Home » पुष्कर मेळ्यात लाखोंच्या घोड्यांची खरेदी विक्री

पुष्कर मेळ्यात लाखोंच्या घोड्यांची खरेदी विक्री

by Team Gajawaja
0 comment
Pushkar Mela
Share

राजस्थानातील जगप्रसिद्ध पुष्कर मेळा मोठ्या उत्साहात सुरु झाला आहे. राजस्थानची कला आणि संस्कृती बघण्यासाठी या पुष्कर मेळ्यात फक्त भारतातील पर्यटकांची नाही तर परदेशातील पर्यटकांचीही मोठी गर्दी असते. शिवाय पुष्कर मेळा हा उंट आणि घोड्यांच्या खरेदी विक्रीसाठी ओळखला जातो. या मेळ्यात रोज करोडोंचा व्यवहार होतो. येथे विक्रीसाठी येणा-या घोड्यांची विक्री काही हजारापासून ते लाखांपर्यंत करण्यात येते. पुष्कर मेळ्यात घोड्यांच्या या बाजारासाठी अवघ्या देशातून गर्दी होते.  15 नोव्हेंबरपर्यंत होणार असलेल्या या पुष्कर मेळ्यातील घोडे, त्यांच्या किंमती आणि त्यांना देण्यात येणारी फाईव्हस्टार सुविधा बघितली तरी सामान्यांचे डोळे विस्फारतील. राजस्थानच्या वाळवंटातील पुष्कर हे मोठे धार्मिक स्थान आहे. ब्रह्मदेवाचे एकमेव मंदिर असलेल्या या पुष्करमध्ये दरवर्षी होणारा पुष्कर मेळाही जगप्रसिद्ध आहे. (Pushkar Mela)

या पुष्करमेळ्यात होणारी उंटांची शर्यत बघण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं येतात. सोबत राजस्थानी जीवनशैली बघण्यासाठी आणि राजस्थानी भोजनाचा आस्वाद घेण्यासाठीही येथे मोठी गर्दी होते. पुष्कर जत्रेत मिशांची मोठी स्पर्धा आयोजित केली जाते, जी पाहण्यासाठी लोक दूरवरून येतात. याशिवाय फोटोग्राफी, पगडी बांधणे असे मजेदार कार्यक्रमही येथे आयोजित केले जातात. याशिवाय पुष्कर मेळा उंट, घोडा यांच्या खरेदी विक्रीचे सर्वात मोठे स्थळ आहे. करोडो रुपयांच्या घरात येथे ही खरेदी विक्री होते. लाखोंच्या घरात असलेल्या घोड्यांना बघायलाही पर्यंटक येतात. देशभरातून फार्म चालवणाऱ्यांनी पुष्कर मेळ्यात आपले घोडे आणले आहेत. यामध्ये मारवाडी जातीशिवाय काठियावाडी आणि सिंध जातीचेही घोडे मोठ्याप्रमाणात आले आहेत. यावेळी केवळ उत्तर भारतातूनच नाही तर दक्षिण भारतातूनही उत्तम दर्जाचे घोडे मेळ्यात आले आहेत. (Social News)

4 हजार 633 घोडे पुष्कर मेळ्यात आले आहेत. यावर्षीच्या पुष्कर मेळ्यात गाजलेल्या घोड्यांपैकी एक घोडी आहे, नुकरी. या नुकरी घोडीची किंमत चार लाख लावली गेली. तर साडेतीन लाखाला एक उंट विकला गेला. विशेष म्हणजे, या पुष्कर मेळ्यात यावर्षी प्रथमच सर्वात छोट्या गायीही विकण्यासाठी आणण्यात आल्या आहेत. या पुंगनूर गायींचीही विक्रीही मेळ्यात झाली आहे. या पुंगनूर गायी सर्वच विकल्या गेल्या असून त्या विक्रेत्यांकडे गायींसाठी आगावू नोंदणीही करण्यात आली आहे. पशुपालनासाठी पुष्कर मेळा मोठी सुवर्णसंधी असते. या मेळ्यात घोडे, उंट, म्हशी, गायी खरेदी करण्यासाठी ही एकमेव जागा आहे. मेळ्यात जनावरांसाठी लागणा-या सर्व आवश्यक वस्तूही खरेदी करता येतात. शिवाय त्यांच्या खाद्याचीही विक्री येथे होते. शेतक-यांना उपयोगी पडणा-या जनावरांसाठी सरकारी योजनेतूनही पैसे देण्यात येतात. या सर्वांची माहिती या पुष्कर मेळ्यात शेतक-यांना देण्यात येते. त्यामुळे राजस्थान नाही तर अन्य राज्यातूनही शेतकरी गर्दी करतात. यावर्षा पुष्कर मेळ्यात राजस्थानसह, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, ओडिसा, कर्नाटक, गुजरात, पंजाब, हरियाणा येथील पशुविक्रेते आणि खरेदीदार गेले आहेत. (Pushkar Mela)

======

हे देखील वाचा : प्रयागराजमध्ये हजारो दिव्यांची रोषणाई !

====

यातही घोडे विक्रेत्यांची संख्या पुष्कर मेळ्यात अधिक आहे. यावर्षीची सर्वात महागडी घोडी जोधपूरहून आलेली नुकरी घोडी ठरली आहे. संपूर्ण पांढ-या रंगाची ही नुकरी घोडी महाराष्ट्रातील रणजीत यांनी विकत घेतली आहे. शिवाय दुबईमधूनही काही व्यापारी या मेळ्यात घोड्यांच्या खरेदीसाठी आले आहेत. यापैकी काहींना आपल्या फार्महाऊसमध्ये घोडे पालन करायचे आहे. तर काहींना रेससाठी घोड्यांना खरेदी करायचे आहे. त्यामुळे मेळ्यात घोड्यांची किंमत 50 हजारापासून सुरु होऊन काही लाखापर्यंत पोहचलेली आहे. या सर्व घोड्यांसाठी पुष्कर मेळ्यात ज्या सुविधा पुरवण्यात येतात, ते ऐकून डोळे विस्फरतात. काही घोड्यांचे तंबू हे पूर्णपणे एअर कंडिशनर आहेत. राजस्थानचा हा मेळा वाळवंटी भागात असतो. दुपारी रेती तापली की या भागात वातावणारत उष्मा वाढतो. त्यांच्या घोड्यांना त्रास होऊ नये, यासाठी घोड्यांना एसीची सुविधा असते. शिवाय त्यांच्यावर थंड पाण्याचा कायम शिडकावा करण्यात येतो. या घोड्यांची सफाई करण्यासाठीही खास प्रकारचा ब्रश वापरण्यात येतो. काही घोड्यांच्या आहारासाठी दिवसाला दहा हजारांचा खर्च करण्यात येत आहे. हे शानदार घोडे ज्या तंबूत आहेत, तिथे सर्वसामान्य पर्यटकांनाही तिकीट घेतल्याशिवाय सोडण्यात येत नाही. (Social News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.