समस्त हिंदूधर्मियांसाठी पवित्र अशा रामचरितमानस ग्रंथांची छपाई कुठून होते, याची आपल्याला माहिती आहे का? ही छपाई होते ती गीता प्रिंटींग प्रेसमधून. गीतेपासून प्रेरित होऊन सेठ गोयंका यांनी 1923 मध्ये एका भाड्याच्या खोलीत गीता प्रेसची सुरुवात केली. आता या गीता प्रेसच्या देशभरात 20 अत्याधुनिक शाखा आहेत. उत्तरप्रदेशच्या गोरखपूरमध्ये असलेल्या गीता प्रिंटींग प्रेसची ओळख बहुधा सर्वांनाच आहे. या गीता प्रिटींग प्रेसच्या स्थापनेस आता शंभर वर्ष झाली असून या प्रिंटीग प्रेसच्या या यशस्वी वाटचालीचा भव्य कार्यक्रम काही दिवसात होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत. यासमारंभात पंतप्रधान मोदी शिवपुराणाचे प्रकाशन करणार आहेत. (Gita Press)
रामचरितमानस, भगवतगीता, वेद यासारख्या ग्रंथांना घराघरात पोहचवण्याचे कार्य गीता प्रिंटींग प्रेसतर्फे सातत्यानं करण्यात येत आहे. या प्रिंटीग प्रेसची अनेक वैशिष्टे आहेत. काळाच्या ओघात या प्रेसचे नुतनीकरण करण्यात आले आहे. मात्र येथील प्रत्येक कर्मचारी एक नियम पाळतो, तो म्हणजे, या प्रेसमध्ये येतांना चपला बाहेर काढूनच आत प्रवेश केला जातो. ज्याप्रमाणे मंदिराचे पावित्र्य राखले जाते, तसेच या गीता प्रिंटींग प्रेसचे पावित्र्य राखले जात आहे. त्यामुळेच आज शंभरी पार करुनही या प्रिंटींग प्रेसची लोकप्रियता आणि उत्पादन कमी न होता, दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे. (Gita Press)
गोरखपूर रेल्वे स्थानकापासून अवघ्या पाच किलोमिटरवर असलेल्या गीता प्रिंटीग प्रेसला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक जातात. एखाद्या मंदिरासारखे पावित्र्य असलेले हे प्रिंटींग प्रेस अनेक ग्रंथांच्या छपाईचे मुळ आहे. हिंदू धर्मातील सर्वाधिक पुस्तके या प्रिटींग प्रेसच्या माध्यमातून प्रकाशित केली जातात. हे वर्ष या प्रिंटींग प्रेसचे शताब्दी वर्ष अर्थातच 100 वे वर्ष आहे. या वर्षाच्या समारोप समारंभाला पंतप्रधान मोदी उपस्थित रहाणार आहेत. या प्रेसबाबत अनेकांना उत्सुकता आहे. विशेष म्हणजे रामचरितमानसवर वाद झाल्यावर रामचरितमानसची विक्री वाढली तशीच गीता प्रिंटीग प्रेसबाबतची उत्सुकता वाढली. त्यामुळेच आता गोरखपूरला भेट देणारे भाविकस गोरखपूरच्या आश्रमाला आणि गीता प्रिंटीग प्रेसला आवर्जून भेट देतात. गीता प्रेसने आतापर्यंत 92 कोटी पुस्तके छापली असून हा एक विक्रम झाला आहे. विशेष म्हणजे, कोरोनाच्या कालावधीनंतर धार्मिक पुस्तकांची मागणी मोठी वाढली. शिवाय रामचरितमानसवर झालेल्या वादानंतरही रामचरितमानसची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली. गेल्यावर्षी साधारण 2 कोटी 42 लाख पुस्तके प्रकाशित झाल्याची माहिती आहे. रामचरितमानस हा पवित्र ग्रंथाची सुमारे 50 हजाराची विक्री झाल्याची माहिती आहे.(Gita Press)
या संपूर्ण गीता प्रिंटींग प्रेसचे व्यवस्थापनच अतिशय नेटनेटके आणि कौतुकास्पद आहे. त्यामुळेच जिथे पुस्तकांची विक्री मंदावल्याची चर्चा होते, तिथे या गीता प्रिंटींग प्रेसमधून प्रकाशित पुस्तकांना वाढती मागणी आहे. गीता प्रेसमध्ये (Gita Press) सध्या 15 भाषांमधील 1848 प्रकारची पुस्तके प्रकाशित होत आहेत. या प्रेसच्या देशभरात 20 शाखा आहेत. या शाखांमध्ये अहोरात्र 70 हजार पुस्तके प्रकाशित होत आहेत. आता या प्रेसच्या सर्वच शाखा आधुनिक प्रणालीनं सज्ज आहेत. मात्र हे आधुनिकीकरण करतांना त्यात कुठेही प्राण्यांचा अंश आला नाही ना याची काळजी घेण्यात येते. विशेषतः छापण्यात येणा-या पुस्तकांची मुखपृष्ठे हातानं लावण्यात येतात. येथून घेण्यात येणा-या बहुधा सर्व पुस्तकांची घराघरात पुजा होते. त्यामुळे अशा पुस्तकाला चिटवण्यासाठी कुठेही प्राण्यांची चरबी नाही, याची हमी गीता प्रिटींग प्रेसकडून देण्यात येते. (Gita Press)
=======
हे देखील वाचा : पहिल्यांदाच रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
=======
येथे तयार होणा-या पुस्तकाच्या कव्हरचे काम विशेष श्रद्धेनं करण्यात येते.येथील कोणतेही कामगार पायात चप्पल घालत नाहीत. शिवाय तंबाखू-गुटखा असे व्यसनही करत नाहीत. शिवाय कुठल्याही प्रकारच्या चामड्याच्या वस्तूही वापरत नाहीत. आपल्या हातून देवाचे कार्य होत आहे, अशी श्रद्धा त्यांच्या मनात आहे. या प्रेसचे मुख्य काम धार्मिक ग्रंथांचा प्रचार करणे आहे. या धार्मिक ग्रंथाचा प्रचार नव्या पिढीत फार होणार नाही, आणि गीता प्रिंटींग प्रेस बंद होईल अशी अवाजवी भीतीही व्यक्त होत होती. पण गीता प्रिंटीग प्रेसमधील (Gita Press) पुस्तकांना मागणी कधीही कमी झाली नाही. विशेष म्हणजे काळानुरुप या प्रेसचे स्वरुप बदलत गेले. त्यामुळे नवीन पिढीही या प्रेसच्या पुस्तकांबरोबर जोडली गेली आहे. आता या प्रेसच्या वेबसाइटवर असलेली 100 हून अधिक पुस्तके मोफत डाऊनलोड करता येतात. यामध्ये तरुण वाचकांचा अधिक समावेश आहे. गेल्या वर्षी 87 कोटी रुपयांची पुस्तके विकली गेली आहेत. यावरुनच गीता प्रिंटीग प्रेसच्या पुस्तकांची लोकप्रियता लक्षात येते. श्रीमद भगवद्गीता आणि रामचरितमानस प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचे श्रेय गीता प्रेसला आहे. आता शंभराव्या वर्षी ही प्रिंटींग प्रेस नव्या पिढीलाही तेवढ्याच आत्मियतेनं आपल्या परंपरांचे धडे देत आहे.
सई बने