राजकीय क्षेत्रातून एक दुःखद बातमी येत आहे. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे दिल्ली मधील एम्स रुग्णालयात निधन झाले आहे. (Former PM Manmohan Singh Death) ते ९२ वर्षांचे होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी निधन झाले. गुरुवारी संध्याकाळी अचानक बेशुद्ध पडल्याने त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले. (Manmohan Singh)
मनमोहन सिंग ३३ वर्षे खासदार होते. विद्वान, मृदू, मितभाषी, संवेदनशील, अतिशय हुशार अर्थतज्ज्ञ, अभ्यासू, कामसू नेता म्हणून मनमोहन सिंग यांची ओळख होती. मनमोहन सिंग यांनी दोन वेळा भारताचे पंतप्रधानपद भूषवले होते. लोकसभेची निवडणूक न जिंकणारे आणि राज्यसभेचे सदस्य असताना हे पद भूषविणारे ते पहिले पंतप्रधान होते.
देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेले ते पहिले शीख पंतप्रधान होते. २००४ ते २०१४ असे दहा वर्षे ते देशाचे पंतप्रधान म्हणून नियुक्त होते. प्रकृती अत्यावस्थामुळे त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली होती. त्यांच्या निधनामुळे देशाने अतिशय हुशार अशा अर्थतज्ज्ञाला गमावल्याची सगळ्यांचीच भावना आहे.
मनमोहन सिंह यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये देशाला यशाची वेगळीच आणि मोठी उंची मिळवून दिली. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात असे अनेक निर्णय घेतले ज्यांमुळे आजही भारतातील प्रत्येक नागरिक त्यांचा ऋणी आहे. मनमोहन सिंह यांनी १९९१ मध्ये केंद्रीय अर्थमंत्री असताना उदारीकरणाचा (Liberalisation) घेतलेला निर्णय ऐतिहासिक ठरला. त्यांच्या या निर्णयाने देशाच्या अर्थव्यवस्था एका वेगळ्याच उंचीवर गेली.
जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी (Jawaharlal Nehru and Indira Gandhi ) यांच्यानंतर पंतप्रधान म्हणून १० वर्षे देशाचा कारभार संभाळणारे ते पहिलेच नेते होते. २००४ ते २०१४ असे दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते. तसेच १९९८ ते २००४ या काळात ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेही होते.
डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताचे १४ वे पंतप्रधान होते. डॉ. मनमोहन सिंग हे एक विचारवंत आणि अभ्यासक म्हणून ओळखले जातात. त्यांचा कामाप्रती असलेला शैक्षणिक दृष्टिकोन, आणि विनम्र आचरणामुळे ते कायमच चर्चेत असायचे. याशिवाय देशाच्या अर्थव्यवस्थेतील ऐतिहासिक बदलांसाठीही त्यांची ओळख आहे. जाणून घेऊया त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल.
मनमोहन सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी अखंड भारताच्या पंजाब प्रांतातील गह या एका खेड्यात झाला. आता हे ठिकाण पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर हे ठिकाण पाकिस्तानात गेले. डॉ. मनमोहन सिंग यांनी १९४८ साली पंजाब विद्यापीठातून आपले उच्च शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर १९५७ साली त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात प्रथम श्रेणीमध्ये पदवी प्राप्त केली. यानंतर १९६२ साली डॉ. मनमोहन सिंग यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या नफिल्ड महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात डी फील संपादन केली.
डॉ. मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकोनोमिक्समध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. १९७२ मध्ये मनमोहन सिंग हे अर्थ खात्याचे प्रमुख आर्थिक सल्लागार बनले. तर १९७६ मध्ये ते अर्थमंत्रालयाचे सचिव झाले. या काळात त्यांनी युएनसीटीएडी सचिवालयात काही काळ काम केले.
यानंतर १९८७ आणि १९९० या काळात त्यांची जीनिव्हा येथील साऊथ कमिशनच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली. १९८० ते १९८२ त्यांनी नियोजन आयोगाचे सदस्य म्हणून काम केलं. तर १९८२ मध्ये माजी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी (Pranav Mukherjee) यांनी मनमोहन सिंग यांची नियुक्ती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर (Governer) म्हणून नियुक्ती केली.
