अमेरिका आणि भारत व्यापार संबंध ट्रम्प यांच्या टॅरिफच्या धमकीमुळे आधीच ताणले गेले आहेत. हे व्यापार संबंध आता सुधारणार अशी आशा होती. याबाबत उच्चस्तरावर चर्चा चालू असतांनाच पुन्हा अमेरिकेकडून आलेल्या बातमीनं भारतीय कृषी क्षेत्रात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता भारतीय तांदळावर टॅरिफ लावण्याचा इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी भारतातून येणा-या तांदळावर डम्प असा शब्दप्रयोग वापरुन कुणीही, कधीही आणि कितीही तांदूळ आमच्या देशात टाकू शकत नाही, म्हणत भारतातील तांदळाच्या आयातीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. (America VS India)

अमेरिकेने मोठ्या प्रमाणात शुल्क लादल्यामुळे भारत-अमेरिका संबंध आणि व्यापार संबंध आधीच ताणले गेले आहेत. आता, ट्रम्प यांनी अधिक शुल्क लादण्याचे संकेत दिले आहेत. खरं तर, ट्रम्प यांनी आरोप केला आहे की, भारत त्यांचे तांदूळ अमेरिकेत टाकत आहे. हे थांबवण्यासाठी, ट्रम्प यांनी शुल्क लादण्याचे समर्थन केले आहे. ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये शेती आणि कृषी क्षेत्रातील प्रतिनिधी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील प्रमुख सदस्यांसह एक परिषद आयोजित केली होती. या परिषदेत भारतातून येणा-या तांदळाविषयक उपस्थित शेतक-यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. या शेतक-यांसाठी ट्रम्प यांनी १२ अब्ज डॉलर्सच्या संघीय मदतीची घोषणा केली असून भारत आणि चीनमधून येणा-या तांदळावर टॅरिफ टाकण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. (International News)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील प्रतिनिधींची भेट घेतली. अमेरिकेचे कोषागार सचिव स्कॉट बेसंट आणि कृषी सेक्रेटरी ब्रुक रोलिन्स या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीला केनेडी राईस मिलच्या मालकीच्या कुटुंबातील सदस्य मेरिल केनेडी देखील उपस्थित होत्या. केनेडी राईस मिल अमेरिकेतील सर्वात मोठ्या राईस मिल पैकी एक आहे. या मिलच्या अंतर्गत अमेरिकेमधील सर्वाधिक तांदूळ उत्पादक शेतक-यांना एकत्र करण्यात आले आहे. याच केनेडी राईस मिलल्या मेरिल यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे अमेरिकेत पिकत असणा-या तांदळाला योग्य भाव मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. अमेरिकेत भारतामधून मोठ्या प्रमाणात तांदूळ आयात होतो, त्यापाठोपाठ चीन आणि थायलंडच्या तांदूळ अमेरिकेत येतो. (America VS India)
हा तांदूळ अमेरिकेतील तांदळाच्या किंमतीपेक्षा कमी दरात उपलब्ध असल्यामुळे अमेरिकेतील तांदळाला भाव मिळत नसल्याचे या बैठकीत ट्रम्प यांना सांगण्यात आले. पोर्तो रिको हा अमेरिकेच्या तांदळाचा सर्वात मोठा बाजार असून या बाजारात भारतामधील तांदळाचे वर्चस्व असल्याचेही उपस्थितांनी ट्रम्प यांना सांगितले. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून अमेरिकेत आयात होणाऱ्या तांदळाच्या आयातीवर कठोर धोरण अवलंबवणार असे सांगितले. शिवाय या तांदळावर अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा विचार करु असे आश्वासनही दिले आहे. याशिवाय भारताविरुद्ध जागतिक व्यापार संघटनेत प्रलंबित असलेला खटला त्वरित सोडवण्याचे आदेशही ट्रम्प यांनी दिले आहेत. (International News)

इंडियन राईस एक्सपोर्टर्स फेडरेशनच्या आकडेवारीनुसार, भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश आहे. जागतिक बाजारपेठेचा २८ टक्के तांदूळ भारतात पिकवला जातो. २०२४-२५ मध्ये जागतिक निर्यातीत भारताचा वाटा ३०.३ टक्के आहे. भारत जगभर तांदळ्याच्या निर्यातीमध्ये अव्वल स्थानावर आहे. भारतातून अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये सोना मसुरी हा तांदूळ पाठवला जातो. हा सौम्य आणि सुगंधी तांदूळ आहे. भारतात आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये हा तांदूळ पिकवला जातो. सोना मसुरी ही एक प्रीमियम तांदळाची जात आहे. आता ट्रम्प यांनी भारतीय तांदळावर टॅरिफ लावण्याची धमकी दिल्यामुळे या भागातील तांदूळ उत्पादक शेतक-यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. (America VS India)
========
हे देखील वाचा : America : इल्हान उमरला अमेरिकेतून हद्दपार करणार !
========
अमेरिका दरवर्षी अंदाजे २० अब्ज पौंड म्हणजेच सुमारे ९.०७ दशलक्ष मेट्रिक टन तांदळाचे उत्पादन होते. कॅलिफोर्निया, लुईझियाना, मिसिसिपी, मिसूरी आणि टेक्सास यासारख्या प्रमुख राज्यांमध्ये भातशेती होते. अमेरिका जगातील पाचव्या क्रमांकाचा तांदूळ निर्यातदार देशांमध्ये आहे. गेल्या काही वर्षापासून अमेरिका आशियामध्ये तांदूळ निर्यात करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र तिथे भारतीय तांदळाची पकड घट्ट असल्यामुळे अमेरिकेला प्रवेश मिळत नाही. (International News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
