Home » Baba Amarnath Yatra : बम बम भोले !

Baba Amarnath Yatra : बम बम भोले !

by Team Gajawaja
0 comment
Baba Amarnath Yatra
Share

भगवान शंकराच्या भक्तांसाठी सर्वात आनंदाची बातमी आली आहे. लाखो भाविक ज्या यात्रेच्या प्रतीक्षेत होते, ती बाबा बर्फानी यांची यात्रा जुलै महिन्यापासून सुरु होत आहे. बाबा अमरनाथ यात्रा 3 जुलैपासून सुरु होणार असल्याचे जाहीर कऱण्यात आले आहे. अमरनाथ यात्रा ट्रस्टनं 3 जुलै ते 9 ऑगस्ट या 39 दिवसात अमरनाथ यात्रा होणार असल्याची माहिती दिली आहे. या यात्रेदरम्यान यात्रेकरुंच्या निवासाची आणि भोजनासाठी लंगरची व्यवस्था करण्यात येणार आहे. (Baba Amarnath Yatra)

जगभरातील तमाम शिवभक्तांच्या आस्थेचे स्थान असलेल्या बाबा अमरनाथ धाम यात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविक जमा होतात. अमरनाथ यात्रा ही सर्वात कठिण यात्रा समजली जाते. बाबा बर्फानींची ही गुहा समुद्रसपाटीपासून 13 हजार 600 फूट उंचीवर आहे. श्रीनगरपासून 135 किमी अतंरावर असलेल्या या गुहेत जाण्यासाठी भाविकांना मोठी पायपीट करावी लागते. या यात्रेला येणा-या लाखो भाविकांच्या संख्येमुळे यात्रेचे नियोजन सर्वात आव्हानात्मक समजले जाते. त्यासाठी श्री बाबा अमरनाथजी श्राइन बोर्डाची स्थापना करण्यात आली आहे. याच बोर्डाच्या बैठकीत यावर्षी अमरनाथ यात्रा 39 दिवसाची असेल हा निर्णय घेण्यात आला आहे. (Latest Marathi News)

सध्या हा सर्व मार्ग बर्फांनी झाकलेला आहे. गेल्या काही वर्षापासून अमरनाथ यात्रेला येणा-या भाविकांच्या संख्येत दुप्पटीनं वाढ झाली आहे. त्यामुळे या यात्रा मार्गावर रुंदिकरणाचे काम चालू आहे. यासंदर्भातही जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. श्री अमरनाथजी श्राइन बोर्डांनं यावेळी यात्रा 3 जुलै रोजी अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम ट्रॅक आणि गंदरबल जिल्ह्यातील बालताल या दोन्ही मार्गांवरून एकाच वेळी सुरू होईल, अशी माहिती दिली. अमरनाथ यात्रा, 9 ऑगस्ट, रक्षाबंधन रोजी समाप्त होणार आहे. गेल्यावर्षी अमरनाथ यात्रेसाठी पाच लाखांहून अधिक भाविक बाबा बर्फानी यांचे दर्शन घेण्यासाठी आले होते. गेल्या 12 वर्षातील ही भाविकांची विक्रमी संख्या ठरली होती. गेल्यावर्षी ही यात्रा तब्बल 52 दिवस चालली. गेल्याच वर्षीपासून यात्रेदरम्यान यात्रेकरूंचे स्थान शोधण्यासाठी आरएफआयडी कार्डचा वापर करण्यात आला. (Baba Amarnath Yatra)

मात्र यावर्षी ही यात्रा 39 दिवसांचीच असणार आहे. या भागातील बदलते हवामान पाहून या तारखांचे नियोजन कऱण्यात येते. यावर्षी गेल्यावर्षीपेक्षा कमी दिवस यात्रा चालणार आहे. मात्र भाविकांची संख्या वाढली तर त्यांचे नियोजन करणे हा मोठा जिकरीचा भाग ठरणार आहे. त्यासाठी श्री अमरनाथजी श्राइन बोर्डांनं भाविकांना आधी नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय भाविकांची संख्या वाढल्यास त्यांच्या निवासस्थानांसाठी जम्मू, श्रीनगर आणि इतर ठिकाणी निवासस्थाने उभारण्यात येत आहेत. तसेच ई-केवायसीसाठी यात्री सुविधा केंद्रे कार्यान्वित करण्यात येणार आहेत. याशिवाय जे यात्रेकरु आधी नोंदणी करुन आलेले नसतील, त्यांच्या नोंदणीसाठी नौगाम आणि कटरा रेल्वे स्थानकांवरही यात्रेकरु नोंदणी केंद्र उभारण्यात येणार आहेत. या यात्रेसाठी गेल्यावर्षी ऑनलाइन नोंदणी 17 एप्रिलपासून सुरु करण्यात आली होती. यावेळीही ऑनलाइन नोंदणी एप्रिल महिन्यातच सुरु करण्यात येणार आहे. अमरनाथ यात्रा ही हिंदू धर्मातील सर्वात मोठी यात्रा समजली जाते. असे मानले जाते की, अमरनाथ गुहेत भगवान शंकर यांनी माता पार्वतीला अमरत्वाचे रहस्य सांगितले होते. (Latest Marathi News)

===============

हे देखील वाचा : Gujarat : सोमनाथ शिवलिंगाचे रहस्य !

Masan Holi : वाराणसीच्या मसान होळीसाठी मोठी गर्दी !

===============

दरवर्षी या गुहेत बर्फापासून शिवलिंग तयार केले होते, या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी आणि त्याची पूजा करण्यासाठी जगभरातील लाखो शिवभक्त ही सर्वात मोठी आणि कठिण यात्रा करतात. याच अमरनाथ गुहेत देवीचे 51 पैकी एक शक्तीपीठही आहे. अमरनाथ गुहेच्या वरच्या डोंगरावर श्री राम कुंडही आहे. या कुंडातून पडणाऱ्या पाण्याच्या थेंबांपासूनच अमरनाथ गुहेतील शिवलिंग तयार होत असल्याची मान्यता आहे. चंद्राच्या कोरीनुसार या शिवलिंगाचा आकार बदलतो. श्रावण पौर्णिमेला शिवलिंग पूर्ण आकारात पोहोचते आणि अमावस्येपर्यंत त्याचा आकार कमी होतो, असे सांगितले जाते. उन्हाळ्यातील काही दिवस वगळता ही गुहा वर्षातील बहुतेक काळ बर्फाने झाकलेली असते. ही यात्रा घोषित झाल्यावर या सगळ्या मार्गावरील बर्फ हटवणे आणि यात्रेकरुंसाठी मार्ग तयार करणे हे एक आव्हान असते. भारतीय लष्कराचे जवानांचे यासाठी मोठे योगदान असते. (Baba Amarnath Yatra)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.