तुर्कीमध्ये झालेल्या एका मोठ्या विमान अपघातामुळे खळबळ उडाली आहे. या अपघातात लिबियाचे लष्करप्रमुख मुहम्मद अली अहमद अल-हद्दाद यांच्यासह आठ जणांचा मृत्यू झाला असून अपघातानंतर अंकारा विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले आहे. लिबियासाठी हा एक अतिशय दुःखद क्षण असून अपघातामुळे लिबियामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. लिबियाचे पंतप्रधान अब्दुल हमीद दबेबाह यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त करुन चौकशीचे आदेश दिले आहेत. लिबियाच्या विभाजित सैन्यांना एकत्र करण्याच्या प्रयत्नांमध्ये मुहम्मद अली अहमद यांचा महत्त्वाचा वाटा होता. ज्या शेवटच्या बैठकीनंतर त्यांचा अपघाती मृत्यू झाला, त्यामध्येही लष्करी बळाबाबत काही करार झाले. मात्र मुहम्मद अली अहमद यांच्यासह त्यांचे सर्वच शिष्टमंडळ अपघातात मारले गेल्यामुळे या करारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवाय या अपघातामुळे डसॉल्ट फाल्कन ५० जेट पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. हे विमान राफेल फायटर जेट बनवणारी फ्रेंच कंपनी डसॉल्ट एव्हिएशनने बनवले असून त्याचे उत्पादन आता बंद झाले आहे. त्यामुळेच मुहम्मद अली अहमद यांच्या अपघाताबाबत आता शंका उपस्थित कऱण्यात येत आहेत. ( Turkey Plane Crash )

Mohammed Ali Ahmed al-Haddad
तुर्कीमध्ये झालेल्या एका मोठ्या विमान अपघातामुळे जगभर खळबळ उडाली आहे. या अपघातात लिबियाचे लष्करप्रमुख मुहम्मद अली अहमद अल-हद्दाद यांच्यासह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेमुळे लिबियाला प्रचंड मोठा धक्का बसला आहे. मुहम्मद अली अहमद यांच्यासह त्यांचे सहकारी असलेल्या अधिका-यांची एक फळीच गायब झाल्यामुळे लिबियाच्या संरक्षण यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या खाजगी जेटमध्ये लिबियाचे लष्करप्रमुख, इतर चार अधिकारी आणि तीन क्रू मेंबर्स होते. अपघातानंतर विमानात बसलेल्या सर्वांचाच मृत्यू झाला आहे. प्राथमिक दृष्ट्या हा अपघात तांत्रिक बिघाडांनी झाल्याचे सांगण्यात येत असले तरी ज्या विमानातमध्ये लिबियाचे लष्करप्रमुख आणि त्यांचे शिष्टमंडळ प्रवास करीत आहे, त्याची उड्डानापूर्वी चाचणी झाली नव्हती का, हा प्रश्नही आहे. मंगळवारी रात्री ८:३० वाजता अंकाराच्या एसेनबोगा विमानतळावरून मुहम्मद अली अहमद यांच्या विमानाने उड्डाण केले. सुमारे ४० मिनिटांनी या विमानाशी संपर्क तुटला, त्यानंतर फाल्कन-५० खाजगी जेटचे अवशेष तुर्की जेंडरमेरीला हायमाना जिल्ह्यातील केसिकावाक गावापासून सुमारे दोन किलोमीटर दक्षिणेस सापडले. खराब हवामानामुळे विमानाशी संपर्क तुटला असे सांगितले गेले आहे. विमानाने यापूर्वी अंकाराच्या दक्षिणेस असलेल्या हैमाना जिल्ह्याजवळ आपत्कालीन लँडिंग सिग्नल पाठवला होता. त्यानंतर काही मिनिटांनंतर, हायमाना जिल्ह्याच्या आकाशात एक तेजस्वी प्रकाश दिसला आणि विमान कोसळले.
