ब्रिटीश राजघराण्याच्या सध्या दोन्हीही सुना या सोशल मिडियावर मोठ्याप्रमाणात चर्चेत आल्या आहेत. प्रिन्स विल्यमची पत्नी राजकुमारी केट मिडलटन गेल्या दोन महिन्यापासून आपल्या आजारपणामुळे आराम करत आहे. महिन्यापूर्वी राजकुमारी केटच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे केट सध्या कुठल्याही सामाजिक उपक्रमात भाग घेत नाही. मात्र महिला दिनाचे औचित्य साधत केटनं आपल्या तिनही मुलांसह एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला. त्यानंतर या फोटोवरुन केट चर्चेत आली. (meghan markle)
हे होत असतांना दुसरीकडे प्रिन्स हॅरीची पत्नी मेघन (meghan markle) हिनं आपल्या गर्भधारणेच्या काळात अत्याचार झाल्याचे सांगून एकच खळबळ उडवून दिली आहे. प्रिन्स हॅरी आणि मेघन यांचे लग्न झाल्यापासून मेघनने ब्रिटिश राजघराण्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. काही वर्षांपासून हे जोडपं ब्रिटीश राजघराण्यापासून वेगळं रहात आहे. मात्र या दोघांनीही वारंवार ब्रिटीश राजघराण्यावर टिका केली आहे. आता एका जाहीर कार्यक्रमात बोलतांना मेघनने गर्भधारणेच्या काळात आपल्याला धमक्या आल्याचे सांगितले आहे. आता या धमक्या तिला नेमक्या कुणी दिल्या, याबाबत मात्र तिनं काहीही स्पष्ट केले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मेघननं ब्रिटीश राजघराण्यावर टीका केल्याची चर्चा सुरु झाली आहे.
ब्रिटीश राजघराण्यातील सून आणि राजकुमार हॅरी याची पत्नी मेघनने गर्भधारणेदरम्यान अत्याचार सहन करावे लागले असल्याचा खुलासा केला आहे. मेघनला या दरम्यान ऑनलाइन धमक्या मिळाल्या होत्या, असे एका जाहीर कार्यक्रमात स्पष्ट केले आहे. मेघन मार्कल (meghan markle) आणि ब्रिटनचे राजा चार्ल्स यांचा दुसरा मुलगा प्रिन्स हॅरी यांचा 2018 मध्ये विवाह झाला. हा विवाह अनेक अर्थानं गाजला. कारण मेघन ही अमेरिकन नागरिक आहे, शिवाय ती घटस्फोटीत आहे. शिवाय तिची आई श्वेतवर्ण आहे. मेघनच्या या सर्व बाबी राजघराण्याच्या विरोधी असतांनाही तिला सून म्हणून स्विकारण्यात आले. दिवंगत राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी या विवाहाला संमती दिलीच शिवाय प्रिन्स विल्यमपेक्षा प्रिन्स हॅरीच्या लग्नात दुप्पट खर्च केला होता. मात्र लग्नानंतर काही काळातच मेघन आणि राजघराण्यातील दुरावा स्पष्ट झाला. मेघन आणि हॅरीला ड्यूक आणि डचेस ऑफ ससेक्स या पदव्या देण्यात आल्यावरही या दोघांनी राजघराण्याबरोबर आपले संबंध संपवले. हे दोघंही आता अमेरिकेमध्ये रहात आहेत. दोघांना आर्ची आणि लिलिबेट ही दोन मुले आहेत.
मात्र असे असले तरी या दोघांभोवतीचे राजघराण्याचे वलय काही संपलेले नाही. प्रिन्स हॅरीने मध्यंतरी एक पुस्तक लिहिले. त्यात त्यांनी आपले वडील, राजा चार्ल्स आणि मोठा भाऊ, प्रिन्स विल्यम याच्यावर टिका केली आहे. राजघराण्यातील वाद अशाप्रकारे मांडल्यामुळे हॅरीला मोठ्या प्रमाणात टिकेला सामोरे जावे लागले. राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा मृत्यू झाल्यावरही एकटात हॅरी राणीच्या अंत्यविधी सोहळ्याला उपस्थित होता. त्यावेळीही त्याच्यावर आणि त्याच्या पत्नीवर ब्रिटीश मिडियामधून टिका करण्यात आली.
आता नव्यानं हे जोडपं ब्रिटीश सोशल मिडियावर ट्रोल करण्यात येत आहे. त्याला कारण ठरली आहे ती मेघन मार्कल. मेघननं (meghan markle) आपण गरोदर असतांना आपल्याला वाईट वागवलं गेल्याचं सांगितलं आहे. मेघनने म्हटले आहे की, तिने क्रूर ऑनलाइन गुंडगिरी आणि गैरवर्तन यांचा अनुभव घेतला आहे. हा प्रकार तिच्या गरोदरपणात घडला. ऑस्टिन टेक्सासमधील साउथ बाय साउथवेस्ट फेस्टिव्हल येथे एका कार्यक्रमात बोलताना मेघनने हा आरोप केला आहे. यापुढे बोलतांना मेघन म्हणाली माझ्या पोटात आर्ची आणि लिलिबेट असताना मी सोशल मीडिया आणि ऑनलाइन धमक्या आणि गैरवर्तन अनुभवले आहे. हा खूप भयानक अनुभव होता. डिजिटल क्षेत्रात आपण माणुसकी विसरलो आहोत असेही मेघननं पुढे सांगितले आहे. मेघननं हे वक्तव्य केलं, पण तिला कोणी धमकावले हे मात्र स्पष्ट केले नाही. त्यामुळे ती पुन्हा ब्रिटन सोशल मिडियावर ट्रोल होत आहे.
=========
हे देखील पहा : जपानच्या शिस्तीने वाचवले प्राण ?
=========
मेघनने (meghan markle) प्रिन्स हॅरीबरोबर लग्न केल्यानंतर 6 मे 2019 रोजी तिला आर्ची हॅरिसन माउंटबॅटन-विंडसर हा मुलगा झाला. त्यानंतर 4 जून 2021 रोजी लिलिबेट डायना या मुलीला मेघननं जन्म दिला. 42 वर्षीय मेघन आणि प्रिन्स हॅरी राजघराण्याच्या कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात आता सहभागी होत नाहीत. कॅलिफोर्नियातील आर्कवेल फाऊंडेशनच्या माध्यमातून हे दोघंही काम करत आहेत.
सई बने