Home » Navid Mushrif : चेअरमन तर फक्त झलक, गोकुळचा विषय लय खोल

Navid Mushrif : चेअरमन तर फक्त झलक, गोकुळचा विषय लय खोल

by Team Gajawaja
0 comment
Navid Mushrif
Share

गोकुळच्या राजकारणाचा विषय पुन्हा एकदा राज्यभर चर्चेचा विषय झाला आहे. पण ठीके विषय कोल्हापूरचा आणि त्यातही राजकारणाचा आहे म्हटल्यावर चर्चा राज्यभर तर होणारच. तर कोल्हापूरमधील गोकुळ दूधसंघाच्या चेअरमनपदी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ यांची निवड झाली आहे. अध्यक्षांची निवड करण्यासाठी सकाळी १० वाजल्यापासून कोल्हापुरात राजकीय खलबतं चालू होती. नाविद यांच्या निवडीसाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी व महायुतीने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. त्याला यश मिळालं आहे. महत्वाचं म्हणजे जिल्हा लेव्हलच्या या निवडणुकीत अगदी मुख्यमंत्र्यांपासून फोन झाले होते. महायुतीचाच माणूस गोकुळचा अध्यक्ष व्हायला हवा अशा सूचना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरातील महायुतीच्या नेत्यांना दिला होता. त्यानुसार मग इतर सगळी नावं मागे पडली आणि अजित दादा गटाचे नेते हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव गोकुळचे चेअरमन झाले. आता यात नावं कोणती होती? राजकारण काय झालं? हे तुम्ही काही प्रमाणात ऐकलंच असेल. पण या गोकुळमध्ये नेमकं असं काय आहे? की ज्यामुळे मुख्यमंत्र्यांपासून राज्यातले आणि कोल्हापूर जिल्ह्यातले झाडून सर्व नेते या निवडणुकीत लक्ष घालून होते. जाणून घेऊ. (Navid Mushrif)

तर गोकुळ दूध महासंघ हा अधिकृतपणे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि. या नावाने ओळखला जातो. ही महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील एक मोठी सहकारी दूध संस्था आहे. गोकुळ डेअरी दरवर्षी ६० कोटी लिटरपेक्षा जास्त दुधाची हाताळणी करते. २०२३-२४ मध्ये, त्यांनी ३,६४० कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल नोंदवली होती. गोकुळ ब्रँड अंतर्गत दूधासोबतच त्यांची अनेक उत्पादने आहेत, जसे की लस्सी, श्रीखंड, तूप, लोणी आणि पनीर जी राज्यभर लोकप्रिय आहेत. मात्र गोकुळची ही ओळख झाली शहरातल्या लोकांसाठी.(Political News)

गोकुळचं खरं राजकारण चालतं ते सहकार या शब्दाभोवती. पण हे राजकारण जाणून घेण्यासाठी आपल्याला गोकुळचं स्ट्रक्चर बघावं लागेल. दूरदर्शी नेते आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्ह्यात १९६३ साली गोकुळचा पाया रचला. 16 मार्च 1963 रोजी ऑपरेशन फ्लड अंतर्गत कोल्हापूर जिल्हा दूध संघाची स्थापना झाली. आनंदराव पाटील-चुयेकर आणि एन टी सरनाईक यांच्या पुढाकाराने दूध संघाची मुहूर्तमेढ रोवली गेली. गोकुळच्या स्थापनेनंतर घरोघरी जाऊन दूध संकलन केलं जात होतं. वर्गीस कुरियन यांच्या पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्यानंतर गोकुळचा चेहरामोहरा बदलला. कोल्हापूरला ऑपरेशन फ्लड म्हणजेच दूधाचा महापूर योजना मंजूर झाल्याने, गोकुळचं आणि पर्यायाने कोल्हापूरचं रुपच बदलून गेले.(Navid Mushrif)

Navid Mushrif

आता महत्वाचा प्रश्न गोकुळचं काम कसं चालतं. तर सुरुवात करू गाव लेव्हलपासून. कोल्हापूरच्या आसपासच्या हजारो गावांमध्ये छोट्या-छोट्या दूध उत्पादक संस्था आहेत. संस्था म्हणजे शेतकऱ्यांचे गट आहेत, जे दररोज त्यांच्या सदस्यांकडून दूध गोळा करतात. म्हणजे गावातले शेतकरी रोज त्यांचं दूध जमा या संस्थांमध्ये जमा करतात. आता हे सगळे गावपातळीवरचे दूध संघ मुख्य जिल्हास्तरीय सहकारी संस्थेचे, म्हणजेच गोकुळ मिल्क फेडरेशनचे सदस्य आहेत.(Political News)

त्यामुळे मग गावातून दूध जमा झालं की मग गोकुळचं काम सुरू होतं. गोकुळ सगळ्या सोसायट्यांमधून दूध गोळा करतं, त्यासाठी शीतकरण केंद्रं चालवतं, दुधावर प्रक्रिया करणारी यंत्रं चालवतं आणि मग दूध, दही, तूप, पनीर वगैरे सगळं बनवून बाजारात विकतं. विक्रीतून जो पैसा येतो, तो परत गावातल्या दूध संघांमार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो आणि खास गोष्ट म्हणजे, शेतकऱ्यांना दर दहा दिवसांनी त्यांच्या दुधाचे पैसे मिळतात. त्यामुळे दूध संघाशी त्यांचा बॉण्ड अजूनच स्ट्रॉंग असतो. कारण शेतकऱ्यांच्या डे टू डे जगण्याचा खर्च याच दुधाच्या पैशातून निघत असतो.(Navid Mushrif)