या अपघातात ज्यांचा मृत्यू झाला, त्यामध्ये ग्राउंड फोर्सेस चीफ ऑफ स्टाफ अल-फितौरी गरिबिल, मिलिटरी मॅन्युफॅक्चरिंग अथॉरिटीचे संचालक महमूद अल-कतावी, अल-हद्दादचे सल्लागार मुहम्मद अल-असावी दियाब आणि लष्करी छायाचित्रकार मुहम्मद उमर अहमद महजूब यांचा समावेश आहे. पंतप्रधान दबेबेह यांनी ही घटना म्हणजे, लिबियासाठी मोठी हानी असल्याचे सांगितले आहे. प्रामाणिकपणा आणि समर्पणाने आपल्या देशाची सेवा करणाऱ्या आणि शिस्त, जबाबदारी आणि राष्ट्रीय वचनबद्धतेचे उदाहरण असलेल्या व्यक्तींना देशानं गमावले असल्याचे निवेदनही त्यांनी जाहीर केले आहे. ( Turkey Plane Crash )
मात्र आता या अपघातानंतर जे खुलासे होत आहेत, त्यामुळे हा अपघात की घातपात हा संशय निर्माण झाला आहे. कारण एका वरिष्ठ तुर्की अधिकाऱ्याने सांगितले की, या विमानाने अपघातापूर्वी विद्युत बिघाडाची तक्रार केली होती आणि त्यांनी आपत्कालीन लँडिंगची विनंती देखील केली होती. लिबियाचे तुर्कीशी राजकीय संबंध ताणल्याचेही सांगण्यात येत आहे. यात मुहम्मद अली अहमद अल-हद्दाद हे पश्चिम लिबियातील सर्वोच्च लष्करी कमांडर होते आणि संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीतून झालेल्या वाटाघाटींअंतर्गत लिबियाच्या विभाजित सैन्यांना एकत्र करण्याच्या प्रयत्नांमध्ये ते एक प्रमुख म्हणून काम करत होते. तुर्कीच्या भेटीवर असतांना त्यांनी तुर्कीचे संरक्षण मंत्री यासर गुलेर आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेट घेतली. त्यांच्यासोबत काही करारही केले, मात्र या करारामध्ये लिबियाची आणि मुहम्मद अली अहमद यांची भूमिका काय होती, हे रहस्य आता कधीही खुले होणार नाही. या सर्वात मुहम्मद अली अहमद ज्या विमानामधून प्रवास करीत होते, त्याबाबतही शंका व्यक्त बोत आहेत.
=======
हे देखील वाचा : Bangladesh News : बांगलादेशात पत्रकारांचे जगणं झालंय कठीण
=======
डसॉल्ट फाल्कन ५० विमान हे हार्मनी जेट्सद्वारे चालवले जाणारे एक मध्यम आकाराचे, तिहेरी-इंजिन असलेले व्यवसायिक जेट आहे. हे विमान १९८८ मध्ये तयार करण्यात आले होते आणि त्यात १० प्रवाशांची बसण्याची क्षमता आहे. ते वाय-फाय आणि इतर आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. हे विमान राफेल फायटर जेट बनवणारी फ्रेंच कंपनी डसॉल्ट एव्हिएशनने बनवले आहे. तथापि, त्याचे उत्पादन आता बंद झाले आहे. फाल्कन ५० हे बिझनेस जेट ट्रान्सअटलांटिक फ्लाइटसाठी प्रसिद्ध आहे. सोबतच लष्करी आणि सरकारी कारणांसाठी देखील वापरले गेले आहे. राफेलप्रमाणेच, फाल्कन ५० मध्ये प्रगत एव्हियोनिक्स आणि विश्वासार्हता आहे. फाल्कन ५० ४१,००० फूट पर्यंत उडू शकते. त्याची लांबी १८.५२ मीटर, पंखांचा विस्तार १८.८६ मीटर आणि जास्तीत जास्त टेक-ऑफ वजन १७,३८१.६६ किलोग्रॅम आहे. त्याची उड्डाण श्रेणी अंदाजे ५,७०० किलोमीटर आहे. म्हणजेच हे विमान अटलांटिक ओलांडून न थांबता उडू शकते. त्याचा वेग ताशी ९१५ किलोमीटर आहे. या विमानाचा वापर अमेरिकेसह जगभरातील अनेक लष्करी अधिका-यांसाठी करण्यात येतो. फाल्कन ५० ची किंमत अंदाजे १७५ कोटी रुपये आहे. आता याच महागड्या विमानाची आणि त्याच्या अपघाताची चौकशी सुरु झाली आहे. त्यातून मुहम्मद अली अहमद यांच्या अपघातासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न होत आहे. ( Turkey Plane Crash )
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
