भारतीय जनता पक्ष, शिवसेना Rightist. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस Leftist. डेमोक्रॅट्स Left तर रिपब्लिकन्स Right. जेव्हा केव्हा राजकीय चर्चा होते तेव्हा तेव्हा राजकीय विचारधारा प्रामुख्याने Right आणि Left अशा दोन भागांमध्ये विभागली जाते. राजकीय विचारधारा ह्या उजव्या आणि डाव्या या दोन भागांमध्येच का विभागल्या जातात ? त्यांना उजवे आणि डावे असं का म्हंटल जातं ? असं म्हणण्याची पद्धत कुणी आणि कधीपासून प्रचलित केली? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाऊन घेऊया.(Concept)
या प्रश्नाचं उत्तर आपल्याला फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये सापडतं. फ्रेंच राज्यक्रांतीने जोर पकडला होता. राजा सोळावा लुई याच्याविरोधात मोठ्या प्रमाणात जनप्रक्षोभ बघायला मिळत होता. लोकं सोळाव्या लुईच्या मनमानी राज्यकारभाराला कंटाळले होते. बदल हवाय हेच लक्ष्य समोर ठेवून प्रत्येकजण लढा देत होता. तशातच क्रांतिकारकांच्या एका टोळीने १४ जुलै १७८९ रोजी Bastille तुरुंगावर हल्ला केला. सोळाव्या लुईच्या जुलमी राजवटीला उलथून लावल्यानंतर क्रांतीकारकांसमोर सगळ्यात मोठ आव्हान होतं ते म्हणजे नवीन सरकार स्थापन करण्याचं आणि नवीन सरकार स्थापन करायला अर्थातच देशासाठी नवीन संविधान बनवणे गरजेचे होते.(Concept)
संविधान बनवण्याच्या हेतूने एका समितीची स्थापना करण्यात आली. महत्वपूर्ण व्यक्तींचा त्या समितीत समावेश करून National Assembly अस त्या समितीला नाव देण्यात आलं. देश चालवण्यासाठी नवीन संविधान बनवणे हे प्रमुख आव्हान त्या समितीतील सदस्यांपुढे होते. संविधान निर्मितीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. चर्चा करून एक एक कायदा बनवला जाऊ लागला. ही प्रक्रिया सुरु असतांनाच एक पेचप्रसंग सभागृहात उभा राहीला तो म्हणजे veto च्या कायद्यासंदर्भात सभागृहातील सदस्यांमध्ये टोकाची मतभिन्नता बघायला मिळाल्यानंतर.(Concept)
आता veto म्हणजे काय ?
तर भविष्यात एखादा कायदा, एखादा निर्णय जर बहुमताने संमत झाला तर त्या निर्णयामध्ये फेरफार करण्याचा किंबहुना त्यामध्ये बदल करण्याचा राजाला असलेला अधिकार. आता हा अधिकार राजाला असावा की नाही याबद्दल सभागृहात फार मोठ्या प्रमाणात मतभिन्नता बघायला मिळाली. काही सदस्य राजाला हा अधिकार असावा या बाजूने होते तर काही सदस्य राजाला हा अधिकार देणे म्हणजे पुन्हा लोकशाही डावलून राजेशाहीकडे वाटचाल करणे या मतावर ठाम होते.(Concept)
कुठल्या बाजूने किती लोकांचा पाठींबा आहे हे लक्षात येण्यासाठी सारख्या मतांच्या लोकांना सोबत बसवण्यात आले. बदल घडवायचाचं आहे तर तो पूर्णपणे घडवूया. राजेशाही, व्यक्तिपूजेला कुठलही स्थान न देता पूर्णपणे लोकशाही स्वीकारत क्रांती घडवूया. अशा क्रांतिकारी विचारांचे लोकं सभागृहात डाव्या बाजुला बसले. परंपरागत चालत आलेल्या गोष्टींना यांचा तीव्रपणे विरोध होता त्यामुळेच नवीन व्यवस्थेत राजाचा हस्तक्षेप यांना नको होता.(Concept)
=======
हे देखील वाचा : मराठी चित्रपटसृष्टीत बनलेला ‘हा’ सर्वोत्तम राजकीय सिनेमा.
=======
याउलट परंपरागत चालत आलेल्या गोष्टी आपणदेखील चालू ठेवायला पाहिजे. जुन्या गोष्टींना, परंपरांना सोडून न देता त्यांना जपायला हवं, त्यामुळेच नवीन व्यवस्थेत राजाला veto चा अधिकार असायला हवा अशा विचारांची लोकं सभागृहाच्या उजव्या बाजूला बसली. दुसऱ्या दिवशी या दोन गटांची त्यांच्या विचारधारेची ओळख करून देतांना स्थानिक वर्तमानपत्रांनी त्यांची त्यांच्या बसण्याच्या जागेवरून ओळख करून दिली. सभागृहाच्या डाव्या बाजूला बसलेल्या, क्रांतीकारी विचार बाळगणाऱ्या गटाला डावे तर परंपरागत चालत आलेल्या गोष्टींना जपण्याचा आग्रह करणाऱ्या गटाला उजवे म्हणून वर्तमानपत्रात संबोधण्यात आले. त्यानंतर हळूहळू ही डाव्या उजव्यांची संकल्पना संपूर्ण जगात पसरली आणि दोन टोकाच्या राजकीय विचाधारांना अशाप्रकारेच संबोधले जाऊ लागले.