फारुख माणेकशा इंजिनिअर याचा जन्म २५ फेब्रुवारी १९३८ रोजी मुंबईमध्ये झाला. फारुख इंजिनिअर ह्याचे शिक्षण माटूंगा येथील पोद्दार कॉलेजमध्ये झाले. फारुखभाई पहिला कसोटी सामना १ डिसेंबर १९६१ रोजी खेळले. त्याने १९६५ मध्ये सिलोन विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये शतक ‘ठोकले’ होते. ते शतक फक्त १०० मिनिटामध्ये केले होते. त्याच सामन्यामध्ये त्याने यष्टिरक्षण करताना सात झेलही पकडले होते. त्याच वर्षी न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या सामन्यामध्ये खेळताना ११७ मिनिटामध्ये ९० धावा केल्या. दुलीप ट्रॉफीमध्ये लंचपूर्वी पहिले शतक करणारा पहिला म्हणून फारुख इंजिनिअर (Farokh Engineer) याचेच नाव घ्यावे लागेल.
त्याची खरी खेळी बघायची असेल तर चेन्नईला त्याने १९६७ साली वेस्ट इंडिजविरुद्ध सॉलिड शतक केले होते. त्यावेळी त्याने त्या मालिकेमध्ये वेस्ली हॉल, ग्रिफिथ आणि सोबर्स यांच्या गोलंदाजीला पार झोडले होते, उपहारापूर्वीच त्याने ९४ धावा केल्या होत्या. त्यावेळी त्याने पुलचे फटाके आणि ड्राइव्ह चे फटकारे खेचून त्या तिघांना पार नामोहरम केले होते.
तो लँकेशायरमध्ये असताना, तिथे खेळल्यामुळे त्याच्या यष्टिरक्षणामध्ये एकप्रकारचे वेगळेपण आले होते. त्यावेळी सर नेव्हिल कार्ड्स आणि जॉन आर्लाद यांच्यासारख्या नामवंत टीकाकारांकडून त्याने शाबासकी मिळवली होती. जेव्हा भारतीय संघ १९६७ साली इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला असताना ‘लँकेशायर’ ने त्यांच्याशी करारबद्ध होण्याची विनंती केली आणि फारुख इंजिनिअरने ही विनंती तात्काळ मान्य केली. परंतु पहिला हंगाम त्याला फारसा यशस्वी ठरला नाही ४२ डावांमध्ये फक्त ७४७ धावा झाल्या. कारण भारतीय हवामानामध्ये आणि खेळपट्टीवर सुरवातीच्या कारकिर्दीचा वेळ घालवल्यामुळे वयाच्या ३० व्या वर्षी इंग्लिश वातावरणाशी जुळवून घेणे त्याला अवघडच गेले. १९६९ पर्यंत त्याने यष्टीरक्षक म्ह्णून चांगलेच नाव कमावले त्यामुळे त्याचा करार त्यावेळी १९७३ पर्यंत लँकेशायरने वाढवला. त्यामध्ये त्या संघामध्ये क्लाइव्ह लॉईड असणे खूप स्फूर्तिदायक होते पण त्या क्लबमध्ये खरी जान आणली ती फारुख इंजिनिअरनेच .
मला आठवतय संपूर्ण इनिंग यष्टींमागे उभे राहून फलंदाजीसाठी ओपनिग करणारा फारुख इंजिनीअर चांगली सुरवात करून देत असे. कधी कधी हाफ पिचवर येऊन दणकून झोडायचा. तो यष्टिरक्षण करायचा किंवा फलंदाजी करायचा तेव्हा त्याचा मूर्तिमंत उत्साह दिसून येत असे. खरे तर कपाडिया, डी. बी. हिंदळेकर, गॉडफ्रे एव्हन्स या थोर यष्टिरक्षकांच्या मालिकेत त्याचा समावेश केला तरी वावगे ठरणार नाही.
यष्टिरक्षण करताना जो झेल पहिल्या स्लिपवर घेतला जात असे त्याच्यावर हक्काने झेप घेऊन तो झेल फारुखभाई घेत असे. एकतर प्रचंड उत्साह आणि प्रचंड ताकद ह्यायोगे तो असाध्य गोष्ट करत असे. सुदैवाने फारुखभाईना मी अनेक वेळा भेटलो माझ्या स्वाक्षरी छंदासाठी त्यांनी मला मदतही केली.
फारुख इंजिनीअर याने ४६ कसोटी सामन्यांमध्ये २६११ धावा केल्या यामध्ये २ शतके आणि १६ अर्धशतके होती. त्यांची कसोटी समान्यांमधील सर्वोच्च धावसंख्या होती १२१. त्याने यष्टीरक्षण करताना ६६ झेल घेतले आणि १६ जणांना स्टंम्पिग करून बाद केले. त्याने ५ एकदिवसायीय सामन्यामध्ये ११४ धावा केल्या त्यामध्ये त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती नाबाद ५४. फारुख इंजिनिअर यांनी ३३५ फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये १३,४३६ धावा केल्या. त्यामध्ये १३ शतके आणि ६९ अर्धशतके केली. त्यामध्ये सर्वोच्च धावसंख्या होती १९२ तर यष्टीरक्षण करताना त्याने ७०४ झेल घेतले आणि १२० जणांना स्टंम्पिग करून बाद केले.
हे देखील वाचा: ‘रन मशीन’ वसिम जाफर!
फारुख इंजिनिअर शेवटचा कसोटी सामना २३ जानेवारी १९७५ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला. फारुख इंजिनिअर यांना १९६५ मध्ये इंडियन क्रिकेटिअर अवॉर्ड दिले तर भारत सरकारने त्यांना १९७३ साली पद्मश्री देऊन त्यांचा सन्मान केला.
फारुख इंजिनिरअर बद्दल सांगता येईल सुमारे २ वर्षांपूर्वी अफवा सोशल मीडियावर पसरली की फारुखचे निधन झाले पण तो जिवंत होता, मीडियाने त्याला त्याबद्दल विचारले असता त्याने भन्नाट उत्तर दिले आणि तोच तसे उत्तर देऊ शकतो, तो म्हणाला, वयाच्या ७८ व्या वर्षी देखील मी व्हायग्रा वापरत नाही असा हा भन्नाट बाबाजी.
लेखक- सतीश चाफेकर