Home » उत्तराखंडमध्ये देवीच्या मंदिरावरुन वाद !

उत्तराखंडमध्ये देवीच्या मंदिरावरुन वाद !

by Team Gajawaja
0 comment
Uttarakhand Devbhoomi
Share

उत्तराखंडाला देवभूमी म्हणून ओळखले जाते. उत्तराखंडमधील पर्वत शिखरांवर अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत. या मंदिरांना पौराणिक वारसा आहे. मात्र या मंदिरांमध्ये एका नव्या मंदिराची भर पडली आहे. हे मंदिर आहे, देवी भगवतीचे. हे मंदिर चक्क एका ग्लेशिअरच्या शिखरावर बांधले गेले आहे. उत्तराखंडमध्ये या ग्लेशिअरना जीवनवाहिनी म्हणण्यात येते. कारण याच ग्लेशिअरमधून अनेक नद्यांचा उगम झालेला आहे. अशातच एका स्वयंभू बाबांनी या ग्लेशिअरच्या टोकावर देवीचे मंदिर बांधले आहे. (Uttarakhand Devbhoomi)

या मंदिरामुळे स्थानिकांत नाराजी व्यक्त होत आहे. एवढ्या संवेदनशील जागेवर मंदिर कसे उभारले आणि त्याला प्रशासनानं परवानगी कशी दिली हा प्रश्न स्थानिक विचारत आहेत. याच ग्लेशिअरमध्ये पौराणिक संदर्भ असलेले कुंडही आहेत. या कुंडात गेली हजारो वर्ष स्नान करण्यास मनाई होती, मात्र आता हे स्वयंभू बाबा यात स्नान करत असल्यानं स्थानिकांच्या नाराजीत अधिक भर पडली आहे. हे बाबा कोण आहेत, आणि त्यांनी एवढ्या उंच ग्लेशिअरवर मंदिर बांधलेच कसे याची चौकशी करण्याची मागणी आता वाढली आहे.

उत्तराखंडमधील सुंदरधुंगा ग्लेशियरच्या शिखरावर असलेल्या मंदिराचा मुद्दा आता अधिक वादात सापडला आहे. एका स्वयंभू बाबांनी बांधलेल्या मंदिराविरुद्ध आता स्थानिक नाराजी व्यक्त करु लागले आहेत. एरवीही उत्तराखंडमध्ये अतिक्रमणाचा मुद्दा गाजत आहे. आता थेट हिमनदीवरच अतिक्रमण केल्यानं तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. येथे एका स्वयंभू बाबाने सरकारी जमिनीवर मंदिर बांधले आहे. हिमनदीवर बांधलेले हे मंदिर १६५०० फूट उंचीवर आहे. हे मंदिर आहे, तिथे प्रसिद्ध सुंदरधुंगा ग्लेशिअर आहे. ही पर्यटकांची, विशेषतः ट्रेकींग करणा-यांची आवडती जागा आहे. या जागेवर अतिक्रमण झालेले पाहून नाराजी व्यक्त होत आहे. या अतिक्रमणाची माहिती सुरुवातीला काही ट्रेकरनी गावक-यांना दिली. (Uttarakhand Devbhoomi)

या ग्लेशिअरवर नियमीतपणे जाणा-या ट्रेकरनी या मंदिराच्या बांधणीही माहिती गावक-यांनी दिल्यावर त्यांच्यामध्ये घबराट पसरली. त्यानंतर प्रशासनाला या बांधकामाची माहिती देण्यात आली. यासंदर्भात स्थानिकांनी संबंधित बाबाशी संवाद साधला. तेव्हा या बाबांनी आपल्या स्वप्नात देवी भगवती आल्याची माहिती दिली. देवीनेच हे मंदिर बांधण्याची मला आज्ञा दिली, त्यानुसार हे मंदिर बांधले असल्याचे बाबांनी ग्रामस्थांना सांगितले. बागेश्वरच्या सुंदरधुंगा हिमनदीच्या माथ्यावर झालेल्या या बेकायदा बांधकामाविरोधात कारवाई करण्याची मागणी वाढली आहे. (Uttarakhand Devbhoomi)

मात्र स्वयंघोषित बाबा योगी चैतन्य आकाश यांच्यावर फक्त मंदिर बांधल्यामुळेच स्थानिक नाराज नाहीत. तर त्यांनी या सुंदरधुंगा ग्लेशिअरवर असलेल्या कुंडाचा वापर दैनंदिन कामासाठी सुरु केला आहे. गेली हजारो वर्ष या सुंदरधुंगा कुंडातील पाणी पवित्र मानण्यात येते. येथे स्नान करण्यास मनाई आहे. पण यात्रेकरू आणि स्थानिकांचे पवित्र स्थान असलेल्या या कुंडाचे बाबांनी प्रत्यक्ष जलतरण तलावात रूपांतर केले आहे. हे बाबा तिथे आंघोळ करतात.

यामुळे आमच्या धार्मिक भावनांना धक्का लागल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. बागेश्वर भागात होणारी कुलदैवत नंदराज यांच्या यात्रेत सहभागी झालेले भाविक सुंदरधुंगा ग्लेशिअरवरही जातात. येथील कुंडाचे दर्शन घेतले जाते. पर्यवरणाच्या दृष्टीनेही हा भाग महत्त्वाचा आहे. याच ग्लेशिअरमधून सुंदरधुंगा नदीचा प्रवाह आहे. अशावेळी या शिखरावर मंदिर उभारल्यास भविष्यात पर्यवरणाला धोका होऊ शकतो, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. (Uttarakhand Devbhoomi)

=========

हे देखील वाचा :  ४६ वर्षांनी जगन्नाथ मंदिरातील रत्न भांडार उघडले

=========

यासंदर्भात आता ग्लेशिअर रेंज रेंजर यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले आहे. या संवेदनशीर भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात बांधकाम झालेच कसे याचा शोध घेण्यात येणार आहे. हिमनदीच्या शिखरावर असलेल्या मंदिराच्या बांधकामामुळे गुप्तचर विभागाच्या अपयशांवरही चर्चा सुरु झाली आहे.

विशेषत: उत्तराखंडच्या संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणविरोधी मोहीम राबवली जात असताना, थेट ग्लेशिअरवर अतिक्रमण झाले,ही बाब गंभीर समजली जात आहे. संवेदनशील भागात अनधिकृत व्यक्ती कोणत्याही ओळखीशिवाय वावरत असल्याने स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.सुंदरधुंगा खोरे हे आवडते ट्रेकिंग डेस्टिनेशन आहे. हा संपूर्ण परिसर नैसर्गिक सौदर्यानं नटलेला आहे. या ग्लेशिअरकडे जातांना हिमालयीन शिखरांची दृश्ये पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात. अशाच शिखराला अतिक्रमणाचे ग्रहण लागू नये हिच अपेक्षा आहे. (Uttarakhand Devbhoomi)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.