गोकुळ फक्त दूध गोळा करून विकतच नाही, तर शेतकऱ्यांना पशुखाद्य देतं, दिवाळीला बोनसचा लाभांश वाटतं. त्यामुळे ज्याची गोकुळवार सत्ता आहे त्यांना या शेतकऱ्यांशी थेट जुडता येते. गोकुळवरील सत्तेच्या माध्यमातून या दूध उत्पादक शेतकऱ्यांची एक वोट बँक बनवता येते. महत्वाचं म्हणजे जर दहा दिवसांनी पैसे वाटता येत असल्याने आणि वर्षभर हे चालू असल्याने सहकारी साखर कारखान्यांपेक्षाही ही वोट बँक जास्त इफेक्टिव्ह मनाली जाते. मात्र केवळ शेतकऱ्यांशी कनेक्ट होता येतं हा एकंच फॅक्टर नाहीये. गोकुळची अजून एक जमेची बाजू म्हणजे गोकुळकडे एक फिक्स आणि हक्काचं मार्केट आहे. ते म्हणजे मुंबई. गुजराती मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी गोकुळला मुंबईत पाय रोवायला मदत केली. त्याचं फलित म्हणजे मुंबईला दररोज 5 लाख लिटर दूध पुरवठा गोकुळामार्फत केला जातो. यातही पुन्हा संधी आहे. हा दूध पुरवठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात टँकर लागतात, आणि या टँकर कॉन्ट्रॅक्टची मलई लाटायला सगळ्यांची चढाओढ असते. सतेज पाटलांनी जेव्हा महाडिकांची ३० वर्षांची गोकुळवरील सत्ता उलथून टाकली होती तेव्हा हा टॅंकरचा आरोप महत्वाचा ठरला होता.(Political News)

Navid Mushrif

सोबतच जवळपास गोकुळचा एवढा मोठा आवाका त्यात आपल्या समर्थकांना नोकरी लावण्याची संधी त्यामुळंही गोकुळचं अध्यक्षपद अनेकांना हवं असतं. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या सर्व कनेक्टमुळे गाव लेव्हलच्या राजकारणात गोकुळची सत्ता महत्वाची ठरते. त्यामुळेच मग स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूक डोळ्यसमोर ठेऊनच मुख्यमंत्र्यांनी गोकुळचा अध्यक्ष महायुतीचाच करण्याची सूचना केली होती, असं सांगितलं जातं. महत्वाचं म्हणजे ही सहकारी संस्था असल्याने पक्षीय राजकारणाला संस्थेच्या कामकाजात स्थान नसलं पाहिजे असा अलिखित नियम आहे. मात्र गोकुळचं सतत वाढत जाणारं महत्व पाहता यात पक्षीय राजकारण येणारच होतं आणि तेच या निवडणुकीच्या निमित्ताने समोर आलं.(Navid Mushrif)

===============

हे देखील वाचा : Sudesh Mhashilkar : अभिनेत्री प्राची पिसाटच्या आरोपांवर सुदेश म्हशीलकर यांचे स्पष्टीकरण

===============

गोकुळ ही कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो गावपातळीवरील दूध सोसायटींनी बनलेली एक सहकारी संस्था. आता या संस्थेचं संचालक मंडळ निवडायचं असतं. त्यासाठी प्रत्येक गावातली दूध सोसायटी आपला एक प्रतिनिधी संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी पाठवते. त्यानंतर मग या प्रतिनिधींच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमधून संचालक निवडले जातात, ज्यामुळे सर्व क्षेत्रातील प्रतिनिधित्व सुनिश्चित होतं.(Political News)

एकदा संचालक मंडळ निवडलं की, ते गोकुळ दूध महासंघासाठी मुख्य निर्णय घेणारी मॅनेजिंग बॉडी बनतात. मंडळात सामान्यतः प्रभावशाली स्थानिक नेते आणि सदस्य संस्थांचे प्रतिनिधी असतात. त्यानंतर येते चेअरमनची निवड. ही निवड सामान्य जनतेद्वारे किंवा सर्व सोसायटी सदस्यांद्वारे थेट केली जात नाही. त्याऐवजी, नवनिर्वाचित संचालक मंडळ स्वतःमधून चेअरमन निवडण्यासाठी बैठक घेतं. चेअरमनच्या बाबतीत एक अनौपचारिक व्यवस्था आहे जिथे चेयरमनचे पद दर दोन वर्षांनी वेगवेगळ्या गटांमध्ये किंवा नेत्यांमधील राजकीय करारांवर अवलंबूनअसतं.(Navid Mushrif)

त्यामुळेच मग आता अर्जुन डोंगळे यांच्या राजीनाम्यानंतर संचालक मंडळाने एकमताने नाविद मुश्रीफ यांची निवड केली आहे. गोकुळचं महत्व असं आहे की, यातून फक्त दूधच नाही, तर गावागावातलं राजकारण आणि वोट बँकही सांभाळली जाते. म्हणूनच गोकुळची सत्ता कोल्हापूरच्या राजकारणाचा कणा आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.