पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपली असून सर्व क्रीडाप्रेमींचं लक्ष याच स्पर्धेकडे लागलं आहे. टी२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारत ऑलिम्पिकमध्ये काय इतिहास घडवणार, याचीच सर्वांना उत्सुकता आहे. पण भारताने ऑलिम्पिक स्पर्धेचा हा प्रवास कधी सुरू केला. आजपर्यंत भारताने किती मेडल्स जिंकले ? ही स्पर्धा भारतासाठी महत्त्वाची का ?
जगातली सर्वात प्रतिष्ठित अशी ऑलिम्पिक स्पर्धा काहीच दिवसांवर येऊन ठेपली आहे. क्रिकेट वर्ल्ड कप फिव्हर संपलं, विंबलडन संपल, फुटबॉलच कोपा अमेरिका, युरो कप फिव्हरसुद्धा संपल आणि आता जगभरात ऑलिम्पिक सुरू झाल आहे. सर्वांनाच माहित आहे की, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने सात मेडल्स जिंकून आजपर्यंतची सर्वात बेस्ट कामगिरी करुन दाखवली होती. त्यातच एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्समध्येही भारताने आपला डंका वाजवला होता. त्यामुळे यंदा भारताच्या स्टार ऍथलिट्सकडून बरीच अपेक्षा आहे. भारत तसा ऑलिम्पिकमधला डेकोरेटेड देश राहिला नाही, पण भारताने विविध क्रीडा स्पर्धांमध्ये केलेला पराक्रम आजही जगाच्या लक्षात आहे. (Olympic Competition)

ऑलिम्पिक स्पर्धेला १८९६ साली अथेन्समध्ये सुरुवात झाली. या पहिल्या स्पर्धेत केवळ १४ देशांनीच भाग घेतला होता. भारत त्यावेळी ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असल्यामुळे भारताकडून अनेक ब्रिटिश स्पोर्टसपर्सनसुद्धा खेळायचे. त्यामुळेच त्याच्या पुढील १९०० च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील २६ देशांमध्ये भारतदेखील होता आणि महत्त्वाचं म्हणजे याच स्पर्धेत भारताने आपलं पहिलं मेडल जिंकलं.
ट्रॅक अँड फिल्ड ऍथलीट नॉर्मन प्रिचर्ड यांनी २०० मीटर हर्डल्स आणि २०० मीटरमध्ये भारताला २ सिल्व्हर मेडल जिंकून दिले. इथेच भारताच्या मेडल्सचा नारळ फुटला. यानंतर पुढचा मेडल जिंकायला भारताला २८ वर्ष वाट पहावी लागली. त्याकाळी हॉकीमध्ये सर्वात Dominant असलेल्या भारताने १९२८च्या ऍम्स्टरडम ऑलिम्पिकमध्ये पहिल सोनं जिंकल म्हणजे पहिला गोल्ड मेडल ! भारताचा हॉकीमधला हाच सोनेरी प्रवास १९५६ पर्यंत सुरूच राहिला. मेजर ध्यानचंद, लेसली क्लॉडिस, उधम सिंग, रिचर्ड जेम्स, रंगनाथन फ्रान्सिस अशा दिग्गज हॉकिपटूंनी भारताला सलग ६ गोल्ड मिळवुन दिले. (Olympic Competition)
मुळात १९२८ पासून भारत विविध स्पर्धांमध्ये आपले ऍथलिट्स पाठवतच होता. मात्र हॉकी वगळता कशातच यश आलं नाही. पण १९५२ ला मराठमोळ्या पठ्ठ्याने अशी ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली, जी भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली. १९५२च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये भारताने कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी ५७ किलो मेन्स फ्रिस्टाईल प्रकार भारताला स्वातंत्र्यानंतरच आपलं पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक मेडल जिंकून दिलं. स्पर्धेत जर त्यांची फसवणूक झाली नसती, तर त्यांचा निशाणा गोल्डवरच होता. भारताने सिद्ध करून दाखवलं की हॉकी वगळता असेही खेळ आहेत ज्यामध्ये आपण मेडल आणू शकतो.
