Home » दहा हजार आणि अधिका-याचा धक्कादायक मृत्यू

दहा हजार आणि अधिका-याचा धक्कादायक मृत्यू

by Team Gajawaja
0 comment
Aditya Vardhan Singh
Share

उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील नानामाऊ गंगा घाटावर दोन दिवसापूर्वी झालेली घटना धक्कादायक आहे. गंगा नदीत सूर्याला अर्घ्य देण्यासाठी गेलेले आरोग्य विभागाचे उपसंचालक आदित्य वर्धन सिंह हे नदीत वाहून गेले. आदित्य सिंह पट्टीचे पोहणारे होते. त्यामुळे ते सुरक्षाकवचाच्या पुढे गेले होते. पण गंगा नदीचा प्रवाह एवढा जोरदार होता की त्यांचा तोल गेला, आणि ते प्रवाहाबरोबर वाहू लागले. त्यांचे मित्र यावेळी गंगा घाटावर उभे होते. आपल्या मित्राचा जीव धोक्यात आहे, याची जाणीव झाल्यावर त्यांनी घाटवार असलेल्या सुरक्षा रक्षकांना मदत करण्याची विनंती केली. मात्र या सुरक्षा रक्षकांनी रोख दहा हजार रुपये द्या अशी मागणी केली. ही पैशांची जमवाजमव करेपर्यंत आदित्य वर्धन सिंह हे गंगा नदीच्या प्रवाहात सामावून गेले. (Aditya Vardhan Singh)

आपल्या मित्राचा आपल्या समोर झालेला हा अपघात आणि त्याला वाचवण्यास आलेले अपयश यामुळे आदित्य वर्धन यांच्या मित्रांना जबर धक्का बसला आहे. आदित्य वर्धन सिंगचे यांचे कुटुंब सधन कुटुंब म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांच्या पत्नी महाराष्ट्रातील पुण्यात न्यायाधिश म्हणून नियुक्त आहेत. तर त्यांचा भाऊ आय़एएस अधिकारी आहे. शिवाय आदित्य वर्धन यांचे वडिल निवृत्त सरकारी अधिकारी आहेत. मात्र एवढी मातब्बर मंडळी असूनही आदित्य वर्धन यांचा जीव वाचावता आला नाही. या घटनेचा सर्व दोष त्यांच्या मित्र परिवारानं गंगा घाटावर उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांना दिला आहे. पण त्याचवेळी एका गोष्टीकडे दुर्लक्ष केले जात आहे, ते म्हणजे, आदित्य वर्धन हे नदीच्या धोकादायक पात्रात स्वतःहून गेले होते. सूर्याला अर्घ्य देतांनाचा फोटो त्यांना काढायचा होता, त्यासाठी त्यांनी हा धोका पत्करला. उत्तरप्रदेशमध्ये सध्या जोरदार पाऊस आहे. सर्वच नद्या या धोक्याच्या पातळीच्यावर आहेत. अशावेळी एका अधिका-यानं फोटो काढण्याच्या निमित्तानं धोकादायक पातळी पार करावी ही सुद्धा खेदजनक बाब आहे. (Aditya Vardhan Singh)

कानपूर आरोग्य विभागाचे उपसंचालक आदित्य वर्धन सिंह यांचा कानपूर जिल्ह्यातील उन्नावमधील बिल्हौर येथील नानामाऊ गंगा घाटावर दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना घडत असतांना आदित्य वर्धन यांचे मित्र गंगाघाटावर हजर होते. पण आपल्या मित्राला गंगा नदिच्या प्रवाहात वाहताना पाहण्याशिवाय ते काहीही करु शकले नाहीत. गेल्या तीन दिवसांपासून बचाव पथके त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र अद्यापही त्यात यश आले नाही. ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. कारण आदित्य वर्धन हे सरकारी अधिकारी होते. ते गंगा घाटावर गेले, तेव्हा त्यांच्यासोबत सरकारी फौजफाटा होता. पण एवढे असूनही त्यांचा जीव वाचवता आला नाही. आदित्य वर्धन सिंह आपल्या मित्रांसह गंगा घाटावर सकाळची प्रार्थना करण्यासाठी पोहोचले होते. त्यांना सूर्याला अर्घ्य द्यायचे होते आणि त्याचा फोटोही क्लिक करायचा होता. आदित्य स्वतः उत्तम जलतरणपटू असल्यामुळे ते गंगा घाटावर लावण्यात आलेले सुरक्षिततेच्या साखळ्या पार करुन खोल पाण्यात गेले. आदित्य हे मोठे अधिकारी असल्यामुळे त्यांना असे धोकादायक पाऊल टाकण्यापासून कोणी अडवलेही नाही. पण गंगा नदिच्या प्रवाहात जातात त्यांना धोका जाणवला. (Aditya Vardhan Singh)

