ऑगस्ट महिन्यातील स्वच्छ, सोनेरी उगवती सकाळ. त्या लहानशा शहरातली इवलाली घरं पहाटेपासूनच जागी झाली होती. न्हाऊमाखू घातलेल्या लहान बाळानं, काजळतीट लावून, अंगडटोपडं घालून टुकूटुकू बघत छान तयार व्हावं तशी दिसत होती ती घरं. आठवड्याचा पहिलाच दिवस, सगळ्यांच्याच कामाचा, घाईगडबडीचा सोमवार. घरांची लगबग सुरू झालेली. साओरीनं शाळेचं दप्तर उचललं नि आईनं दिलेला जेवणाचा डबा घेऊन ती बागडत निघाली. चार घरं अलीकडे, पलीकडे राहणारे याशिरो, इझामी, नात्सुमी,नाओहितो मागोमाग आलेच आणि बालचमू निघाला शाळेत. रस्त्यातून जाताना सैन्याच्या पलटणी कवायती करताना त्यांना दिसत होत्या. युद्धाच्या बातम्या आणि वातावरण कित्येक महिन्यांपासून अनुभवणारी ही मुलं आता त्या सगळ्या भयानक गोष्टींना सरावल्यासारखी झाली होती. शाळा कधी असायची, कधी अचानक सुट्टी मिळायची. त्यातून सर्वांच्याच घरातलं कुणी ना कुणी सैन्यात भरती झालंच होतं. मग कुणाच्यातरी घरी वाईट बातमी येऊन थडकायची. त्या घराच्या भोवतीचा परिसर सुन्न व्हायचा. नंतर पुन्हा आपलं रहाटगाडगं सुरू. दहशतीची सावली कायमच पांघरलेली त्या शहरानं, पण तरी जगणारे आशेनं जगतच होते.
बालचमू शाळेजवळ आला. शाळेच्या मैदानात मधोमध असणा-या हिरव्यागार गिंको वृक्षाभोवतीच्या कठड्यावर त्यांचे सवंगडी खेळत होते. सकाळचे साडेसात वाजले. शाळेची घंटा झाली नि सगळी मुलं त्या गिंको वृक्षासमोर प्रार्थनेकरता उभी राहिली. मुलं विश्वशांतीची प्रार्थना म्हणू लागली नि त्या गिंकोची उल्लसित झालेली पानं सळसळली. थोड्या वेळानं मुलं किलबिलत वर्गावर्गांमध्ये गेली आणि तृप्त झालेला गिंको निरभ्र आकाशाकडे नजर लावून उभा राहिला.
गिंको… शांतपणे उभा होता खरा, पण आज पहाटेपासून त्याला अस्वस्थ वाटत होतं. का कुणास ठाऊक. आजची पहाट पूर्वेचे रंग उधळीत आलीच नाही. एक काळाकुट्टं, महाकाय ढग पहाटेपासूनच पूर्वेला ठाण देऊन बसला होता. “हम्… ‘उगवत्या सूर्याचा देश’ म्हणे हा. इथे दिसतोय कुठे सूर्य उगवताना? आणि दिसला तरी काय माहीत आणखीन असा किती महिने इथे तो मोकळेपणाने उगवू शकेल? किती काळ उलटून गेला, हे युद्धाचे ढग काही हलत नाहीत इथून आणि त्या ढगांच्या भीतिदायक सावल्या. कधी मोकळा श्वास देता-घेता येईल, कुणास ठाऊक?” गिंको वृक्ष मनातल्या मनातच बोलत होता. त्यानं पानांची सळसळ केली. फांद्या हलवल्या आणि तो एकटक वर बघू लागला. निळंभोर आकाश. “माझं आकाश. माझ्या देशाचं आकाश”. गिंकोची जणू समाधी लागली.
