Home » भक्तांना रामलल्लांच्या सूर्याभिषेकाची प्रतीक्षा

भक्तांना रामलल्लांच्या सूर्याभिषेकाची प्रतीक्षा

by Team Gajawaja
0 comment
Ram Navami
Share

हिंदू नववर्षातील सर्वात मोठा दिवस म्हणून रामनवमीकडे पाहिले जाते. प्रभू श्रीरामांचा जन्म झाला तो हा दिवस. दरवर्षी रामनवमी मोठ्या उत्साहात देशभरात साजरी होते. मात्र यावर्षी रामभक्तांसाठी रामनवमी अधिक सोनेरी होणार आहे. कारण प्रभू श्रीरामांचे अयोध्येतील भव्य मंदिर रामभक्तांसाठी खुले झाले आहे. अयोध्येतील या मंदिरात रोज लाखो भक्त जात असून रामलल्लांचे दर्शन घेत आहेत. आता रामनवमीच्या निमित्तानं अयोध्येत आत्तापासूनच भक्तांचा पूर आला आहे. (Ram Navami)

रामनवमीची तयारी येथे भव्य प्रमाणात सुरु आहे.  त्यासाठी खास दिल्लीहून फुले मागण्यात आली आहेत.  ही फुले आठवडाभर टवटवीत राहतात. तर रामनवमीच्या दिवशी रामलल्लांना सोन्या आणि चांदीच्या तारेपासून तयार झालेले कपडे घालण्यात येणार आहेत.  या दिवशी येणारी भक्तांची मोठी संख्या पाहता रामनवमीला होणाऱ्या कार्यक्रमाचे प्रसार भारतीद्वारे थेट प्रक्षेपणही केले जाणार आहे. राम भक्तांना घरी बसून रामलल्लाच्या दरबाराचे दर्शन घेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.  मात्र या सर्वात रामभक्तांना प्रतीक्षा आहे ती रामलल्लांना होणा-या सूर्याभीषेकाची.  सूर्याचे किरणे यादिवशी प्रभू रामांच्या मस्तकावरील मुकुटावर विराजमान होणार आहेत.  हा सूवर्णक्षण बघण्यासाठी रामभक्त आतूर झाले आहेत.  (Ram Navami)

अयोध्या नगरी ही रामनवमीच्या तयारीला लागली आहे.  प्रभू रामांसाठी सर्व वस्तू खास अशाच असाव्यात अशी तयारी सुरु कऱण्यात आली आहे.  रामलल्लांचा १७ रोजी वाढदिवस म्हणजेच रामनवमी.  यादिवशी राम लल्लांसाठी चांदी आणि सोन्याच्या तारेने विणलेले खास डिझायनर कपडे तयार करण्यात आले आहेत.  रामनवमीनिमित्त राममंदिर आणि अयोध्येत सर्वत्र फुलांची सजावट करण्यात येणार आहे.   त्या सजावटीसाठी दिल्ली आणि कर्नाटकातून खास प्रकारची फुले आणली जाणार आहेत.

ही फुले खास आहेत, कारण ती आठवडाभर कोमेजत नाहीत.  रामलल्लांसाठी मंदिरात अहोरात्र गाणी गायली जाणार आहेत.  त्या-त्या वेळेनुसार असलेल्या रागांवर आधारीत ही गाणी असतील.  तसेच मंदिरात वेद आणि पुराणांचे पठण करण्यात येणार आहे.  रामलल्लांना भोग दाखवण्यासाठीही त्यांच्या आवडीच्या पदार्थांची निवड करण्यात आली आहेत. प्रसादासाठी ५६ प्रकारचे खास पदार्थ तयार केले जाणार आहेत. (Ram Navami)

रामनवमीच्या दिवशी पहाटे ३ वाजता मंगला आरतीसाठी रामललाचे दरवाजे उघडले जातील. यानंतर तीन तास पूजेची तयारी केली जाणार आहे. सकाळी ६ वाजता रामलल्लांची शृंगार आरती होईल.  त्यानंतर भाविकांना रामलल्लांचे दर्शन घेता येईल. नऊ वाजता रामलल्लांना बालभोग दाखवण्यात येईल.  त्यावेळी काही काळ पडदे बंद ठेवण्यात येतील. नंतर साडेअकरा वाजेपर्यंत भक्तांना दर्शन घेता येणार आहे. दर्शनादरम्यान रामलल्ला आणि त्यांच्या चार भावांच्या मूर्तींनाही अभिषेक करण्यात येईल. दुपारी १२ वाजता आरती होईल.  तेव्हाच सूर्याभिषेक होणार आहे.  त्यानंतर अर्ध्या तासाने सजावटीसाठी पडदे पुन्हा बंद केले जातील.  हा सर्व सोहळा रामभक्त घरी बसूनही पाहू शकतात.  कारण हा सर्व सोहळा थेट टिव्हीवर दाखण्यात येणार आहे.  

रामनवमीच्या निमित्तानं मंदिरात आत्तापासूनच भाविकांची मोठी गर्दी होत आहे.  त्यामुळे राममंदिर ट्रस्टनं काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.  त्यानुसार १८ एप्रिलपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे.  राममंदिरात या सोहळ्यानिमित्त येणा-या भेटींची संख्याही वाढली आहे.  मिर्झापूरहून अयोध्येला ११११११ लाडू आले आहेत.  हा प्रसाद विंध्याचल येथील ब्रह्मवेत्ता श्री देवराह हंस बाबा आश्रमाकडून पाठवला गेला आहे. राम मंदिराच्या शुभारंभ प्रसंगीही या आश्रमाने शुद्ध तुपाचे ११११ मण लाडू पाठवले होते. (Ram Navami)

===========

हे देखील वाचा : उष्माघातापासून दूर राहण्यासाठी ‘या’ टिप्स लक्षात ठेवा

===========

अयोध्येत वाढलेली भक्तांची संख्या पाहता प्रशासनही सतर्क झाले आहे. भाविकांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी, ११ अतिरिक्त पोलिस अधीक्षक, २६ पोलिस उपअधीक्षक, १५० निरीक्षक, ४००उपनिरीक्षक, २५ महिला उपनिरीक्षक, १३०५ मुख्य हवालदार, कॉन्स्टेबल, अशी नेमणूक करण्यात आली आहे.  रामनवमीला किमान पाच लाख लोक अयोध्येत येतील अशा प्रशासनाचा अंदाज आहे.  त्यानुसार ही तयारी करण्यात येत आहे. (Ram Navami)

यासोबत रामनवमीनंतर येणा-या हनुमान जयंती सोहळ्याचीही तयारी सुरु करण्यात आली आहे.  त्यासाठी हनुमानगढी ट्रस्टतर्फेही नवीन वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.  नवीन वेळापत्रकानुसार हनुमानगढ़ी येथे पहाटे ३:०० ते ४:०० या वेळेत हनुमानजींची आरती, पूजा आणि अलंकार केले जातील. पहाटे ४ वाजल्यापासून भक्तांना प्रवेश दिला जाणार आहे.  दुपारी १२ ते १२.२० दरम्यान पुन्हा दरवाजे बंद कऱण्यात येतील.  नंतर भक्तांना प्रवेश दिला जाणार आहे.  रात्री १०.३० वाजता आरती होणार आहे.  रात्री ११.३० वाजता हनुमानगढीचे दरवाजे बंद होतील असे,  महंत प्रेमदास यांनी पत्रक जाहीर केले आहे.

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.