अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे डोके ठिकाणावर आहे का, हा प्रश्न जगभरातून विचारण्यात येत आहे. कारण स्वतःला उदारमतवादी नेता म्हणवून घेणा-या एका दहशतवाद्याबरोबर या ट्रम्प महाशयांनी हस्तांदोलन केले आहे. मध्य पूर्व देशांच्या दौ-यावर असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदी अरेबियामध्ये अहमद अल-शारा याची भेट घेतलीच शिवाय त्याच्याबरोबर हस्तांदोलन केले. ट्रम्प आणि अहमद अल-शाराचा हा फोटो प्रसिद्ध झाला, आणि एकच खळबळ उडाली. त्यावर पहिली प्रतिक्रीया इस्रायलमधून आली. त्यांनी ट्रम्प आणि पर्यायानं अमेरिकेच्या दुहेरी नितीवर सडकून टिका केली. (Donald Trump)
हा अहमद अल-शारा खतरनाक दशहतवादी म्हणून परिचीत आहे. त्याच्यावर खुद्द अमेरिकेनंच काही हजार डॉलरचे बक्षीस ठेवले होते. आता हाच दहशतवादी सिरीयाच्या राष्ट्राध्यक्षपदी असून स्वतःला उदारमतवादी नेता म्हणवून घेत आहे. सौदी अरेबियामध्ये आलेल्या ट्रम्प यांनी या दहशतवाद्याबरोबर हात मिळवला म्हणजे, सिरीयामध्ये झालेल्या सत्तातराला अमेरिकेचा पाठिंबा असल्याचे उघड झाले आहे. यावर इस्रायलकडून तिखट प्रतिक्रीया आली असून ट्रम्प यांनी दहशतवाद्यांना कुठल्या भूमिकेतून पाठिंबा दिला, हे स्पष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सौदी अरेबियाची राजधानी रियाधमधून डोनाल्ड ट्रम्प, सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि सीरियाचे अंतरिम अध्यक्ष अहमद अल-शारा यांचे एक छायाचित्र प्रसिद्ध झाले, आणि जगभरात खळबळ उडाली. ट्रम्प नेमकं काय करु इच्छितात, हा प्रश्न विचारण्यात येऊ लागला. कारण एकेकाळी याच अहमद अल-शारावर अमेरिकेनं दहशतवादी हा ठपका लावत बक्षिस जाहीर केले होते. ट्रम्प आता त्याच दहशतवाद्याला भेटल्यानं मध्यपूर्वेच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडतील अशी अटकळ व्यक्त होत आहे. मध्य पूर्वेच्या राजकारणात, अहमद अल-शारा याची एकेकाळी दहशतवादी म्हणून ओळख होती. अल-कायदाच्या सोबतीनं त्यानं स्वतःची दहशतवादी संघटना उभारली होती. सिरीयामध्ये बशर सरकार पाडण्यासाठी त्यांनी आंदोलन उभारले आणि आता सिरीयाचा राष्ट्राध्यक्ष म्हणून स्वतःचा उल्लेख करुन घेत आहे. (Donald Trump)
दहशतवादी ते राजकारण असा प्रवास करणा-या अहमद अल-शाराचा जन्म सिरीयाची राजधानी दमास्कस येथील श्रीमंत कुटुंबात झाला. आधुनिक जीवनशैलीमध्ये तो मोठा झाला. मात्र 9-11 च्या हल्ल्यानंतर अहमद अल-शाराच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. तो कट्टरपंथी संघटनेमध्ये सामील झाला. अबू मोहम्मद अल-जोलानी किंवा अहमद अल-शारा अशा नावांनी त्याची तिथे ओळख झाली. कट्टरपंथी विचाराचा प्रभाव असल्यानं अमेरिकेच्या इराकवरील हल्ल्यानं त्यानं अमेरिकेविरुद्ध मोहीम सुरु केली. त्याच्या कारवायांनी त्रस्त झालेल्या अमेरिकेनं त्याला इराकमध्ये अटक करुन पाच वर्षे तुरुंगात ठेवले. 2011 मध्ये त्याची सुटका झाली. त्याचवेळी सिरियामध्ये बशर-अल-असदच्याविरोधात उठाव सुरु झाला होता. अहमद अल-शाराने ‘अल-नुसरा फ्रंट’ नावाची संघटना स्थापन केली. इस्लामिक स्टेटची संकल्पना युवकांपर्यंत पोहचवत त्यांनी अनेक तरुणांना दहशतवादी कारावायात सामिल करुन घेतलं. अल कायदा या दहशतवादी संघटनेची अहमद अल-शाराला साथ होती. (International News)
सिरीयामध्ये बशरची सत्ता उलथवून टाकण्यासाठी जे आंदोलन झाले ते याच अहमद अल-शाराच्या चिथावणीनं झाले. आता अहमद अल-शारा सिरीयाचा स्वयंघोषित राष्ट्राध्यक्ष झाला आहे. राजकारणी या नात्यानं जगभरातील नेत्यांबरोबर राजकीय संबंध सुधारण्याची गरज आहे, असे त्याला वाटते. शिवाय सिरीयाला आणि पर्यायानं त्यालाही संयुक्त राष्ट्रांनी मान्यता द्यावी यासाठी त्याची धडपड चालू झाली आहे. म्हणूनच त्यानं सौदीच्या मध्यस्थीनं डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतल्याचे उघड झाले आहे. 25 वर्षांनंतर अमेरिका आणि सिरीया या दोन देशांच्या नेत्यांमधील झालेली पहिलीच बैठक ठरली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियावर लादलेले निर्बंध उठवण्याची घोषणा केली. मात्र हे सर्व करत असतांना डोनाल्ड ट्रम्प यांना अहमद अल-शारावर अमेरिकेनं जाहीर केलेल्या बक्षिसाचा विसर पडला का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. (International News)
==============
हे देखील वाचा : Virat Kohli : किंग कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती
Operation Sindoor : या तीन मित्रांनी लिहिली ‘ऑपरेशन सिंदूर’ची स्टोरी !
==============
एकेकाळी अमेरिकेने अल-शाराला दहशतवादी घोषित करत त्याच्यावर दहा लाख डॉलर्सचे बक्षीस ठेवले होते. हा अहमद अल-शारा ज्या सिरीयाचा राष्ट्राध्यक्ष असल्याचा दावा करत आहे, त्या सीरियाला दहशतवादाचे प्रायोजक राज्य म्हणून अमेरिकेनं घोषित केले होते. 1979 पासून सिरीयावर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र आता अचानक या देशामध्ये सगळे चांगले असल्याचा आणि अहमद अल-शारा हा दहशतवादी बदलल्याचा साक्षात्कार डोनाल्ड ट्रम्प यांना झाला आहे. त्यांनी, अल-शाराच्या नेतृत्वाखाली सीरिया शांततेची संधी मिळण्यास पात्र असल्याचे प्रशस्तीपत्रक दिले आहे. या ट्रम्प यांच्या बदललेल्या भूमिकेवर पहिला आक्षेप इस्रायलनं घेतला आहे. अमेरिकेने सीरियाच्या नवीन सरकारला मान्यता देण्यासाठी घाई करू नये, असा सल्ला त्यांनी दिला आहे. अहमद अल-शाराची दहशतवादी पार्श्वभूमी आणि त्यानं केलेल्या दहशतवादी घटनांची यादीच इस्रायलनं जाहीर केली आहे. त्यामुळेच आता डोनाल्ड ट्रम्प यांचे डोके ठिकाणावर आहे का, हा प्रश्न त्यांना विचारण्यात येत आहे. (Donald Trump)
सई बने