६ ऑगस्ट १९४५ दुसरं महायुद्ध सुरूच होतं. जपानच्या प्रत्येक शहरात WARZONE परिस्थिती होती. पण लोकं आपापली रोजची कामं करत होती. तेवढ्यात अचानक अमेरिकेचा एनोला गे हा बॉम्बर प्लेन हिरोशिमा शहरावर घिरट्या घालायला लागला. सायरन वाजू लागले. लोकं आपापल्या घरात पळू लागली. पण त्यांना याचा थांगपत्ताही नव्हता की, आपण आपल्या घरासोबत पूर्णपणे नष्ट होऊन जाणार आहोत. या बॉम्बर प्लेनमधून एक साडे चार हजार किलो वजनाचा एक लिटल बॉय नावाचा अणुबॉम्ब सोडला गेला. अणुबॉम्ब ज्याठिकाणी पडला तिथे ६ हजार सेल्सियस पर्यंतचं टेम्परेचर वाढलं होतं. आणि अचानक… तब्बल दीड लाख लोकं यात मारली गेली. मशरूमसारख्या दिसणाऱ्या ढगांचे थर हजारो किमी दुरून सुद्धा दिसत होते.. शहर भुईसपाट झालं.
यानंतर सेम तीन दिवसांनी म्हणजेच ९ ऑगस्ट रोजी घडलं. ६ ऑगस्ट आणि ९ ऑगस्ट १९४५, हे मानवाच्या इतिहासातले हे दोन सर्वात भयानक दिवस.. कारण याच दोन दिवसांमध्ये माणसाने प्रचंड हाहाकार पाहिला, लाखोंच्या संख्येने लोकं मरताना पाहिली… अक्षरशः आपल्या डोळ्यांसमोर विनाश घडताना पाहिला. आजही हिरोशिमा, नागासाकीमध्ये अपंग मुलं जन्माला येतात, इतका या दोन्ही अणुबॉम्बचा वाईट परिणाम झाला होता. यावरूनच तुम्हीच समजून घ्या अणुबॉम्ब काय लेव्हलचा घातक आहे… पण यांच्यापेक्षा दहा पटीने जास्त विनाशकारी असे २१ अणुबॉम्ब जर पृथ्वीवर पडले तर काय होईल ? व्हायचं काय… जगात मनुष्य तरी शिल्लक राहिले पाहिजेत ना…पण या अणुबॉम्बसारखच काही आपल्या सूर्यमालेतला ‘गॉडफादर’ गुरु ग्रहाबद्दल (Godfather Jupiter) घडलं होतं… हो गुरु ग्रहावर अणुबॉम्ब पडले होते… पण ते नक्की कोणते होते, हे जाणून घेऊ.
१६ व्या शतकात गॅलिलिओ गॅलिली (Galileo Galilei) यांनी एक क्रांतिकारी शोध लावला, तो म्हणजे टेलीस्कोपचा… या टेलीस्कोपमधून तो पहिल्यांदाच चंद्रावरचे क्रेटर्स, गुरु, शनि आणि इतर ग्रह इतक्या जवळून बघणारा पहिला माणूस ठरला. यानंतर टेलीस्कोपमध्ये बरेच चेंजेस होत गेले आणि मनुष्य सौरमालेसह ताऱ्यांवर नजर ठेवण्यासाठीही सक्षम झाला. अमेरिकेचे जिओलॉजिस्ट युजीन शुमेकर, त्यांची पत्नी कॅरोलीन आणि कॅनडाचे एस्ट्रोनॉमर डेव्हीड लेवी यांनाही टेलीस्कोपमधून हे ताऱ्यांचं जग पाहण्याची लय आवड… २४ मार्च १९९३ ला त्यांनी गुरू ग्रहाभोवती फिरत असणारा एक धूमकेतू दिसला. त्याचे त्यांनी बरेच फोटो काढले. आता तिघांनी त्या धुमकेतूला शोधल्यामुळे नावसुद्धा त्यांचंच दिलं गेलं… कॉमेट शुमेकर-लेवी ९ (comet shoemaker-levy 9) ! हा ४ किलोमीटर इतक्या व्यासाचा होता आणि याची स्पीड जवळपास 60 किमी पर सेकंद इतकी होती…
धूमकेतू शोधला खरा पण हा गुरु ग्रहाभोवती का फिरतोय, याचं उत्तर ते आता शोधायला लागले.. यामध्ये त्यांना कळलं की हा गुरुभोवती आजच नाही, तर गेल्या २५-३० वर्षांपासूनच घिरट्या घालतोय आणि लवकरच तो गुरुवर एक मोठा धमाका करण्याची तयारी करत होता. गुरुवर १०० टक्के पडण्याचा त्याचा चान्स होता. आता सूर्यानंतर सर्वात जबरदस्त गुरुत्वाकर्षण कोणाचं असेल तर ते गुरु ग्रहाचं… त्यामुळे त्याने या धुमकेतुला आपल्या टेरिटरीमध्ये जखडून ठेवलं होतं.. एखाद्या ग्रहावर धूमकेतू आदळण आणि ते टिपण या दोन्ही गोष्टी पाहण्याची तयारी शुमेकर कपल आणि लेवी यांनी सुरू केली होती.. ही मानवाच्या आणि आपल्या सूर्यमालेच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वात भयंकर अशी घटना घडणार होती, त्यामुळे संपूर्ण जगातील खगोल शास्त्रज्ञांचं आणि खगोल अभ्यासकांचं लक्ष यावर लागल होतं.
