमकी, युद्धं काय… सगळ्याच आपल्या इतिहासाच्या देणग्या. ही रक्तरंजित देणी-घेणी संपणार तरी कधी? कोणत्या अंतापर्यंत चालत राहणार?
आणि या सगळ्याला छेद देणारा एक त्रासदायक प्रश्न….. सैन्य-राजकारण यातील भ्रष्टाचार! (सगळ्यांना व्यापून हा दशांगुळे उरतोच)
सआदत हसन मंटो या प्रसिद्ध उर्दू लेखकाची ‘टेटवाल का कुत्ता’ नावाची एक कथा आहे. भारत-पाकिस्तान सीमेवर फिरणा-या रस्त्यावरील, एका ‘लावारिस कुत्र्या’बद्दलची. बिचा-याला कळत नसतं, आपण हिन्दुस्थानातले की पाकिस्तानातले? ना घर का ना घाट का
अशी अवस्था झालेली असते त्या बिचा-याची. या कथेतील एक सैनिक म्हणतो, “अब कुत्ते को भी हिन्दुस्तानी होना पड़ेगा या पाकिस्तानी।”
शेवटी बिचारा सीमारेषेवर एकदा हिन्दुस्थानी सैन्याच्या दिशेला धावतो मग फायरिंग ऐकून, घाबरून पाकिस्तानी सैन्याच्या दिशेला धावतो. दोन्हीकडच्या सैनिकांना तो शत्रुपक्षातला वाटतो. त्याला मधोमध खेळवत दोन्हीकडून फायरिंग होतं आणि बिचारा तो मुका प्राणी
हकनाक आपला जीव गमावतो. यावर पाकिस्तानी अधिकारी चुकचुकतो आणि बोलतो, “शहीद हो गया बेचारा।”
तर हिंदुस्थानी अधिकारी बोलतो, “वही मौत मरा जो कुत्ते की होती है।”
Must read: केशरी वस्त्रांतील ‘ती’ समोर येते आणि आपल्या भावना व्यक्त करते!!!
कुत्रा हा या कथेतला प्रोटॅगाॅनिस्ट आहे, नायक आहे. फाळणीनंतर आयुष्य विखुरल्या गेलेल्या, उजाड झालेल्या प्रत्येक जिवाचं तो प्रतीक आहे. सिम्बाॅल आहे. फाळणीमुळे कुत्र्यासारखं जगणं आणि कुत्र्यासारखं मरणं अनेक सामान्य जिवांच्याच नव्हे तर कुत्र्यांच्याही नशिबी आलं.
त्यानंतर दोन्ही देशांच्या सैनिकांच्याही. किती जीव गेले असे.
दिल्लीला इंडिया गेटला लागूनच असलेल्या पुढच्या भागात भारत सरकारने एक भव्य असं वाॅर मेमोरियल बनवलं आहे. स्वातंत्र्यानंतर मारेषांवर जितक्या म्हणून चकमकी, युद्धं झाली, त्यामध्ये मृत्यू पावलेल्या, बलिदान दिलेल्या प्रत्येक लहान-मोठ्या सैनिकापासून ते अधिका-यांपर्यंत सर्वांची स्मृतिस्थानं तयार केली आहेत. तिथे असलेल्या मोठ्या काॅम्प्युटर स्क्रीनवर आपण आपल्या माहितीतल्या सैनिकाचं नाव टाईप केलं की, त्याचं स्मृतिस्थान समोर येतं आणि आपल्यातर्फे फुलं वाहिली जातात. सगळं वाचून नि चालून आपण थकतो पण, तिथली मृत सैनिकांची यादी आणि समाधीस्थळं काही संपत नाहीत.
पण हे सगळं का? किती वर्षं? किती पिढ्या चालू राहणार?
तर हे असे कायमचेच अनुत्तरित प्रश्न.
कारगिलमध्ये त्या सैनिकांशी, अधिकाऱ्यांशी बोलता बोलता आजूबाजूला पसरलेल्या महाकाय हिमालयाकडे माझी नजर ओढ घेत होती.
(तसा तो माझा कायमस्वरूपाचा ‘प्रियकर’च आहे.)
किती युगं असा ध्यानस्थ बसलाय कुणास ठाऊक. किती पुराणकथा, दैवतकथा, भौगोलिक बदल, ऐतिहासिक रक्तरंजित युद्घं, घटना, साहित्यातील वर्णनं, चित्रपटातील स्वप्नदृश्यं असे अनंत अनुभव अंगाखांद्यावर घेत माझ्या भारतभूवर पद्मासनात योगसाधना करणारा तो योगी आणि त्याच्या लहरीपणाला झेलत त्याचंच रक्षण करण्यात धन्यता मानून जिवाची बाजी लावणारे आमचे वीर.
हे सगळंच अनाकलनीय. माझे हात नकळतच जोडले गेले.
एक सैन्य-अधिकारी आम्हाला अभिमानाने ती प्रसिद्ध ‘टायगर हिल’ दाखवत होते. आजूबाजूच्या शिखरांवर दिसणाऱ्या भारतीय छावण्या (बंकर्स), शस्त्रं रोखून उभे असणारे भारतीय सैनिक, मराठी बोलायला मिळतंय म्हणून आवर्जून आमच्याशी संवाद साधणारे ‘मराठा बटालियन’चे सैनिक, प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव घेतलेल्या भारतीय सैनिकांचे ‘आँखो देखा हाल’ असं वर्णन, स्तंभावर डौलाने झळकणारा तिरंगा आणि पार्श्वभूमीवर शांतचित्त असणारा तो हिमशुभ्र तपस्वी…
हे आणि बरंच शब्दांच्या पल्याड असणारं असं काही माझ्या इवल्याशा मनात मी कायमचं साठवून ठेवलं. आपलं क्षुद्रत्व समजून घेण्यासाठी अधूनमधून त्या शुभ्र हिमांकित शिखरांचं आणि त्याच्या रक्षणकर्त्यांचं प्रत्यक्ष दर्शन घ्यायलाच हवं, ही खूणगाठ मी त्या वेळी माझ्या मनाशी पक्की केली. नंतरही त्या मराठा बटालियनमधल्या सैनिकांशी आमचा समूह संपर्कात राहिला.
एरवीच्या महानगरीय धावपळीच्या धबडग्यात हे सगळं मागे सरलं जातं खरं. आपलं सुरक्षित कक्षेतलं दैनंदिन रहाटगाडगं सुरूच रहातं. सतत येणा-या सैनिकांविषयीच्या बातम्यांनी अगतिक अस्वस्थता वाढते.
असाच पुन्हा कारगिल दिन येतो नि कारगिलच्या आठवणींभोवती मन घिरट्या घालतं.
प्रियकर हिमालय साद घालतोय असं वाटत राहतं.
————– © डाॅ. निर्मोही फडके.