अचानक कशाचातरी प्रचंड स्फोट झाला. धरणी दुभंगली नि आकाश फाटलं. एक महाकाय काळाकभिन्न धुराचा लोळ सरसरत आकाशापर्यंत गेला. थोड्या वेळापूर्वीच्या जिवंत, रसरसलेल्या त्या परिसरानं काळ्याकभिन्न, जळालेल्या अशा भयानक स्मशानभूमीचं रूप घेतलं. ‘लिट्ल बाॅय’नं आपलं काम चोख केलं नि मानवी इतिहासात काळ्या अक्षरानं लिहिलं गेलं, ‘७ ऑगस्ट, १९४५. जपानचे हिरोशिमा शहर ‘लिटल बाॅय’ या अणुबाँबमुळे नष्ट. दोन दिवसांनंतर ‘नागासकी’. सर्वदूर नुसती धुमसणारी राख आणि मृत्यूची अतिप्रचंड अशी काळी सावली पसरलेली.
शरणागतीच्या करारावर सह्या करून महायुद्ध थांबलं. पुढे काळाच्या प्रवाहानं अनेक उलटसुलट वळणं घेतली. या दुर्दैवी देशांनी, त्यातल्या शहरांनी चिकाटीनं अस्तित्वाची लढाई जिंकली आणि राखेतून फिनिक्सची भरारी घेतली. त्या अमानवी, क्रूर घटनेचा साक्षीदार असलेला तो गिंको वृक्ष तसाच जळलेल्या अवस्थेत कलेवर होऊन त्याच ठिकाणी अनेक वर्षं पडून राहिला. त्याचा आत्मा जणू अजूनही त्या निष्पाप, कोवळ्या जिवांचे बोल ऐकण्यासाठी, त्या निरागस प्रार्थनेसाठी तळमळत होता.
तिथं पुन्हा चिमखड्यांचा किलबिलाट सुरू करायचं प्रशासनाकडून ठरवलं गेलं. नवी इमारत बांधताना गिंकोच्या जळलेल्या खोडाला बाजूला तर करावं लागणार होतं, पण तो साक्षीदार होता त्या काळ्या इतिहासाचा. त्याला जपायचंही होतं. म्हणून मग गिंकोला काळजीपूर्वक बाजूला करून ठेवलं गेलं. पावसाचा मोसम आपले ऋतुरंग उधळून गेला. आज शाळेच्या नव्या इमारतीचं बांधकाम सुरू करायचं ठरलं होतं आणि काय आश्चर्य, वसंत ऋतूतील सोनेरी रंगात न्हायलेल्या त्या कोवळ्या सकाळी गिंकोच्या जुनाट खोडातून पोपटी-गुलाबी रंगांच्या पानांचा इवलासा अंकुर कुतूहलानं जगाकडे पाहून हसू लागला. निसर्गाच्या सर्जनशीलतेनं माणसाच्या क्रूरतेवर मात केलेली माणसानं पाहिली.
आजही नव्या युगाच्या, नव्या पालवीचे धुमारे उमलवताना तो दिसतो. महायुद्धाच्या त्या अमानुष कृत्याचे परिणाम अंगावर झेलून ‘नो मोअर हिरोशिमा’ असा बोर्ड आपल्याच अंगावर लटकवत, माणसालाच बजावत तो उभा आहे. माणसाच्या काळ्या इतिहासाचा तो साक्षीदार नव्या युगातील लहानग्या साओरी, इझामी, नात्सुमी, नाओहितो यांना आपल्या अवतीभोवती बागडताना बघून तृप्त होताना दिसतो.
(दुस-या महायुद्धाच्या काळात हिरोशिमामध्ये अणुबाँबस्फोट झाला. त्या स्थानापासून1650 मीटर अंतरावर असणा-या ‘सेंडा पब्लिक स्कूल’ या बेचिराख झालेल्या शाळेतील गिंको (Ginkgo) वृक्षाचा उल्लेख महाजालावर आहे. असे पाच-सहा गिंको वृक्ष त्याअणुबाँबस्फोट परिसरात जणू पुनर्जन्म होऊन आजही जगत आहेत. या माहितीचा केवळ आधार घेऊन लिहिलेली ही कल्पितकथा.)
—– ©डाॅ. निर्मोही फडके.