१६ जुलै १९९४ या दिवशी हा धूमकेतू गुरू ग्रहाच्या रोश लाइन म्हणजेच गुरूत्वीय कक्षेत आला… गुरूचा प्रकोप त्याला काही पेलवला नाही… आणि या कक्षेत पोहोचताच गुरूच्या टायडल फोर्समुळे त्याचे अक्षरश २१ तुकडे पडले.. हे सर्व खगोलशास्त्रज्ञ दुर्बिणीत कैद करत होते. प्रचंड वेगाने हे २१ तुकडे गुरू ग्रहावर १६ ते २२ जुलै दरम्यान एक एक करून आदळत होते. हे इतके पावरफुल होते की, यांची तुलना हिरोशिमा-नागासाकीवर पडलेल्या अणुबॉम्बशी न केलेलीच बरी.. वैज्ञानिकांच्या मते, हे सामान्य अणुबॉम्बपेक्षा १० पटीने अधिक घातक होते.. इतके घातक की या फोटोमध्ये तुम्ही त्यांची दाहकता पाहू शकता… म्हणजे समजा इतक्या ताकदीचा अणुबॉम्ब जर आज पृथ्वीवर आदळला तर लाखो नव्हे तर करोडो माणस मारली जातील. हे तुम्ही जे स्क्रीनवर पाहताय ते फोटो शूमेकर आणि लेवी यांनीच काढलेले आहेत. मानवी जगाने पहील्यांदाच सुर्यमालेतील आजपर्यंतची सर्वात मोठी दुर्घटना अनुभवली होती. या आघातानंतर गुरूचं बाह्य वातावरण पुर्णपणे बदललं होतं. गुरूवर २५०० कीमी व्यासाचा एक गडद डाग तयार झाला आणि या डागाभोवती ७५०० कीमी व्यासाची एक पातळ गडद कडा तयार झाली होती. खगोल शास्त्रज्ञ आणि खगोल अभ्यासकांसाठी ही एक पर्वणीच होती. या धुमकेतुमुळे तयार झालेला डाग कित्येक महीने गुरू ग्रहावरच्या ‘ग्रेट रेड स्पॉट’सारखाच स्पष्ट दिसत होता.
‘ग्रेट रेड स्पॉट’ हा गुरु ग्रहावर असलेलं एक प्रचंड वादळ आहे, जे पृथ्वीपेक्षा अडीच पटीने मोठं आहे. या आघातामुळे गुरू ग्रहाबाबतच्या अनेक नवीन गोष्टी शास्त्रज्ञांना ज्ञात झाल्या. गुरूला गॉडफादर म्हणण्याचं कारण म्हणजे अशा कित्येक हानिकारक धुमकेतु, लघुग्रह आणि उल्कांपासुन गुरू आपल्या पृथ्वीचं संरक्षण करत आहे. तेसुद्धा ९० कोटी किलोमीटर दूर राहून ! आता जरा प्राचीन काळात जायचं म्हटलं, तर साडे सहा कोटी वर्षांपुर्वी असाच आघात पृथ्वीनेही अनुभवला होता. एक भला मोठा उल्का पृथ्वीवर आदळला, ज्यामुळे संपुर्ण डायनोसॉर प्रजातीच नष्ट झाली. गुरु तसं आपलं रक्षण करतच आहे, मात्र प्रत्येक वेळी या ब्रह्मांडातील उल्का आणि धुमकेतूच्या कचाट्यातून तो आपल्याला वाचवू शकणार नाही..माणुस या प्रजातीला नष्ट करण्यासाठीही कित्येक किमी दुर एखादा उल्का या अनंत अंतराळात नक्कीच सज्ज असेल.