देशभरात मोठ्या प्रमाणात निवासी प्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्यात अनेक आंतराष्ट्रीय कंपन्यांही मोठ्या प्रमाणात भारतात आपले विकास प्रकल्प उभारत आहेत. याच कंपन्यांमध्ये एक नाव असे आहे, ज्यांच्या घरांच्या किंमती कोट्यावधीचा आकडा पार करत आहेत, मात्र या घरांना खरेदी कऱण्यासाठी रांगा लागल्या आहेत. ही कंपनी आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची. ट्रम्प टॉवर या नावालाच एवढी लोकप्रियता मिळत आहे की, ट्रम्प टॉवर उभारण्याची घोषणा झाल्याबरोबर त्याच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. हिच परिस्थिती सध्या गुरुग्रामधील ट्रम्प टॉवरच्या प्रोजेक्टबाबत झाली आहे. गुरुग्राम हे हरियाणा राज्यातील एक शहर आहे. राजधानी दिल्लीपासून अवघ्या 30 किलोमीटर असलेल्या या शहरामध्ये अनेक आंतराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आहेत. हरियाणाची ड्रीम राजधानी म्हणूनही या गुरुग्रामची ओळख आहे. या गुरुग्रामची भविष्य़ात होणारी प्रगती पाहता येथे जगभरातील मान्यवर रिअल इस्टेट कंपन्यांनी जागा घेतली असून त्यांचे भव्य प्रकल्प येथे उभे रहात आहेत. त्यातच एक नाव आहे ते ट्रम्प टॉवरचे. (Donald Trump)
ट्रम्प टॉवर हा गुरुग्राममधील एक आलिशान निवासी प्रकल्प असून त्याची किंमत करोडोच्या पुढे आहे. अर्थात त्यातील सुविधाही आंतराष्ट्रीय दर्जाच्या आहेत. गुरुग्राममधील पहिलाच तापमान नियंत्रित इनडोअर पूल या ट्रम्प टॉवरमध्ये असणार आहे. शिवाय रहिवाशांसाठी मनोरंजन केंद्र, मुलांसाठी खेळण्याची मोठी मैदाने, आरोग्य ते आहाराबाबत सर्व सुविधा या ट्रम्प टॉवरमध्ये आहेत. यासह अनेक मान्यवर कंपन्यांची कार्यालयेही या ट्रम्प टॉवरच्या उभारणीआधीच येथे येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकल्पाची नुसती घोषणा झाली, आणि त्यात जागा बुक करण्यासाठी रांगा लावल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली, असे सांगितल्यास वावगे ठरणार नाही. (Latest News)
गुरुग्रामध्ये उभारण्यात येणा-या या ट्रम्प टॉवरमुळे पुन्हा एकदा भारतातील मालमत्ता व्यवसाय किती तेजीत आहे, याचे उत्तर मिळाले आहे. कारण गुरुग्राममध्ये बांधलेली ट्रम्प रेसिडेन्सेसची सर्व 298 आलिशान घरे या प्रकल्पाच्या लाँचच्या दिवशीच विकली गेली. या घरांची किंमत 8 कोटी ते 15 कोटीच्या पुढे असल्याची माहिती आहे. या ट्रम्प टॉवरचे बुकींग खुले झाले आणि कंपनीला 3250 कोटी रुपये पहिल्याच दिवशी मिळालेही. गुरुग्राम हे दिल्लीच्या जवळ आहे. देशाच्या राजधानीमध्ये सध्या घराच्या किंमती यापेक्षाही अधिक आहेत. शिवाय दिल्लीमध्ये ट्रॅफीक आणि प्रदूषण या दोन प्रमुख समस्या आहेत. अशावेळी अनेक उद्योजक दिल्लीसोडून अन्यत्र जागा बघत आहेत. अशा सर्वांसाठी गुरुग्राममध्ये त्यामानानं कमी किंमतीमध्ये जागा मिळत आहेत. परिणामी गुरुग्राममध्ये गुगलपासून मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्यांची कार्यालये आहेत. परिणामी येथे निवासी घरांची मागणी वाढती आहे. (Donald Trump)
यात आता ट्रम्प टॉवरचा प्रोजेक्ट सुरु झाल्यावर उद्योजकांनी या टॉवरमध्ये एकगठ्ठा घरे खरेदी केली आहेत. याच प्रोजेक्टममध्ये अलिशान अशा चार पेंटहाऊसचाही समावेश आहे. त्याचीही विक्री या प्रोजेक्टची घोषणा झाली, त्याच दिवशी झाली आहे. गुरुग्राममधील ट्रम्प रेसिडेन्सेस हे स्मार्टवर्ल्ड डेव्हलपर्स आणि ट्रिबेका डेव्हलपर्स यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे. हा प्रकल्प गुरुग्राममधील ट्रम्प ब्रँडचा दुसरा प्रकल्प आणि देशातील सहावा गृहनिर्माण प्रकल्प आहे. मुख्य म्हणजे, अमेरिकेतील न्यू यॉर्क या शहरानंतर, गुरुग्राम हे दोन ट्रम्प टॉवर्स असलेले पहिले शहर ठरणार आहे. गुरुग्रामच्या सेक्टर-69 मध्ये असलेल्या या ट्रम्प रेसिडेन्सेसमध्ये दोन 51 मजली टॉवर उभे रहात आहेत. याआधी गुरुग्रामच्या सेक्टर 65 मध्ये ट्रिबेका टॉवर हा दिल्ली-एनसीआरमधील सर्वात उंच प्रकल्प आहे. त्यात डुप्लेक्स घरांची संख्या अधिक आहे. देशातील पहिला इनडोअर पूल असलेल्या या प्रोजेक्टची घोषणा झाल्यावर त्यांचीही विक्री पहिल्याच दिवशी झाली होती. (Latest News)
=======
हे देखील वाचा : Ice Apple : रानमेवा असलेल्या ताडगोळा खाण्याचे लाभ
Vegetarian : ८०० वर्षांपासून शाकाहारी असलेले महाराष्ट्रातील एकमेव गाव
=======
फक्त गुरुग्रामध्येच नाही, तर भारतातील अन्यही प्रमुख शहरात ट्रम्प टॉवर उभारण्यात येत आहेत. त्यात आपल्या पुणे , मुंबईचाही समावेशही आहे. कोलकाता येथेही ट्रम्प टॉवर उभारले जात आहे. ट्रम्प कुटुंबाने भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची रिअल इस्टेट कंपनी, द ट्रम्प ऑर्गनायझेशन, लोढा ग्रुप, पंचशील रिअॅल्टी, एम३एम, ट्रिबेका, युनिमार्क आणि आयरिओ यांच्या सहकार्याने भारतात रिअल इस्टेट व्यवसाय करते. ट्रम्प वर्ल्ड सेंटरची पुण्यामधील गुंतवणूक 1700 कोटी असून हा प्रकल्प 2029 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. (Donald Trump)
सई बने