काही क्षणातच त्यांचा तोल गेला आणि ते लाटांबरोबर फेकले जाऊ लागले. नदिच्या प्रवाहात पोहण्याची आणि काठावर येण्याची त्यांची धडपड बघून घाटावर उभ्या असलेल्या त्यांच्या मित्रांना धोक्याची जाणीव झाली. त्यांनी लगेच घाटावर उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षकांकडे धाव घेतली. मात्र यावेळी या सुरक्षा रक्षकांनी नदिच्या प्रवाहात जाऊन आदित्य यांचा जीव वाचवण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम रोख द्या, अशीही अट ठेवली. एवढे पैसे आदित्य यांच्या मित्रांकडे नव्हते. मग या सुरक्षा रक्षकांनी गंगा घाटाशेजारी असलेल्या पानटपरीवर या मित्रांना नेले. तिथे ऑनलाईन पद्धतीनं पैसे जमा करण्यात आले, आणि मग आदित्य यांना वाचवण्याची मोहीम सुरु झाली. पण तोपर्यंत बराचसा वेळ झाला होता. गंगा घाटाच्यासमोर प्रवाहात बुडणारे आदित्य वर्धन गंगा नदीमध्ये सामावून गेले होते. आता या घटनेला तीन दिवस उलटून गेले आहेत. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे. आदित्य वर्धन यांच्या सर्व कुटुंबाला आणि मित्रपरिवाराल यामुळे मोठा धक्का बसला आहे. आपल्या समोर आपल्या मित्राचा जीव गेला, आणि आपण काहीही करु शकलो नाही, याचे दुःख त्यांच्या मित्रांना अधिक आहे. (Aditya Vardhan Singh)

==============

हे देखील वाचा :  मन्या सुर्वेचा एन्काऊंटर !

===============

आदित्य वर्धन सिंग उर्फ ​​गौरव हे एका प्रतिष्ठित कुटुंबातील आहेत. त्यांचे कुटुंब इंदिरानगर, लखनौ येथे राहते. त्यांचे वडील रमेशचंद्र पाटबंधारे खात्यातील वरिष्ठ पदावरून निवृत्त झाले आहेत. आदित्यची पत्नी श्रेया, या महाराष्ट्रातील पुण्यात न्यायाधीश म्हणून नियुक्त आहेत. त्यांचा भाऊ आयएएस अधिकारी आहे. आदित्य वर्धन सिंगची बहीण प्रज्ञा ही ऑस्ट्रेलियात स्थायिक आहे. या कुटुंबाला ४५ वर्षीय आदित्य यांच्य़ा मृत्यूची बातमी मिळाली आणि मोठा धक्का बसला आहे. फोटो काढण्यासाठी गंगा नदिचे सुरक्षा पात्र सोडून पुढे जाणे ही आदित्यसाठी जीवघेणी चूक ठरली. त्यांच्या मृत्यूबाबत आता चौकशी सुरु आहे. तसेच सुरक्षा रक्षकांचीही चौकशी सुरु आहे. यात त्यांनी आपण फक्त बोटीच्या पेट्रोलसाठी पैसे मागितल्याचे स्पष्ट केले आहे. याप्रकरणी आता आरोप प्रत्यारोप होत असले तरी, उपसंचालक असलेल्या एका अधिका-याचा असा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होत आहे. (Aditya Vardhan Singh)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.