प्रभू श्रीरामांचे परमभक्त भगवान हनुमान यांचा जन्मोत्सव २३ एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे. बजरंगबली यांना अमर होण्याचे वरदान प्राप्त आहे, त्यामुळेच त्यांचा जन्मोत्सव साजरा होतो. जगभरातील हनुमान भक्त मोठ्या थाटात हा उत्सव साजरा करतात. त्यातही यावर्षी या उत्सवाला आगळेवेगळे महत्त्व आले आहे. अयोध्येत प्रभू रामांच्या भव्य मंदिराचे लोकार्पण झाल्यावर अयोध्येत जाणा-या रामभक्तांची संख्या लाखांच्या वर गेलेली आहे. हे रामभक्त प्रभू रामांचे दर्शन घेण्याआधी त्यांच्या या परमभक्ताचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करीत आहेत. यावर्षी १७ एप्रिल रोजी रामनवमीचा उत्सव साजरा होणार आहे. यावेळी अयोध्येत रामभक्तांचा महापूर येण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. असाच महापूर २३ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सवाच्यावेळीही असणार आहे. कारण अयोध्येतील हनुमान गढीवर आत्तापासूनच लाखो भक्त हजेरी लावत आहेत. (Hanuman Jayanti 2024)
हिंदू कॅलेंडरनुसार, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा २३ एप्रिल २०२४ रोजी पहाटे ३.२५ मिनीटांनी सुरु होत आहे. दुसऱ्या दिवशी २४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ५.१८ पर्यंत पौर्णिमा आहे. या पौर्णिमेदरम्यान भगवान हनुमानाची पुजा करण्यासाठी भक्तांची गर्दी होणार आहे. भक्तांची ही वाढणारी संख्या पाहता या दिवशी रात्रंदिवस हनुमान गढी सुरु ठेवण्याचा विचार प्रशासनातर्फे कऱण्यात येत आहे.
यावर्षी हनुमान जन्मोत्सवाचे महत्त्व आणखी एका कारणामुळे वाढले आहे. कारण २३ एप्रिलला हनुमान जन्मोत्सव साजरा होईल, तेव्हा मंगळवार आहे. मंगळवार हा बजरंगबलीचा प्रिय दिवस मानला जातो. त्यामुळे भगवान हनुमानाची पुजा करण्यासाठी आणि त्यांचे दर्शन घेण्यासाठी हनुमान गढीला मोठी गर्दी होणार आहे. अयोध्येत २२ जानेवारी रोजी राम मंदिराच्या लोकापर्णाचा सोहळा झाल्यावर दररोज येणा-या रामभक्तांची संख्या वाढतच आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत आहेत. हे भाविक राममंदिरासोबत हनुमान गढीमध्येही गर्दी करत आहेत. त्यामुळे आत्तापासून प्रशासनाने हनुमान जन्मोत्सवाच्या नियोजनाची तयारी सुरु केली आहे. (Hanuman Jayanti 2024)
सध्या बजरंगबलीच्या दर्शनासाठी दररोज सुमारे २ लाख भाविक हनुमान गढीवर येत आहेत. राम मंदिराप्रमाणेच हनुमान गढीमध्येही भाविकांची संख्या वाढल्याने प्रशासनावर ताण वाढला आहे. हनुमान गढीवर जाण्यासाठीचा रस्ता अरुंद असल्यामुळे येथे मोठी गर्दी होत आहे. त्यात एखादी दुर्घटना होऊ नये म्हणून प्रशासनानं विशेष व्यवस्था सुरु केली आहे. या आठवड्यापासून हनुमान गढीमध्ये नवीन व्यवस्था सुरू झाली असून त्यात रांगांमध्ये बदल करण्यात आला आहे. तशाप्रकारच्या सूचना भाविकांना देण्यात येत आहेत. ही गर्दी हनुमान जन्मोत्सवापर्यंत कायम राहिल असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यामुळे या भागात अधिक स्वयंसेवकांची आणि पोलीसांची नेमणूक करण्यात येत आहे.
अयोध्येत येणारे भक्त प्रथम हनुमान गढीच्या हनुमंताला नमस्कार करतात. त्याशिवाय अयोध्यावासीयही मोठ्या संख्येने हनुमान गढीला रोज भेट देतात. त्यांना या गर्दीचा कुठलाही त्रास होऊ नये, अशी व्यवस्था करण्यात येत आहे. १७ एप्रिलला होणा-या रामनवमीला अयोध्येत आत्तापासून भाविक दाखल झाले आहेत. हे सर्व भाविक अयोध्येत हनुमान जन्मोत्सवापर्यंत रहाणार आहे. अयोध्येतील सर्व हॉटेल बुक झाले असून येथील तंबू सिटीही बुक आहे. त्यामुळे येणा-या भाविकांसाठी अन्य सुविधा उपलब्ध करण्याचे आवाहन प्रशासनासमोर आहे.
भगवान शंकराचा अवतार मानल्या जाणाऱ्या हनुमानजींना कलियुगातील जागृत देवता मानले जाते. अमरत्वाचे वरदान मिळाल्यानंतर हनुमानजी गंधमादन पर्वतावर राहतात, असे सांगितले जाते. अयोध्येतील हनुमान गढीवरही त्यांचे वास्तव्य असल्याचे सांगण्यात येते. याच अराध्य देवतेला प्रणाम करण्यासाठी लाखो भक्त अयोध्येला येत आहेत. (Hanuman Jayanti 2024)
============
हे देखील वाचा : पिंक टॅक्स म्हणजे नक्की काय? भारतातील महिलांवर असा पडतोय प्रभाव
============
अयोध्येतील हनुमान गढी हे भगवान हनुमानाच्या सर्वात लोकप्रिय मंदिरांपैकी एक आहे. रावणावर विजय मिळवून प्रभू राम अयोध्येला आले, तेव्हापासून हनुमानजी या गढीवर राहू लागले. त्यामुळे याला हनुमानगड किंवा हनुमान कोट असे नाव पडले. या मंदिरात भगवान हनुमानांची मुर्तीही विशेष आहे. भगवान हनुमानाच्या या गढीचा आता मोठ्या प्रमाणात विकास करण्यात येत असून वाढत्या भाविकांच्या संख्येला सर्व सुखसोयी उपलब्ध होतील असा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
सई बने