आई, बाबा, काका, मावशी, आत्या, मामा, मामी, आजी, आजोबा, दादा, ताई ही नातेवाईकांची जंत्री आपल्याकडे असते. याशिवाय भाऊजी, दीर, भावजय, छोटा भाऊ, धाकटी बहीण, भाचा, भाची, पुतण्या, पुतणी…अशी कितीतरी नाती आपल्या कटुंबात असतात. हा सगळा गोतावळा जमला की, जी काही मजा येते ती कशातही येत नाही. लग्नसमारंभ आणि अन्य कौटुंबिक कार्यक्रमात या गोतावळ्याचीच चर्चा जास्त असते. पण या कुटुंबाची साथ प्रत्येकाला लाभत असते. त्यांच्यामुळे आपल्या पाठिशी कोणीतरी आहे, हा विश्वास असतो आणि सर्वात कधी एकटं वाटत नाही. पण ही जर मंडळी नसली तर आपलं कुटुंबच नाही. अख्या जगात आपण एकटेच असलो तर ही भावनाही नकोशी वाटते. पण सध्या जपानमधील नागरिकांना हिच भावना त्रस्त करीत आहे. तेथील नवीन पिढी लग्न करण्यासाठी उत्सुक नाही आणि लग्न केलेल्या जोडप्यांना मुल नको आहे. तसेच तेथे घटस्फोटांचे प्रमाणही जास्त आहे. परिणामी कुटुंब विभक्त झाली आहेत. अनेकांना एकटं राहण्याची वेळ आली आहे. या एकटे राहण्यातूनच मानसिक रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आता जपानमध्ये (Japan) नातेवाईकांसोबत राहा, असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे. पण नातेवाईकच नाहीत तर राहणार कोणाबरोबर हा प्रश्नही आला आहे. पण याचे उत्तर काही कंपन्यांनी दिले आहे. या कंपन्या चक्क नातेवाईक पुरवतात. जपानमध्ये (Japan) लुप्त होत चाललेल्या कुटुंब व्यवस्थेमुळे आता तेथे नातेवाईंकांचा पुरवठा चक्क कंपन्यांद्वारे करण्यात येत आहे आणि या कंपन्यांकडे ठराविक नातेवाईकांसाठी चांगली मागणही आहे.

जपान, (Japan) या देशाचे नाव समोर आलं की, आठवतं ती तेथील शिस्त. स्वच्छता यासोबत सतत कामात व्यस्त असणारे नागरिक. मात्र आता हेच जपान वेगळ्या गोष्टीसाठी ओळखलं जात आहे. जपानमध्ये जन्मदर सर्वात कमी आहे. काही वर्षात येथे तरुण नावालाही सापडणार नाहीत अशी परिस्थिती आहे. तेथील लोकसंख्या कमालीची कमी होत असून याला लुप्त होत चाललेली कुटुंबव्यवस्था कारणीभूत आहे. जपानमध्ये (Japan) आता कुटुंब ही संकल्पनाच संपली आहेत. जी कुटुंबे आहेत त्यात अगदी दोन-तीन सदस्य राहत आहेत. त्यामुळे तेथील मुलांना काका—काकी, मामा-मावशी अशी नातीच समजत नाहीत. हे समजण्यासाठी आणि एकाकी राहणाऱ्या नागरिकांना सोबत म्हणून आता जपानमध्ये चक्क भाड्यानं नातेवाईक मिळत आहेत. नातेवाईकांचा पुरवठा करणारे अनेक उद्योग येथे सुरु झाले आहेत.
जपानमधील (Japan) या नवीन ट्रेंडबाबत जगभर उत्सुकता आहे. येथील नागरिक आता नातेवाईकांना भाड्याने घेत आहेत. अगदी मुलासाठी आई किंवा वडिलही भाड्यानं मिळत आहेत. एकट्या व्यक्तीसाठी कोणी जीवनसाथी हवा असेल तर तोही जपानमध्ये भाड्यानं उपलब्ध आहे. नातेवाईक पुरवठा करणा-या या कंपन्या बहुराष्ट्रीय कंपन्यांसारखे काम करतात. नागरिकांना वेगवेगळ्या नातेवाईकांसाठी कॅटलॉगमध्ये प्रवेश देण्यात येतो. जशी मागणी तसा पुरवठा असतो आणि तसेच भाडेही आकारले जाते. मग म्हाताऱ्या आई-वडिलांची काळजी घेणारा साथीदार असो की, म्हाताऱ्यांना स्वत:ला तरुण मुला-मुलीचा आधार हवा आहे, असे सगळे पर्याय या कंपन्यांद्वारे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
जपानच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन अँड सोशल सिक्युरिटीच्या आकडेवारीनुसार, जपानची परिस्थिती भयावह आहे. येथे 2040 पर्यंत 40 टक्क्यांहून अधिक कुटुंबांमध्ये एकच व्यक्ती असणार आहे. या व्यक्तीचेही लग्नाचे सरासरी वय उलटलेले असेल. सद्यपरिस्थितीत जपानमध्ये बहुसंख्य कुटुंबात वृद्ध आई-वडील आहेत. त्यांची काळजी घेण्यासाठी कोणीही कुटुंबाचा सदस्य त्या कुटुंबात नाही. त्यामुळे भविष्यात येथे मोठी समस्या निर्माण होणार आहे. काही वर्षापासून जपानमधील नागरिक एकटे राहण्यास प्राधान्य देत आहेत. त्याचा परिणाम म्हणून आता तिथे कुटुंब व्यवस्था जवळपास संपूष्ठात आली आहे. आज जपान हा जगातील सर्वात कमी लोकसंख्या वाढीचा देश आहे. जी लोकसंख्या आहे, त्यांचे वय अधिक आहे. तसेच शहरात राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. जपानी ग्रामीण भागात राहण्यासाठी सरकारतर्फे विविध योजना देण्यात येतात. पण त्याकडे नागरिक दुर्लक्ष करीत आहेत.
=======
हे देखील वाचा : पुराना नव्हे पांडवकालीन पुराण किल्ला…
=======
जपानी (Japan) लोकांमध्ये कामाची प्रचंड क्रेझ आहे. ते स्वतःला खूप व्यस्त ठेवतात. अशा परिस्थितीत, त्यांच्याकडे कुटुंबासाठी वेळ नाही. यामुळे तिथे परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, इथे नागरिक काही तासांसाठी मित्रालाही भाड्याने घेतात. फारकाय जपानमध्ये (Japan) रोमँटिक पार्टनरही भाड्याने मिळतात. एकटे राहणाऱ्या लोकांसाठी नातेवाईकांची सुविधा आता कंपन्यांकडून देण्यात येत आहे. इथे आई-वडील, भाऊ, बहिण काही तासांसाठी फक्त दोन हजार येनमध्ये भाड्याने मिळतात. यातून भविष्यात जपानमध्ये गंभीर कौटुबिंक समस्या निर्माण होणार आहेत.
सई बने