गावाबाहेरचं एक लहानसं सात्त्विक मंदिर. तिथं ना कुणाचं प्रस्थ. ना भाविकतेचा डामडौल.
मुख्य, मोठ्या मंदिरापासून काही अंतरावर वसलेलं. कुणीतरी सांगितलं, ते मूळ स्थान बरं.
तिथून देवी उठली नि ह्या मुख्य मंदिरात येऊन बसली. तेव्हापासून भाविक या मोठ्या
मंदिरातच गर्दी करू लागले दर्शनाला. शेवटी देवीलाच काळजी भक्तांची. त्या आडनिड्या
जागेवरच्या मूळ स्थानी कसं काय होणार इतक्या भक्तांचं? म्हणून स्थानापन्न झाली
असेल मोठ्या मंदिरात.
त्या मूळ स्थानी तिचा फक्त एक तांदळा आहे म्हणे. वाटलं बघावं तरी आहे कसं हे देवाचं
मूळ स्थान?
पायवाट पांढरी तयातुन अडवीतिडवी पडे.अशा अडव्यातिडव्या पांढुरक्या पायवाटेवरून जरा पुढे गेले, नि अहाहा.निसर्गाची मुक्त उधळण म्हणजे काय ह्याचा प्रत्यय आला.हेच का मूळ स्थान? इकडेतिकडे बघत विचारणा केल्यावर कुणीतरी म्हणालं, ते बघा, ते मूळ स्थान पंधरा-वीस पाय-या उतरून गेल्यावर सामोरं आलं एक इवलंसं देऊळ.
मूळ स्थान. पण कुलूपबंद. आता काय? तेवढ्यात आला कुणी हातात किल्ली नाचवत.लोकांनी गाभाऱ्याची कुलपं उघडली, स्वतःच घातलेली.आणि देवदर्शन मिळाल्याची धन्यता मानली.
पण का कुणास ठाऊक, मला तर तू भेटलाच नाहीस त्या गाभाऱ्यात. कुठून तरी दुरून कुणी काही बोलल्याचा, बोलावल्याचा भास झाला. हो भासच. म्हणून येऊन बसले बाहेर डोंगर उतरणीच्या पसार्यात.निळसर पांढरी हवा नि रानवट हिरवा वास. दूरदूरपर्यंत पसरलेली निरभ्रता. यामध्ये मला जाणवला माझाच मोकळा श्वास. असावा त्यातच ‘तो’ शांतचित्त. हसू आलं. अंतरीची साद अशी दुरूनच येते का? तिच्या उगमाचं मूळ स्थान कोणतं असावं?
ओहो, ते काय आहे? काय चमकलं? रेशमी मोरपंखं गर्द राईत चमकली. असंही असतं त्याचं मुक्त दर्शन? त्या पाचूच्या आणि नीलमण्यांच्या डोळ्यांचे पिसारे. सृष्टिवैभवाचा दिमाखदार पदन्यास. हाती घ्यावं त्या निळ्या-हिरव्या सौंदर्याला, पण कसं?असं वाटलं, त्या पिसा-याला आपले हात जरी लागले तरी ती निळी-हिरवी पिसं काळी पडतील, इतके स्वार्थी आहेत माझे हात. त्या स्वर्गीय पिसांचा आपल्याकरता, आपल्या कलात्मकतेकरता वापर करणारे माझे स्वार्थी हात. मी चटकन माझे हात मागे घेतले नि दुरूनच केकारव ऐकत बसले. म्याओ, म्याओ. ते निळं, राजसी सौंदर्य दिमाखात चालत गेलं समोरून.
तो शांत आसमंत खूप काही सांगत होता कानांत, झिरपत होतं ते मनात.दूरवर मुख्य मंदिरातून घंटानाद ऐकू येत होता. आरतीची वेळ झाली वाटतं. अनेक जण लगबगीने धावले मुख्य मंदिराकडे. पण माझे पाय हललेच नाहीत तिथून.मी माझी स्वतःचीच आरती जणू म्हणत होते, आर्ततेनं, मनातल्या मनात.
तूच रे, इथवर तुला धुंडाळत आले.
या मंदिरातून त्या मंदिरात, मूळ स्थानं शोधत राहिले.
निमिषभरच कधी दिसलास नि नाहीसा झालास.
एक सुंदर मुग्धता माझ्यावर उधळून गेलास.
तुला नि मलाच कळले आपले अनोखे अनुबंध.
माझ्या शब्दांनी मग ल्यायला तो अनामिक गंध.
दुनियेला वाटलं..
मंदिराजवळ असूनही झाली हिला कशी ही बाधा.
घडत्या घटनांचा कुणी कसाही संबंध लावतो बहुधा.
एक गूढ हास्य माझ्याचभोवती मला ऐकू येत होतं.
आणि त्या मूळ स्थानी,रिकाम्या गाभाऱ्याला परत कुणीतरी कुलूप ठोकलं होतं.
तुझ्यापर्यंत कुणी येऊ नये म्हणून? की,
तुला कुणापर्यंत जाता येऊ नये म्हणून?
असो बापडे,
कुणी कसेही शोधत राहोत, घडल्या घटनांचे अर्थ.
‘नैनं छिन्दन्ति शस्राणि’..
म्हणत तू माझ्या लेखणीत झालास हृदयस्थ.
– © डाॅ. निर्मोही फडके.