यानंतर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भारताचा एथलीट मिल्खा सिंग यांच्या रुपात एथलेटिक्समध्ये फायनलपर्यंत पोहोचला होता. १९६०च्या रोम ऑलिम्पिकमध्ये मात्र त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. याच ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा हॉकीमधला सुवर्णरथ थांबला होता आणि पहिल्यांदाच भारत सिल्व्हर मेडल जिंकला. यानंतर पुन्हा १९६४ टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने गोल्ड जिंकला. त्यानंतर १९६८ मेक्सिको ऑलिम्पिक आणि १९७२ म्युनिक ऑलिम्पिकमध्ये भारत हॉकीमध्ये गोल्ड आणि सिल्व्हरपासून घसरत ब्राँझ मेडलवर पोहोचला. १९७६ दरम्यान भारतात आणीबाणी सुरु होती, त्यातच भारताने केवळ २० जणांना स्पर्धेत पाठवलं. त्यामुळे भारताला एकही मेडल जिंकता आला नाही. मात्र १९८० ला हॉकी टिमने पुन्हा एकदा गोल्डवर झेप घेतली. आतापर्यंतच्या ऑलिम्पिक इतिहासात हॉकीमध्ये ८ गोल्ड जिंकणारा भारत पहिला संघ ठरला आणि हा रेकॉर्ड आजही कायम आहे. (Olympic Competition)
यानंतर १९८४, १९८८ आणि १९९२ च्या ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी मेडल्सचा दुष्काळच राहिला. ८४च्या ऑलिम्पिक स्पर्धेत पी. टी. उषा ४०० मी. फायनलमध्ये अवघ्या १ मायक्रोसेकंदने मागे राहिल्या. नाहीतर भारताला आपलं एथलेटिक्समधलं पहिलं वैयक्तिक मेडल नक्कीच मिळालं असतं. भारताला हा दुष्काळ संपवला टेनिसपटू लिएंडर पेसने ! १९९६ सालच्या Atlanta ऑलिम्पिकमध्ये पेसने ब्रॉंझ मेडल जिंकून भारताची मेडल जिंकण्याची उमेद जागवली. यानंतर २००० साली सिडनी ऑलिम्पिकमध्ये भारताच्या धाकड कर्णम मल्लेश्वरीने वेटलिफ्टिंगमध्ये ब्राँझ जिंकून इतिहास रचला आणि ऑलिम्पिक स्पर्धेत मेडल जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. २००४ च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये राज्यवर्धन सिंग राठोड यांनी शूटिंगच्या मेन्स डबल ट्रॅप प्रकारात सिल्व्हर मेडल पटकावलं. शुटींगमधलं हे भारताचं पहिलच मेडल याशिवाय ४४ वर्षांनी भारताने सिल्व्हर मेडलवर आपला शिक्का मारला होता.

२००८ ची बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धा तर अविस्मरणीय ठरली कारण भारताने स्वातंत्र्यानंतर आपलं पहिलं वैयक्तिक सुवर्णपदक जिंकलं. शुटींगमधल्या १० मीटर एअर रायफल प्रकारात अभिनव बिंद्राचा निशाणा गोल्डवर लागला. यावेळी भारतात एकच उत्साह पाहायला मिळाला होता. सर्वच स्तरातून अभिनव बिंद्रा यांचं कौतुक करण्यात आलं. याच स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये विजेंद्र सिंगने ब्राँझ पटकावलं तर रेस्टलर सुशील कुमारनेही ब्रॉंझ मेडल जिंकलं. खाशाबा जाधव यांच्या १९५२ च्या ब्राँझ मेडल नंतर तब्बल ५६ वर्षांनी भारताला रेसलिंगमध्ये पदक मिळाल. बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धा निर्णायक ठरली, कारण इथेच देशवासियांच्या आशा पल्लवीत झाल्या. भारत ऑलिम्पिक स्पर्धेत इतिहास घडवू शकतो, हे सर्वांनाच वाटू लागलं. (Olympic Competition)
यानंतर आली २०१२ ची लंडन ऑलिम्पिक स्पर्धा ! आजपर्यंत भारताने एकाही ऑलिम्पिक स्पर्धेत ३ पेक्षा जास्त मेडल्स मिळवले नव्हते. मात्र या स्पर्धेत भारताने ६ मेडल्स खिशात घालून नवा इतिहास लिहिला ब्रॉंझ पदक जिंकला.सुशील कुमार सलग दोन ऑलिंपिक्समध्ये पदक जिंकली आणि खाशाबा पॅटर्न पुन्हा भारतात आणला. २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताने आजपर्यंतचा सर्वात मोठा चमू पाठवला होता, मात्र यावेळी निराशाच पदरी पडली. भारताला केवळ २ पदकांवरच समाधान मानाव लागलं. एक म्हणजे साक्षी मलिकचं ब्राँझ तर दुसरं पिव्ही सिंधूचं सिल्व्हर… सिंधूला इतिहास घडवण्याची आणि भारताची ऑलिम्पिकमधली सुवर्ण कन्या होण्याची पुरेपूर संधी होती, मात्र अंतिम स्पर्धेत तिसऱ्या सेटमध्ये तिला पराभव पत्करावा लागला आणि भारताला सिल्व्हर मेडल मिळाल.
