2023 मध्ये काय होणार याबाबत चर्चा सुरु झाली आहे. तिसरे महायुद्ध होणार का…परग्रहावरील कोणी एलियन येऊन मानवाच्या अस्तित्वालाच आव्हान देणार आहे का…याचीही चर्चा आहे. या सर्वांत कोरोना नावाचा आजार आहेच. जगाला बेजार करणा-या कोरोनानं पुन्हा चीनमध्ये (China) डोकं वर काढलं आहे, नुसतच डोकं वर काढलं असं नव्हे तर सर्व चीनलाच कोरोनानं व्यापलं आहे. तेथील मृत्यूदर बघून जगामध्ये भीतीचे वातावरण आहे. अगदी अमेरिका, जपान आणि लंडनमध्येही कोरोनाच्या केसेस वाढत आहेत. पण ज्या देशानं जगावर पुन्हा महामारीचे संकट टाकले आहे, त्या देशाचं नेमकं काय चालू आहे, हे ऐकल्यावर डोक्यावर हात मारुन घ्याल. कारण चीनमधील (China) बहुतांश जनता कोरोनाच्या तापानं ग्रस्त असताना आणि कोरोनाग्रस्तांसाठी पुरेसा औषधांचा साठाही उपलब्ध नसताना हा देश दुस-याच मोहीमेवर व्यस्त आहे. ही मोहीम म्हणजे चंद्रावर आपला हक्क साबित करण्याची….होय, खुद्द अमेरिकी अंतराळ संस्था, नासानंच ही भीती व्यक्त केली आहे. या वर्षात भारतासह अन्य चार देश मोठ्या अंतराळ मोहीमा आखण्याच्या तयारीत आहेत. मात्र या सर्वात चीननं आघाडी घेतली आहे. नुसती मोहीम आखण्यापुरताच चीनचा (China) मनसुबा नाही तर चंद्रावर आपला हक्क सांगण्याची तयारीही हा देश करत आहे.
2023 मध्ये जगातील 5 मोठ्या अंतराळ मोहिमा या लक्षवेधी ठरणार आहेत. यावर्षी भारतासह. जपान आणि देश अंतराळ मोहिमा सुरू करणार आहेत. अंतराळ मोहिमेनुसार हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे मानले जात असतानाच चीनच्या (China) घातक मोहिमेची माहिती नासानं दिली आहे. अंतराळ तंत्रज्ञानासाठीही 2023 वर्ष अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. यावर्षी जगातील महत्त्वाच्या अंतराळ मोहिमा होणार असून जगभरातील तंत्रज्ञानांची त्यावर नजर आहे. भारताची खाजगी अंतराळ कंपनी स्काय रूटही पहिल्या 3D प्रिंटेड रॉकेटने प्रक्षेपित करणार आहे. मात्र यासोबत चीनचे मून मिशन चर्चेत आले आहे. चीनने (China) चंद्रावर थेट ताबाच मिळवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नासासारख्या संस्थेनं चिंता व्यक्त केली आहे. नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांनी हा इशारा दिला आहे. अमेरिका आणि चीन या दोन देशांमधील अवकाश मोहीमांच्या शर्यतीत चीननं अमेरिकेलाही मागे टाकल्याची चर्चा आहे.
चंद्राच्या पृष्ठभागावर मानवी जीवन शोधण्यासाठी जगातील सर्व देशांमध्ये शर्यत सुरू आहे. मात्र, या शर्यतीत अमेरिका आणि चीन आघाडीवर आहेत. आता चीन अमेरिकेच्या पुढे जात असल्याचे दिसून येत आहे, ही चिंता नासाला सतावत आहे. मध्यंतरी करोनाच्या सावटाखाली जग असतांना चीननं मात्र आपल्या अंतराळ मोहीमेला कसलाही निधी कमी पडू दिला नाही. शिवाय जगाला या रोगाच्या मागे व्यस्त ठेऊन चीननं आपले घातक मनसुबे पूर्ण केल्याची भीती नासाला आहे. आता तर नासाला भीती आहे की, चीन (China) चंद्रावर ताबा घेईल. एवढंच नाही तर इतर देशांचे लँडिंग सुद्धा चीन थांबवू शकेल अशी भीती नासाला वाटत आहे. नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांनी याबाबतचा इशारा दिला आहे. चीन चंद्रावर पाय ठेवण्याचा प्रयत्न करणार नाही याची प्रथम काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नेल्सन म्हणाले की, चीन केव्हाही चंद्राच्या संसाधनांनी समृद्ध प्रदेशांच्या मालकीचा दावा करू शकतो. दुसरीकडे, वॉशिंग्टनमधील चिनी दूतावासाचे प्रवक्ते लिऊ पेंग्यू यांनी अमेरिकेचे दावे खोटे असल्याचे वक्तव्य केले आहे. चीन अवकाश क्षेत्रात मानवजातीच्या सामायिक भविष्यासाठी सक्रियपणे काम करत आहे, आणि मानवाच्या विकासासाठी कायम प्रयत्न करत राहील असेही चीनी प्रवक्त्यांनी सांगितले आहे. मात्र असे असले तरी चीनचे बोलायचे दात वेगळे असतात, याचा अनुभव आत्तापर्यंत जगानं घेतला आहे.
========
हे देखील वाचा : फ्रांन्समध्ये फुकटात कंडोम का दिले जातायत?
========
दुसरीकडे जगभरात अंतराळ मोहीमांची तयारी सुरु आहे. या वर्षी प्रक्षेपित होणार्या महत्त्वाच्या अंतराळ मोहिमांमध्ये जपानचे डिअरमून आणि नासाच्या लघुग्रह मोहिमेचाही समावेश आहे. या वर्षात, SpaceX ची अंतराळ मोहीम मह्त्त्वाची आहे. तर जपानच्या अंतराळ मोहिमेत 8 जणांची टीम चंद्राभोवती फिरून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. या मोहिमेच्या यशावर अवकाश पर्यटनाचे भवितव्यही अवलंबून आहे. याबरोबरच भारताची पहिली खाजगी अंतराळ कंपनी स्काय रूट या वर्षी आणखी एक उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. 3D-प्रिंटेड रॉकेटच्या निर्मितीला गती देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे खाजगी प्रक्षेपणाचा खर्च कमी होईल. या वर्षी दोन खासगी कंपन्याही रॉकेट लॉन्च करणार आहेत. या सर्व मोहिमा एकीकडे होत असतांना चीनच्या मोहिमेबाबत कमालीची गुप्तता ठेवण्यात आली आहे. त्यामुळेच नासाला चीन थेट चंद्रावरच आपला दावा सांगणार नाही ना याची चिंता सतावत आहे.
सई बने