Home » ऍपल टी बद्दल माहिती आहे का?

ऍपल टी बद्दल माहिती आहे का?

by Team Gajawaja
0 comment
Apple Tea
Share

चहा हे असे पेय आहे की, ते जगभरात सर्वाधिक प्यायले जाते. चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, या प्रश्नावरही नेमके उत्तर नाही. कारण अस्सल चहा पिणा-यांना कधीही चहाचा कप दिला तरी त्यांच्या चेह-यावर हसू येतं. अगदी पहाटे उठून चहा घेऊन मग दिवसभराच्या कामाला सुरुवात करणारे अनेक आहेत. तसेच रात्रपाळीमध्ये काम करतांना झोप येऊ नये म्हणून चहाचे कपच्या कप रिचवणारेही अधिक आहेत. दूध, चहापत्ती, साखर, झालंच तर थोडं आलं आणि थोडं पाणी असा साधनातून होणारा चहा परिस्थितीनुसार बदलत गेला. आता ग्रिन टी, ब्लू टी, व्हाईट टी असे अनेक चहाचे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. हे चहाचे प्रकार लोकप्रिय होत असतांना आता ऍपल टी हा प्रकारही लोकप्रिय होत आहे.  मुळात यात ऍपल म्हणजेच सफरचंदाचा वापर असतो. त्यामुळे हा ऍपल टी (Apple Tea) आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असल्याचा दावाही करण्यात आला आहे. यामुळेच की काय अलिकडे ऍपल टी चे चाहते वाढले आहेत.  

मुळात हा ऍपल टी (Apple Tea) लोकप्रिय होत आहे, कारण तो करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे.  त्यासाठी एक सफरचंद आणि लिंबू किंचित मध यांचा वापर करण्यात येतो. पाणी चांगले गरम करुन त्यात सफरचंद किसून टाकले जाते. हे मिश्रण उकळल्यावर त्यात लिंबाचा रस, हवी असेल तर साखर किंवा मधाचा वापर केला जातो. अगदी थोड्या वेळात तयार होणारा हा चहा चवीला अतिशय चांगला आणि आरोग्यदायी असल्यामुळे त्याचा सध्या वापर वाढत आहे.  

चांगले आरोग्य हवे असेल आणि डॉक्टरला दूर ठेवायचे असेल तर एक सफरचंद रोज खा असा सल्ला दिला जातो. त्याच सफरचंदाचा असा चहा घेतल्यास त्याचाही आरोग्याला मोठा फायदा होत असल्याचा दावा आहे. शिवाय नेहमी होणा-या चहाचे अतिरिक्त सेवन केले तर ऍसिडीटीचा त्रास जाणवतो. भूक मंदावते आणि ब-याच वेळा अनेक आजारांनाही निमंत्रण दिले जाते. पण त्याच्या जागी हा ऍपल टी घेतल्यास कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. शिवाय या ऍपल टीमुळे (Apple Tea) वजन कमी होण्यासही मदत होते. सफरचंदामध्ये अनेक पोषक घटक आहेत.  आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सफरचंदाचा उपयोग होतो. आयुर्वेदातही सफरचंदाचे महत्त्व सांगितले आहे. ज्यांना पोटाचा त्रास आहे, त्यांनी रिकाम्या पोटी सफरचंद खाल्यास फायदा होतो. पण अनेकांना उठल्यावर पहिला चहा लागतो. अशांसाठी तर हा ऍपल टी (Apple Tea) वरदानच आहे.  कारण सकाळी सफरचंदासोबत लिंबू आणि मधही पोटात जाते.  यामुळे पोटाला आराम होतोच शिवाय वाढलेले वजनही कमी करण्यास मदत होते.  पचनसंस्थेचे कामही सुधारते.  या ऍपल टीमध्ये अनेक उपयुक्त जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स यांसारख्या आवश्यक पोषक तत्वांच समावेश असतो. यासोबतच यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि सोडियम मुबलक प्रमाणात आढळते.  यासर्वांचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो. हाडेही मजबूत होण्यासाठी मदत होते.  ऍपल टी मुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. शिवाय रक्तदाब नियंत्रित राहतो.   ऍपल टी (Apple Tea) असलेले पोषक तत्व रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे ऍपल टी मधुमेही रुग्णांसाठीही फायदेशीर ठरतो.  

==========

हे देखील वाचा : ब्राझील नट्स करू शकतात थायरॉइडवर मात

=========

दुध आणि चहा पावडर पासून होणारा चहा हा शरीरात ऍसिडिटी निर्माण करतो. त्यामुळे भूकही मंदावते, जळजळ वाढते. पण ऍपल टी (Apple Tea) हा असे अपाय करत नाही. उलट ऍपल टीमुळे ऍसिडिटी दूर करण्यास मदत होते. शिवाय ज्यांना गॅसचा त्रास होतो. सतत ढेकर येतात, त्यांच्यासाठीही हा सफरचंदाचा चहा उपयोगी पडतो. सफरचंदाचा चहा रक्तातील चांगले कोलॉस्ट्रोल वाढवण्यास मदत करतो. त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. ऍपल टी चा सर्वात चांगला फायदा काय होत असेल तर यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते. अलिकडे कंम्प्युटर आणि मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे डोळ्यांचे आरोग्य ही मोठी समस्या झाली आहे. अशांनी दिवसातून एकदा तरी ऍपल टी घेतला तर डोळ्यांचे आरोग्यही सुधारते, शिवाय सतत बसून असल्यामुळे शरीरावर वाढणारी चरबीही कमी करण्यास मदत होते.  याशिवाय ऍपल टी चे नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते. बदलत्या ऋतूमुळे होणारे आजार यामुळे होत नाहीत. एकूण हा ऍपल टी एक वरदानच आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.