१९८५ ते १९८७ या कालावधीत मनमोहन सिंग नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. मनमोहन सिंग यांनी १९६४ मध्ये ‘इंडियाज एक्सपोर्ट ट्रेंड्स अँड प्रॉस्पेक्ट्स फॉर सेल्फ – सस्टेन्ड ग्रोथ’ नावाचे पुस्तक लिहिले. त्यांनी अनेक लेखही लिहिले जे अर्थशास्त्राच्या जर्नल्सच्या श्रेणीत प्रकाशित झाले.
डॉ. मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्रालयात अनेक महत्वाची पद भूषवली. यात अर्थ मंत्रालयाचे सचिवपद , नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद, रिझर्व बँकेचे गव्हर्नरपद, पंतप्रधानांचे प्रमुख आर्थिक सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षपद या पदांचा समावेश होता. यानंतर १९९१-१९९६ या पाच वर्षांच्या काळात ते भारताचे अर्थमंत्री होते. हा काळ स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड मानला जातो.
– डॉ. मनमोहन सिंह यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये पाच सर्वात मोठे निर्णय घेतले ज्यामुळे आजही भारताला मोठा फायदा होताना दिसतो. यामध्ये जागतिकीकरण, उदारीकरण आणि खासगीकरण डॉ. मनमोहन सिंह यांनी जागतिकीकरणाचा निर्णय घेतला आणि भारतीय बाजारपेठ जगासाठी खुली केली. परिणामी आर्थिक संकटात सापडलेल्या भारताला याचा मोठा फायदा झाला.
– रोजगार हमी योजना (Rojgar Hami Yojana) बेरोजगारी हे भारतातील सर्वात मोठं संकट होते. आजही यात काही फारसा बदल नसला तरी, डॉ. मनमोहन सिंह पंतप्रधान असताना त्यांनी महाराष्ट्रातील रोजगार हमी योजना राष्ट्रीय स्तरावर नेली आणि मनरेगा म्हणून लागू केली. या अंतर्गत १०० दिवसांचा रोजगार आणि किमान 100 रुपये दिवसाची मजुरी निश्चित करण्यात आली.
– आधार कार्ड (Adhar Card) हे मनमोहन सिंह यांच्या काळात सुरू करण्यात आले होते. मनमोहन सिंहांच्या आधार संकल्पनेचं कौतुक संयुक्त राष्ट्र अर्थात यूएनने केलं होते.
– यूपीए सरकार सत्तेत आल्यानंतर २००५ मध्ये भारत-अमेरिका अणूकरार (India – America Nuclear Agreement) करण्यात आला. या करारामुळे आण्विक क्षेत्रात भारत ही एक मोठी सत्ता म्हणून दबदबा निर्माण करू शकला.
========
हे देखील वाचा : …आणि मनमोहन सिंग अर्थमंत्री झाले
========
– डॉ. मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळातच ‘राईट टू एज्युकेशन’ (Right To Education) अर्थात शिक्षणाचा अधिकाराचा कायदा हा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आहे. याअंतर्गत 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार निश्चित करण्यात आला.
डॉ. मनमोहन सिंग यांना त्यांच्या जीवनात अनेक महत्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. डॉ. मनमोहन सिंग यांना १९८७ या काळात भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. भारतीय विज्ञान कॉंग्रेस मध्ये देण्यात येणारा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी सन्मान, अर्थमंत्र्यांसाठी दिला जाणारा आशिया मनी अवार्ड, केम्ब्रिज विद्यापीठाचा अॅडम स्मिथ पुरस्कार, केम्ब्रिजमधील सेंट जॉन महाविद्यालयात उल्लेखनीय कार्याबद्दल राईट पुरस्कार देण्यात आला.
याशिवाय जपान निहोन कायझाई शिम्बूनसारख्या अनेक संस्थांनी डॉ. मनमोहन सिंग यांना सन्मानित करण्यात आले होते. केम्ब्रिज आणि ऑक्सफोर्डसारख्या अनेक विद्यापीठांकडून डॉ मनमोहन सिंग यांना मानद पदवी प्रदान करण्यात आली.
मनमोहन सिंग यांचा १९५८ मध्ये गुरुशरण कौर यांच्याशी विवाह झाला. मनमोहन सिंग यांना अमृत सिंग, दमन सिंग आणि उपिंदर सिंग अशा तीन मुली आहेत.