उन्हाळ्यात सर्वत्र दिसणारे मुख्य फळ म्हणजे आंबा. एप्रिल महिना सुरु झाला की, मोठ्याप्रमाणात आंबा विक्रीस येतो. तो थेट पहिला पाऊस पडेपर्यंत आंब्याची विक्री मोठ्याप्रमाणात होते. या आंब्यासारखेच आणखी एक फळ मोठ्याप्रमाणात बाजारात विक्रीसाठी येते. हे फळ अगदी आंब्याच्या उलट. छोटे आणि रंगानं लाल. पण या फळाचे फायदे मात्र आंब्याच्या दुप्पट आहेत. कारण भर उन्हाळ्यात हे फळ खाल्यानं पाण्याची तहान भागते. शिवाय त्यातील पोषक द्रव्यांमुळे शरीराचा वाढत्या उष्णतेपासून बचावही होतो. हे फळ म्हणजे लिची (Lychee) होय. वरुन लालचुटूक साल आणि आत पांढरा गर, मध्ये मोठी बी असणारे हे फळ गोड पाण्याचे मोठे साधन आहे. बाहेर फिरायला गेल्यावर सतत लागण्या-या तहान आणि भुकेसाठी या फळाचा चांगल्याप्रकारे वापर करता येतो.
भारतात जास्त करुन बिहार राज्यात लिचीचे (Lychee) उत्पादन घेतले जाते. लिचीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स, पोटॅशियम आणि फायबर यांचे मोठे प्रमाण असते. लिची हे एक स्वादिष्ट आणि पौष्टिक फळ आहे. हे फळही आंब्यासारखे एप्रिल महिन्यापासून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होते. साधारण जून महिन्यापर्यंत लिची बाजारात मिळतात. लिचीचे मुळ चीनमध्ये असल्याचे सांगण्यात येते. मात्र भारतात अलिकडे बिहार पाठोपाठ उत्तर प्रदेशातही मोठ्या प्रमाणात लिचीचे उत्पादन घेतले जाते. लिची गोड असते. अलिकडे लिचीचा वापर ज्यूस आणि जेली करण्यासाठीही मोठ्या प्रमाणात होत आहे.
लिची (Lychee) खाण्याचे फायदे अनेक आहेत. लिचीमध्ये उच्च व्हिटॅमिन सी असल्यामुळे त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. शिवाय लिचीमधील फायबर पचनक्रीया सुधारण्यास मदत करते, आणि बद्धकोष्ठता टाळते. लिचीमध्ये चरबी आणि सोडियमचे प्रमाण फार कमी असते. याशिवाय पोटॅशियमचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे ह्दय निरोगी रहाते. लिचीमध्ये असलेली फ्लेव्होनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्स ही गुणधर्म शरीरातील उषणता कमी करण्यास मदत करतात. लिचीमध्ये कॅलरीचे प्रमाण सर्वाधिक कमी असते. मात्र लिची फायबरनी परिपूर्ण असतात. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी लिचीचा वापर आहारात नक्की करावा. लिचीमध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण भरपूर असल्यामुळे त्वचा तजेलदार राहते. त्वचेला आवश्यक असलेले पूरक घटक लिचीमध्ये (Lychee) असतात. त्यामुळे लिची खाल्यानं चेहऱ्यावरील सुरकुत्याही नियंत्रणात राहतात असे सांगण्यात येते. लिचीचे फेसपॅकही उपलब्ध असून लिचीमुळे त्वचा मुलायम राहते. चेहर्यावर पिंपल्सचे डाग असल्यास त्यावर लिची औषधासारखी उपयोगी पडते. उन्हाळ्याच्या दिवसात डिहायड्रेशनचा त्रास होतो. अशावेळेस लिची खाल्यास त्याचा फायदा होतो. लिची हे पाणीदार फळ आहे. शिवाय लिचीही गोड असते. त्यामुळे उन्हाळ्यात जाणवरा थकवा या लिचीमुळे कमी होतो. लिचीमधील किमोप्रोटेक्टिव घटक ब्रेस्ट कॅन्सर सेल्स आणि ट्युमर यांची निर्मिती होण्याचं प्रमाण कमी करण्यास फायदेशीर होतात, असं स्पष्ट झालं आहे. लिचीचे (Lychee) सेवन केल्यास कॅन्सरपासूनही बचाव होऊ शकतो. शरीराची रोगप्रतिकारक्षमता सुधारण्यास लिचीची मदत होते. याशिवाय महत्त्वाचं म्हणजे, लिची नियमीत खाल्यास सर्दी खोकल्यावरही नियंत्रण ठेवता येते.
======
हे देखील वाचा : आर्टिफिशियल स्विटनरचा वापर करत असाल तर व्हा सावध
======
लिची (Lychee) खाल्याचे जसे फायदे आहेत, तसेच लिचीमुळे शरीरावर दुष्परिणामही होऊ शकतात. मुळात लिचीचे फळ अनेकवेळा न धुताच खाल्ले जाते. हे सर्वात धोकादायक होऊ शकते. कारण या फळावरही औषध फवारणी झाली असते. ही रासायनिक औषधे थेट पोटात जाऊ शकतात. त्यामुळे फायद्याऐवजी तोटाच अधिक होऊ शकतो. आणखी महत्त्वाचे म्हणजे, बरेच वेळा लिची विकतांना विक्रेते लिचीचे घड लाल रंगाच्या पाण्यात बुडवतात. हा रासायनिक रंग फळावर बसवला जातो आणि जर असेच लिचीचे फळ खाल्ले तर हा रंग पोटातही जाण्याची शक्यता असते. त्यामुळे लिचीचे फळ धुवून खाणे गरजेचे असते. याशिवाय लिची फळ हे आम्लयुक्त आहे त्यामुळे त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने ऍसिड रिफ्लक्स, छातीत जळजळ आणि इतर पाचक समस्या उद्भवू शकतात. याशिवाय लिचीचे सरबतही बनवण्यात येते. मात्र त्याच्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. अशावेळी अगदी कमी प्रमाणात हे सरबत घ्यावे. लिची उन्हाळ्यात भारतात गल्लोगल्ली विकतांना दिसतात. भारतात ही ताजी लिची खाल्ली जाते. तशीच परदेशात लिची सुकवूनही खाल्ली जाते. विशेषतः लिचीचे मुळ असलेल्या चीनमध्ये लिचीचे (Lychee) फळ सुकवून खाल्ले जाते. सुकवतांना त्याची बी काढून टाकली जाते. अशा सुक्या लिचीला (Lychee) तेथे लिची-नट असे म्हटले जाते. या लिची नटचे युरोप आणि अमेरिकेत मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. लिची फळाचे आयुष्य फार नसते. हे फळ लवकर खराब होते. त्यामुळे अशापद्धतीनं ते सुकवले तर त्याची गुणवत्ता वाढतेच शिवाय ते अधिक काळ टिकते आणि त्यापासून नफाही अधिक मिळतो. भारतातही आता अशाप्रकारे लिचीच्या निर्यात वाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
सई बने