चीनच्या वुहान या शहरात डिसेंबर 2019 मध्ये कोविड-19 या रोगाचा पहिला रुग्ण सापडला होता. नंतर झपाट्यानं या रोगाचा फैलाव झाला, चीन या रोगाच्या विळख्यात आला. चीनच काय पण पुढच्या दोन महिन्यात कोविड-19 च्या रुग्णांची संख्या जगभर वाढू लागली. तेव्हा या घातक रोगावर कुठलेही औषध वा लस उपलब्ध नव्हती. वा-याच्या वेगानं, संसर्गानं पसरणा-या या रोगाला रोखण्यासाठी लॉकडाऊन लावणं गरजेचं ठरलं. मग अवघं जगच या कोविडच्या विळख्यात आलं आणि कैद झालं. जवळपास दोन वर्ष हे कोविड-19 या महामारीचं सावट जगावर राहिलं. ही वर्ष आठवली तरी अंगावर शहारा येतो. (Covid-19)
या महामारीमध्ये लाखो नागरिकांचा मृत्यू झाला . त्यामुळे कोविड हा शब्दच ऐकला तरी अद्यापही जनमानसाच्या मनात दहशत आहे. याच कोविडच्या पूरता बिमोड अद्याप झालेला नाही. कारण आता पाच वर्षानंतर पुन्हा कोविड-19 ही महामारी डोकं वर काढत असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. आशियाई देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. विशेषतः सिंगापूर आणि हॉंगकॉंग या देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळू लागले आहेत. यात मृत्यूचे प्रमाणही वाढल्यामुळे, ही पुन्हा एखाद्या महामारीची चाहूल आहे का, याबाबत तज्ञ अभ्यास करीत आहेत. पुन्हा एकदा कोविड-19 ची दहशत निर्माण होईल, अशी आकडेवाडी जाहीर कऱण्यात आली आहे. आशियाई देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. (Latest News)
हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. हाँगकाँगमध्ये कोविड-19 ची प्रकरणे आणि मृत्यू एका वर्षातील सर्वोच्च पातळीवर आहेत. या दोन्ही देशांमध्ये येणा-या पर्यटकांची संख्या अधिक आहे. त्यातही चीनमधील पर्यटक या दोन देशांमध्ये पर्यटनासाठी गर्दी करतात. त्यांच्याकडूनच हा कोरोना पुन्हा एकदा पसरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हाँगकाँग सेंटर फॉर हेल्थ प्रोटेक्शनच्या संसर्गजन्य रोग शाखेचे प्रमुख अल्बर्ट औ यांच्या मते, हाँगकाँगमध्ये कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामागे या देशात मोठ्या संख्येनं येणारे पर्यटक कारणीभूत आहेत. मात्र आता देशात सर्वदूर कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्यानं अल्बर्ट औ यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी केलेल्या निरिक्षणानुसार कोविड-19 च्या बाधित रुग्णांची टक्केवारी एका वर्षातील उच्चांकावर पोहोचली आहे. यातही गंभीर रुग्णांची संख्या अधिक आहे. (Covid-19)
तसेच मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. जवळजवळ एका वर्षातील सर्वोच्च बिंदूवर मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे हाँगकाँग मधील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. येथे महिन्यात तब्बल 31 नागरिकांचा मृत्यू झाला असून यामुळे पुन्हा लॉकडाऊन जाहीर करावा का, याबाबत विचार सुरु झाला आहे. कोरोना रुग्णांचे प्रमाण एवढे वाढले आहे की, हाँगकाँगचे गायक ईसन चॅन यांनी कोविड-19 ची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी तैवानमधील जाहीर कार्यक्रम रद्द केला आहे. अशीच परिस्थिती सिंगापूर येथील आहे. सिंगापूर येथील आरोग्य यंत्रणाही कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे अलर्ट मोडवर आली आहे. येथे गेल्या आठवड्यात रुग्णांची संख्या 28 टक्क्यांनी वाढून 14 हजाराच्या पुढे गेली आहे. रुग्णालयात येणा-या कोरोना बाधितांचे प्रमाणही 10 टक्क्यांनी वाढल्यानं कोरोनाचा संसर्ग तळागळापर्यंत पोहचल्याचे आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे. दाट वस्ती असलेल्या ठिकाणी कोरोनाचा अधिक फैलाव झाल्याचे आढळून आले आहे. (Latest News)
==============
हे देखील वाचा : Virat Kohli : किंग कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती
HAROP Drone : पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टिम नष्ट करणाऱ्या ‘हार्पी ड्रोन’ची वैशिष्ट्ये
==============
कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने आशियामध्ये पुन्हा एकदा कोविडची नवी लाट येण्याचे संकेत तज्ञांनी दिले आहेत. साधारणपणे, हिवाळ्याच्या काळात श्वसनाचे विषाणू अधिक सक्रिय असतात. मात्र यावेळी उन्हाळा सुरू होताच कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यानं उन्हाळ्यातही कोरोना विषाणू वेगाने पसरू शकतो हे स्पष्ट झाले आहे. त्यातही ज्या चीनमध्ये कोरोनाचा उगम झाला, तिथेही कोरोनाने डोके वर काढायला सुरुवात केली आहे. चीनमधील रुग्णालयांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. सोबत थायलंड देशामध्येही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मुख्य म्हणजे, ज्या देशात आता कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, तेथे जगभरातून पर्यटक येत आहेत. त्यामुळे त्यांच्यामार्फत पुन्हा या रोगाचा फैलाव होणार नाही, याची काळजी संबंधित देशांच्या आरोग्य विभागांना घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (Covid-19)
सई बने