प्रभूश्रीरामांच्या अयोध्येत होणारा दीपोत्सव हा दरवर्षी नवा विक्रम करीत आहे. यावर्षी, म्हणजे, 2024 मध्ये होणा-या दीपोत्सवाचीही तयारी अयोध्येत सुरु झाली असून यावेळीही नवा विक्रम करण्याचा निर्धार कऱण्यात आला आहे. यावर्षी या दीपोत्सवात तमाम प्रभू श्रीरामांचे भक्त फक्त भारतातून नाही तर परदेशातूनही आपल्या घरी बसून भाग घेऊ शकणार आहेत. यासाठी दीपोत्सवाचे आयोजन करणा-या उत्तरप्रदेश सरकारनं स्वतंत्र वेबपोर्टल लॉन्च केले असून याद्वारे आपणही या दीपोत्सवाचा भाग होऊ शकतो. यात एक वेबलिंक दिली असून त्यात क्लिक करुन किती दिवे या दीपोत्सवात लावायचे आहेत, याची नोंद करायची आहे. फक्त दीपोत्सवात भाग घेता येणार नाही, तर दीपोत्सवासाठी नोंदणी करणा-यांना घरपोच प्रसाद पाठवण्याचाही सोय कऱण्यात येणार आहे. यावर्षी तब्बल 30 एमएल क्षमतेचे दिवे लावण्यात येणार असून, 25 लाख दिवे लावण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यातून एक नवा विक्रम होणार आहे. या विक्रमामध्ये जगभरातील रामभक्तांना सामिल होण्याची संधी उत्तर प्रदेश सरकारतर्फे देण्यात आली आहे. (Ayodhya Deepotsav)
अयोध्येत दरवर्षी होणा-या दीपोत्सवाची लोकप्रियता वाढत आहे. यावर्षीच्या दीपोत्सवादरम्यान 25 लाख दिवे लावण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. हे दिवे लावण्यासाठी मोठ्या प्रमाणत नियोजन करण्यात येते. घाटांवर एवढ्या मोठ्या संख्येने दिवे यशस्वीरीत्या लावण्यात यावेत यासाठी आत्तापासूनच स्वतंत्र टिमची निर्मिती करण्यात आली आहे. यात अनेक तरुणांचा सहभाग असून त्यांनी दिव्यांसाठी जागांची आखणी आणि विविध आकार काढण्यास सुरुवात केली आहे. हे दिवे मुख्यत्वानं राम की पायडी आणि चौधरी चरणसिंग घाट येथे मोठ्या प्रमाणात लावण्यात येणार आहेत. त्यासाठी विशिष्ट प्रकारचे दिवे तयार करण्यात आले आहेत. हे दिवे आकारानं लहान असले तरी ते खोलगट आहेत. त्यामुळे कमी जागेत अधिक दिवे लावले जातील, मात्र दिवे खोलगट असल्यामुळे त्याच्यामध्ये तेल अधिक सामावणार आहे, आणि म्हणूनच अधिकवेळ दिवे प्रज्वलित रहाणार आहेत. (National News)
अयोध्येतील हा दीपोत्सव जगभरातून पाहिला जातो. त्यासाठी मोठ्याप्रमाणात रामभक्त अयोध्येत दाखल होतात. मात्र ज्यांना ही संधी मिळत नाही, त्यांच्यासाठी योगी सरकारनं विशेष सुविधा उपलब्ध केली आहे. आपल्या घरातूनही हे दिवे रामभक्तांना लावता यावेत यासाठी
https://www.divyaayodhya.com/bookdiyaprashad ही साईट सुरु करण्यात आली आहे. यात क्लिक करुन आपल्याला किती दिवे लावायचे आहेत, याची आगाऊ नोंदणी रामभक्त करु शकणार आहेत. त्यानंतर भक्तांना प्रसाद घरपोच पाठवण्यात येणार आहे. हा दीपोत्सव भव्यदिव्य करण्यासाठी सरकारतर्फे आत्तापासून तयारी सुरु झाली आहे. दीपोत्सव 2024 च्या निमित्ताने अयोध्या विकास प्राधिकरणाकडून प्रभू रामाच्या नावाने विविध कार्यक्रमाचे उद्घाटनही केले जाणार आहे. (Ayodhya Deepotsav)
यावर्षी 30 ऑक्टोबर रोजी दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच 31 ऑक्टोबर रोजीही असाच दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. या उपक्रमाच्या नियोजनासाठी शरयू किना-यावर कार्यकर्त्यांची लगबग वाढली आहे. यासह प्रभू श्रीरामांच्या मंदिर परिसरातही विशेष प्रकारचे दिवे लावण्यात येणार आहेत. हे दिवे काचेचे असणार आहेत. प्रभू श्रीरामांच्या मंदिर परिसराचे बांधकाम अजून सुरु आहे. त्याच कॅम्पसमध्ये दगडी बांधकाम सुरू असलेल्या ब्लॉकवरच मातीचे दिवे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी तिनशे स्वयंसेवकांच्या गटानं सराव सुरु केला आहे. तसेच या भागात भव्य अशा रांगोळीही काढण्यात येणार आहेत. त्यातील कलाकारही आखणी करत आहेत. (National News)
======
हे देखील वाचा : अयोध्येच्या रामलेलेत कलाकारांचा बोलबाला
======
2023 च्या दीपोत्सवात 21 लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले होते. यावेळी हा विक्रम मोडून 25 लाख दिवे प्रज्वलित करण्यात येणार असल्यानं पर्यटन विभागानं नियोजनाला सुरुवात केली आहे. या विक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद होणार असल्यानं दिवे खरेदी करण्यापासून ते उजळण्यापर्यंतच्या सर्व व्यवस्थेची जबाबदारी अवध विद्यापीठाकडे सोपवण्यात आली आहे. हा दीपोत्सव बघण्यासाठी अयोध्येत जगभरातून पर्यटक येतात. त्यामुळे अयोध्येतील हॉटेल व्यवसायालाही पुन्हा उभारी मिळणार आहे. नव्या वर्षात प्रभू श्रीरामांच्या मंदिराला वर्ष पूर्ण होत आहे. तसेच त्यांनंतर महाकुंभमेळा प्रयागराज येथे होत आहे. या सर्वांमुळे अयोध्येत येणा-या भाविकांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. (Ayodhya Deepotsav)
सई बने