Bhavesh Bhatia Success Story : भावेश भाटिया हे नाव केवळ एक यशस्वी उद्योजक म्हणूनच नव्हे, तर अपार आत्मविश्वास, चिकाटी आणि प्रेरणादायी जीवनयात्रेचे प्रतीक म्हणूनही ओळखले जाते. ते जन्मतःच दृष्टिहीन नव्हते, पण Retinitis Pigmentosa या दुर्धर डोळ्यांच्या आजारामुळे वयाच्या 20 व्या वर्षी त्यांची दृष्टी पूर्णपणे गेली. ही अंधारलेली वाट भविष्यात त्यांच्यासाठी आशेचा प्रकाश घेऊन आली, आणि त्यांनी ‘सनी कॅन्डल्स’ या मेणबत्ती उद्योगाच्या माध्यमातून यशाचा दिवा पेटवला.
भावेश यांचा जन्म मुंबईत झाला. शालेय जीवनात ते अत्यंत हुशार विद्यार्थी होते. डोळ्यांच्या कमी होत चाललेल्या दृष्टिमुळे त्यांनी अनेक अडचणींना तोंड दिलं. दृष्टी पूर्णपणे गेल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी रिहॅबिलिटेशन कोर्स केला, ब्रेल शिकले आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी झगडले.

Bhavesh Bhatia
भावेश भाटिया भाड्याच्या एका लहानशा खोलीत मेणबत्त्या बनवण्याचे प्रशिक्षण घेऊन व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला फक्त 2 किलो मेण, एका ओव्हन आणि काही साच्यांच्या मदतीने त्यांनी काम सुरू केलं. त्यांच्या मेणबत्त्यांची गुणवत्ता, सुगंध आणि डिझाइन पाहून ग्राहक आकर्षित होऊ लागले. हळूहळू त्यांनी त्यांच्या उत्पादनांना विविध हॉटेल्स, मंदिरे आणि डेकोरेशन उद्योगांमध्ये विक्रीसाठी प्रस्थापित केलं.
==============
हे ही वाचा :
Jayanti Kale : 80 व्या वर्षीही स्विमिंग करणाऱ्या आजींची प्रेरणादायी कथा
================
आज ‘सनी कॅन्डल्स’ ही कंपनी 900 हून अधिक प्रकारच्या मेणबत्त्या तयार करते. त्यांचे उत्पादन देशविदेशात निर्यात होते. विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या कंपनीमध्ये 80% कर्मचारी हे दिव्यांग घेतले आहेत. “दृष्टिहीन असलो तरी दृष्टीहीन नाही” हे त्यांचं ब्रीदवाक्य बनलं आहे.भावेश भाटियांनी केवळ व्यवसायच नव्हे तर सामाजिक कार्यातही महत्त्वाचं योगदान दिलं आहे. त्यांनी National Association for the Blind (NAB) या संस्थेसोबत काम करत अनेक दृष्टिहीन तरुणांना रोजगार आणि प्रशिक्षण दिलं आहे. त्यांच्या या यशाची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. पद्मश्री सन्मानासाठी त्यांची शिफारस झाली होती. तसेच TEDx सारख्या व्यासपीठांवर त्यांनी त्यांच्या जीवनकथेद्वारे लाखो लोकांना प्रेरित केलं आहे.