Home » ऑस्करची बाहुली भारतात येणार का?

ऑस्करची बाहुली भारतात येणार का?

by Correspondent
0 comment
Oscars | K Facts
Share

अवघ्या सोळा मिनिटांच्या बिट्टू या लघूपटानं भारताला ऑस्कर पुरस्काराच्या स्पर्धेत आशेचा किरण दाखवला आहे. बिट्टू हा लघूपट सर्वोत्तम अशा दहा लघूपटांमध्ये निवडण्यात आला आहे. अतिशय सक्षम कथा आणि दिग्दर्शन असलेला बिट्टू हा लघूपट ऑस्करसाठी प्रथम पसंतीचा मानला गेलाय. बिट्टूला Live Action Short Film या कॅटेगरीमध्ये निवडण्यात आलं आहे. भारतातर्फे बिट्टू या लघूपटाबरोबरच जलिकट्टू हा चित्रपटही पाठवण्यात आला होता. या मल्याळम चित्रपटाला अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये दाखवण्यात आले होते. तिथे समिक्षकांकडून गौरवलेला जलिकट्टू ऑस्करच्या शर्यतीत मात्र बाहेर फेकला गेला. त्यामुळे नाराज झालेल्या भारतीयांना बिट्टू मुळे पुन्हा ऑस्करची बाहुली दिसू लागली आहे. 

ऑस्कर पुरस्कार हा सिनेसृष्टीत सर्वाधिक प्रतिष्ठीत असा पुरस्कार मानला जातो. यासाठी भारताकडून मल्याळम चित्रपट जलिकट्टू पाठवण्यात आला होता.  देशभरातील २७ चित्रपटांमधून लिजो जोस पेलीसरी यांनी दिग्दर्शित केलेल्या जलिकट्टूची निवड झाली होती. दक्षिण भारतात खेळल्या जाणा-या एका खेळावर आधारीत असलेला हा चित्रपट अनेक देशी विदेशी समिक्षकांनी गौरवलेला आहे.

या चित्रपटात एन्टोनी वर्गीस, चेम्बन विनोद, सन्थी बालाचंद्रन, जाफर इडूक्की सारख्या दिग्गज कलाकारांनी काम केलं आहे. बॉक्स ऑफीसवर सुपरहीट ठरलेला हा चित्रपट अमेरिका आणि युरोपमध्येही इंग्रजीत डब करुन प्रदर्शित झाला आणि तिथेही त्याला चांगले यश मिळवले. त्यामुळेच फिल्म फेडरोशन ऑफ इंडियाने ऑस्कर स्पर्धेसाठी जलिकट्टू ची निवड केली होती. मात्र जलिकट्टू ऑस्करच्या (Academy Awards) स्पर्धेमध्ये शेवटपर्यंत पोहचू शकला नाही. 

Image result for jallikattu in oscar
जलिकट्टू (Jallikattu)

जलिकट्टूकडून (Jallikattu) अपेक्षित असलेलं यश बिट्टू या लघूपटाच्या पदरात पडेल अशी सध्या चर्चा आहे. या लघूपटानं पहिली फेरी पार केली असून आता तो लाईव्ह अ‍ॅक्शन फिचर फिल्म या विभागात नामांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरने केली आहे. करिष्मा दुबे ने बिट्टूचे दिग्दर्शन केले आहे. बिट्टूमध्ये आरोही पटेल, मेहुल सोलंकी, हेमांश शाह आणि मौलिक नायक यांनी भूमिका साकारल्या आहेत.

एका पहाडी भागातील साधी कथा बिट्टू (Bittu) मध्ये आहे.  बिट्टू आणि चॉंद या दोन छोट्या मुलींची गोष्ट…एक थोडी बिंधास्त…तर दुसरी बुजरी…शाळेमध्ये शिक्षक शिकवतांना या दोघींमध्ये बिनसतं… बिट्टू नाराज होते… मग दोघींमध्ये चक्क मारामारी होते…  बिट्टूला शिक्षा होते…या शिक्षेमुळे मात्र बिट्टू तिच्या जिवाभावाच्या मै्त्रिणीपासून कायमची दूर होते….

अत्यंत ह्दयस्पर्शी अशी बिट्टूची कथा आहे. गावांतील सरकारी शिक्षण व्यवस्था… प्रामाणिक शिक्षक… या सर्वांबाबत या सोळा मिनिटांच्या लघूपटात चांगलाच प्रकाश टाकण्यात आला आहे. स्वतः करिष्मा देव दुबे (Karishma Dube) यांनी बिट्टू ही आपली आणि आपल्या बहिणीच्या जवळ जाणारी कथा असल्याचे सांगितले आहे. बिहारमध्ये झालेल्या शालेय पोषण आहारातील एका दुर्घटनेचा धागा बिट्टूमध्ये गुंफण्यात आला आहे. या लघूपटाच्या कथेसाठी करिश्मा यांनी प्रथम एका एनजीओची मदत घेतली आहे. (Indian Shortfilm bittu shortlisted in oscar 2021 race)

करिष्मा देव दुबे- Karishma Dube

बिट्टूमधील बिट्टू आणि चॉंद ही पात्र पडद्यावर मांडतांना करिश्मानं तिला आणि तिच्या बहिणीला आयडल मानलं आहे.  बिट्टूसाठी सलग आठ दिवसअहोरात्र शूट केल्याचं करिश्मा दुबे यांनी सांगितलं. आता ऑस्करच्या अंतिम दहा लघूपटामध्ये बिट्टूनं स्थान मिळवल्यामुळे त्या कष्टाचं चीज झाल्याचंही करिश्मानं सांगितलं. बिट्टूला आत्तापर्यंत 18 फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवण्यात आलं आहे. यामध्ये बिट्टूला पुरस्कार मिळाले आहेत. शिवाय दिग्दर्शिका करिश्मा दुबेलाही बेस्ट डायरेक्टर म्हणून गौरवण्यात आलं आहे. आता ऑस्करमध्ये बिट्टूचे स्थान कितवे यासाठी 15 मार्चपर्यंत वाट पहावी लागणार आहे. मुख्य ऑस्कर समारंभ 25 एप्रिलला होणार आहे. 

सई बने..


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.