मेडल जरी मिळाला तरी गोल्डला जास्त मान असतो, त्यामुळे यातूनच शिकून २०२०च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने १२४ ऍथलिट्स पाठवले. आजपर्यंत एवढी मोठी टीम इतिहासात ऑलिम्पिकमध्ये भारताने कधीही पाठवली नव्हती. भारत टोकियोला गेला आणि अजरामर होऊन पुन्हा मायभूमीत आला. या स्पर्धेत भारताने एकूण ७ मेडल्स जिंकले. जे आजपर्यंत घडलं नव्हत ते टोकियोमध्ये घडलं. २०१६ मध्ये मेडल जिंकल्यानंतर पुन्हा एकदा पीव्ही सिंधूने मेडल जिंकण्याची किमया केली. (Olympic Competition)
==============
हे देखील वाचा : आजपासून क्रिकेटचं महायुद्ध सुरु !
==============
यावेळी तिने ब्राँझ मेडल मिळवलं. हॉकीमध्ये कमबॅक करत १९८० नंतर भारताने ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकला आणि यावेळी भारताने ब्रॉंझवर मोहोर उमटवली. लव्हलीना बोर्गोहेनने बॉक्सिंगमध्ये तर बजरंग पुनियाने रेसलिंगमध्ये ब्राँझ मेडल मिळवलं. सिल्व्हरवर रेसलिंगमध्ये रवी दहियाने आपलं नाव कोरलं तर सायखोम मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये सिल्व्हर भारताच्या पदरी पाडलं. २०२१ साली एकाच व्यक्तिची सर्वात जास्त चर्चा झाली, तो म्हणजे नीरज चोप्रा ! १२४ वर्षांनंतर भारताला एथलेटिक्समध्ये मेडल सोबतच गोल्ड मेडल जिंकवून देण्याचा भीमपराक्रम निरजने करून दाखवला. जॅव्हलिन थ्रोसारख्या प्रकारात मेडल मिळवणं साधी गोष्ट नाही, पण हे नीरजने साध्य केलं आणि पोडीयमवर आपलं राष्ट्रगीत वाजलं, ज्यामुळे १४० कोटी भारतीयांचं उर अभिमानाने भरून आलं.
मिल्खा सिंग यांचं स्वप्न होतं, ते एकदा म्हणाले होते की मरण्यापूर्वी एकदातरी मला एथलेटिक्समध्ये भारतासाठी कोणीतरी गोल्ड मेडल जिंकलेलं पहायचं आहे. दुर्दैवाने त्यांचं १८ जून २०२१ ला निधन झालं आणि जवळपास दीड महिन्यानंतर ८ ऑगस्टला निरजने गोल्डवर आपला भाला फेकला. हे मेडल नीरजने मिल्खा सिंग यांनाच समर्पित केलं असा होता .भारताचा आजपर्यंतचा ऑलिम्पिकचा प्रवास ! आता पॅरिस ऑलिम्पिक अवघ्या काही दिवसांवर आलं असताना भारताचे स्टार एथलिट्स पुन्हा एकदा इतिहास घडवायला सज्ज झाले आहेत. भारताची ११७ जणांची टीम पॅरिसला रवाना झाली आहे. आता पोडीयमवर किती वेळा आपलं राष्ट्रगीत वाजणार आणि भारत मेडल्सचं डबल डिजीट करणार का याचीच सर्वांना उत्सुकता आहे. (Olympic Competition)
