Health Care Tips : कोरोना व्हायरसने पुन्हा डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. देशभरात दररोज कोव्हिडच्या रूग्णांचा आकडा वाढत चालला आहे. सध्या कोव्हिडचा नवा व्हेरिएंट जेएन-1 समोर आला आहे. कोरोना व्हायरसच्या या व्हेरिएंटपासून दूर राहण्यासाठी काही मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत राहणे महत्त्वाचे आहे.
खाण्यापिण्याकडे लक्ष देण्यासह नियमित रूपात काही योग आसने केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होऊ शकते. योग आसनांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासह काही आजारही दूर होऊ शकतात.
वृक्षासन
इंग्रजीमध्ये वृक्षासनाला ट्री पोझ असे म्हटले जाते. हे आसन सर्वाधिक सोपे आहे. यासाठी योगा मॅटवर सरळ उभे राहावे आणि डावा पाय दुमडून उजव्या पायावर ठेवावा. हातवर घेऊन नमस्कार मुद्रेत उभे राहा. यावेळी शरीराचा तोल सांभाळण्याचा प्रयत्न करा.
फायदे
हे आसन केल्याने पाठीचा मणका लवचीक होतो, याशिवाय स्नायूही मजबूत होण्यास मदत होते. हे आसन नियमित केल्याने एकाग्रता सुधारण्यासह तणावही कमी होतो. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी हे सोपे आसन आहे.
त्रिकोणासन
हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम योगा मॅटवर सरळ उभे राहा. यानंतर दोन्ही पायांमध्ये चार फूट दूर अंतर निर्माण करा. आता हळूहळू दीर्घ श्वास घ्या आणि आपला डावा हात डोक्यावर घेऊन जा. श्वास सोडताना शरीर डाव्या बाजूला झुकवा. काही सेकंद याच मुद्रेत राहून पुन्हा आधीसारखे उभे राहा. हे योग आसन दोन ते तीन वेळा करू शकता.
फायदे
हे योगासन दररोज केल्याने फुफ्फुस मजबूत होतात. याशिवाय पचन आणि चयापचयाची क्रिया मजबूत होते. स्नायू बळकट होण्यासह ते लवचीक होतात.
भुजंगासन
हे आसन करण्यासाठी योगा मॅटवर पोटावर झोपा आणि दोन्ही हात समोर पसरवा. आता हात मागील बाजूल खांद्याच्या सरळ रेषेत आणा आणि छातीकडील भाग वरच्या दिशेला उचला. (Health Care Tips)
फायदे
भुजंगासन केल्याने खांदे, पाठीचा मणका, छातीचे स्नायू मजबूत आणि लवचीक होतात. हे आसन फुफ्फुसं मजबूत बनवण्यास फार फायदेशीर असल्याचे मानले गेले आहे. रोगप्रतिकारक शक्ती बूस्ट करण्यासाठी हे आसन अत्यंत फायदेशीर आहे.
मेडिटेशन करण्याची सवय लावा
रोगप्रतिकारक शक्ती बूस्ट करण्यासाठी दररोज 20 मिनिटे तरी मेडिटेशन करण्याची सवय लावा. यामुळे काही आजारांसह श्वसनासंबंधित समस्यांपासून दूर राहू शकता. दररोज 20-25 मिनिटे कपालभाति, अनुलोम-विलोम, नाडी शोधन प्राणायम करू शकता.
(टीप : या लेखात माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.)