जिहादी वधू म्हणून जिचा उल्लेख करण्यात येतो त्या शमीमा बेगमचा (Shamima) ब्रिटीश नागरिकत्वाचा अपिल पुन्हा एकदा फेटाळण्यात आला. ही बातमी आल्यावर जिहादी वधू म्हणण्यात येणारी शमीमा बेगम नक्की कोण याची चर्चा सुरु झाली आहे. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी 2015 मध्ये ब्रिटनमध्ये रहाणारी ही शमीमा आयएसआयएस या दहशतवादी संघटनेच्या विचारानं एवढी प्रभावीत झाली होती की, तिने ब्रिटनमधून पलायन केले. त्यानंतर शमीमा आयएसआयएस संघटनेत सामील झाली. त्यानंतर आयएसआयएस म्हणजे काय, हे तिला समजले, पण तेव्हा उशीर झाला होता. शमीमावर अनेकवेळा अत्याचार झाले. आता या शमीमाची दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटका झाली असली तरी ती सिरियात अडकली आहे. लंडनमध्ये जन्मलेल्या बांगलादेशी वंशाच्या शमीमा बेगमला सीरियातून परतण्यासाठी ब्रिटिश नागरिकत्वाची गरज आहे. शमीमा बेगमचा ब्रिटन ते सिरिया हा प्रवास तिच्यासारख्याच भरकटलेल्या तरुणांसाठी आरसा दाखवणारा आहे.
तरुण वयात मुलांना दहशतवादी संघटना कशा आपल्या जाळ्यात ओढतात, याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणून शमीमाच्या घटनेकडे पाहिले जाते. ब्रिटनमधील बेथनाल शहरात शमीमा (Shamima) रहात होती. वयाच्या 15 व्या वर्षी ती आयएसआयएसच्या दहशतवाद्यांच्या संपर्कात आली. त्यांच्या विचारानं प्रभावीत झाली. संपूर्ण जगात इस्लामिक राजवट प्रस्थापित करणे हेच आपले उद्दिष्ट आहे. त्यात शमीमा मोठी भूमिका पार पाडू शकते, हे तिच्या मनावर बिंबवण्यात आले. तिच्याशी मैत्री करणा-या दहशतवाद्यांनी तिला सिरीयाला येण्याचा आग्रह धरला. दोन मित्रांसह शमीमा सीरियाला पोहोचली. तिथे गेल्यावर तिचे एका दहशतवाद्याशी लग्न करुन देण्यात आले. तिचा उल्लेख जिहादी वधू असा करण्यात आला. तिचे फोटो दहशतवाद्यांनी अन्य तरुणांना आपल्या संघटनेत आणण्यासाठीही वापरले. शमीमाचा संपर्क ग्लासगो येथील 20 वर्षीय महिला अक्सा महमूद हिच्यासोबत होता. अक्सा ही 2013 मध्ये आयएसआयएस मध्ये सामील होणारी पहिली ब्रिटिश महिला होती. तिनेच शमीमाला सिरियात नेण्यासाठी मदत केली होती. अक्सा- आयएसआयएस च्या अल-खानसा ब्रिगेडची सदस्य होती. या ब्रिगेडतर्फे ब्रिटनमधील तरुणींना दहशतवादी गटात सामिल करुन घेण्यात येत होते. ही सर्व मंडळी सोशल मिडियामार्फत तरुणांच्या संपर्कात होती.
याच गटातर्फे सिरीयात गेल्यावर शमीमा लगेच आयएसआयएस सामील झाली. डच नागरिक असलेल्या यागो रीडिक बरोबर तिचे लग्न झाले. रिडीकही मुस्लिम धर्म स्विकारुन आयएसआयएसमध्ये सामिल झाला होता. त्यानंतर शमीमालाही दोन मुले झाली. पण त्यांचा कुपोषण आणि आजारामुळे मृत्यू झाला. या सर्वांदरम्यान शमीमा (Shamima) अन्य तरुणींना आयएसआयएसमध्ये सामील करण्यासाठी प्रयत्नशील होती. आयएसआयएसचे धार्मिक युनिट अल-हिस्बामध्ये ती सक्रीय होती.
शमीमा आयएसआयएस साठी सुसाइड जॅकेट बनवत असे. ही जॅकेट एकदा घातली की काढता येत नसत. यामार्फत शमीमाच्या जॅकेटनं अनेकांचा बळी घेतला आहे. 2017 मध्ये मँचेस्टर एरिना येथे झालेल्या हल्ल्यात शमीमानंच तयार केलेलं जॅकेट दहशतवाद्यांनी घातले होते. पण नंतर शमीमाला वास्तवाची जाणीव होत गेली. आयएसआयएस सोबत आयुष्य सुखात जगता येईल अशी तिची अपेक्षा होती. पण सिरीयातील वातावरणानं तिचे मन बदलले. 2019 मध्ये शमीमा (Shamima) सीरियातील निर्वासित छावणीत राहू लागली. आपल्या नवजात मुलाला घेऊन ती मीडियासमोर आली आणि ब्रिटनला परत जाण्यासाठी प्रयत्न करु लागली. सोशल मिडियाच्या माध्यमातून तिनं ब्रिटीश सरकारला आपल्याला पुन्हा ब्रिटनमध्ये घ्यावे यासाठी विनंती केली. तसेच मी 15 व्या वर्षी ब्रिटन सोडले तेव्हा काही मित्रांनी माझी दिशाभूल केल्याची कबुलीही तिनं दिली.
=========
हे देखील पहा : पाकिस्तानातील सर्वाधिक Haunted ठिकाण
=========
ब्रिटनमध्ये परत जाण्यासाठी शमीमानं कायदेशीर लढा सुरु केला. स्पेशल इमिग्रेशन अपील कमिशन नंतर तिची केस अपील कोर्टात गेली. मात्र, अपील न्यायाधीशांनी विशेष न्यायाधिकरणाच्या निर्णयाशी एकमताने सहमती दर्शवत शमीमाचे अपील फेटाळून लावले. लंडनमध्ये शिक्षा सुनावताना न्यायाधीश डेम स्यू कार यांनी शमीमानं स्वतःच आयएसआयएस मध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर आयएसआयएसच्या दहशतवादी कृत्यांमध्येही ती सहभागी होती, असे सांगून तिचा अपिल फेटाळून लावला आहे.
शमीमा (Shamima) बेगम सध्या उत्तर सीरियातील निर्वासित छावणीत रहात आहे. तिचे सर्व कुटुंबिय ब्रिटनचे नागरिक आहेत. मात्र आता शमीमाला पुन्हा ब्रिटनमध्ये येण्याचे सर्व दरवाजे बंद झाले आहेत.
सई बने