सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. जवळपास 9 दशलक्ष चौरस किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असेलेले हे वाळवंट पश्चिमेला अटलांटिक महासागरापासून पूर्वेला लाल समुद्रापर्यंत संपूर्ण उत्तर आफ्रिकेत पसरलेले आहे. या वाळवंटात काही भागात दरवर्षी 1 मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो. पण नुकताच या भागात मोठा चमत्कार झाला आहे. मोरोक्कोच्या या वाळवंटी भागात एवढा पाऊस पडला की गेल्या काही वर्षापासून कोरडी पडलेले तलाव भरुन गेले आहे. पुढील वर्षभर पुरेल एवढा पाण्याचा साठा येथील तलावात जमा झाला आहे. दोन दिवस या भागात कधी नाही एवढा पाऊस पडला. चक्रीवादळासारख्या या पावसानं येथे प्रचंड विध्वंस केला. वाळवंटात उभी असलेली मातीची घरे पार ढेपाळली. त्यामुळे असा वादळी पाऊस म्हणजे देवाचा कोप असल्याचे काहींना वाटले. मात्र या पावसांन मोरोक्कोच्या वाळवंटात पुढील वर्षभर पुरेल एवढा पाण्याचा साठा उपलब्ध झाला आहे. या भागात घोटभर पाण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते, तिथे आता तरी पाण्यानं काठोकाठ भरली आहेत, म्हणजेच हा पाऊस आपल्यासाठी वरदानच होता, असाही एक सूर लागत आहे.
मोरोक्कोच्या सहारा वाळवंटामध्ये नुकताच निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार पाहायला मिळाला. या वाळवंटात कधी पाऊस हा शब्दही ऐकायला येत नाही. अशात धो धो पाऊस कधी येथे पडेल, हे स्वप्नातही खरे वाटणार नाही. पण या सहाराच्या वाळवंटात नुसताच पाऊस नाही तर चक्क चक्रीवादळ आलं. या वादळानं सहारातील ताडाची झाडे भुईसपाट झाली. मात्र त्यासोबत येथील वाळूचे ढिगारेही भूईसापट होऊन त्याजागी पाण्याची तळी निर्माण झाली आहेत. ही गोष्ट वाचून आश्चर्य वाटेल, मात्र सहाराच्या वाळवंटात रहाणा-यांसाठी हा सर्वात मोठा चमत्कार आहे. सध्या येथील वाळूच्या ढिगा-यांमध्ये पाण्याचा मोठा साठा तयार झाला असून ही तळी येथील सजीवांसाठी पुढचे वर्ष तरी दिलासादायक ठरणार आहेत. मात्र या सहारात एवढा पाऊस पडलाच कसा हा प्रश्न पर्यावरण संशोधकांना पडला आहे. पण या पावसानं जगातील सर्वात कोरडा प्रदेश म्हणून गणले जाणारे सहारा वाळवंट हिरवेगार दिसू लागले आहे. मोरोक्कोच्या आग्नेयेला असलेले सहारा वाळवंट जगातील सर्वात कोरड्या ठिकाणांमध्ये गणले जाते. या वाळवंटात पाऊस अगदी नावाला पडतो. उन्हाळ्याच्या उत्तरार्धात क्वचितच येथे पावासाच्या काही सरी येतात. गेल्या आठवड्यात या वाळवंटात दोन दिवसांत वार्षिक सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला.
येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान 250 मिमीपेक्षा कमी आहे. पण उत्तर-पश्चिम आफ्रिकेत आलेल्या मोठ्या वादळासोबत मुसळधार पाऊसही या वाळवंटात झाला. त्यानंतर मोरोक्कोच्या कोरड्या वाळवंटात तलाव तयार झाले आहेत. मोरोक्कोची राजधानी राबाटच्या दक्षिणेस सुमारे 450 किलोमीटर अंतरावर असलेल्या टॅगौनाइट गावात 24 तासांच्या कालावधीत 100 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. हा पाऊस या भागातील सर्वोच्च पाऊस होता. सहारातील वाळवंट बघायला येणा-या पर्यटकांसाठी ही सर्वात अदभूत घटना होती. या पावसामुळे ताडाच्या झाडांभोवती असलेल वाळूचे ढिगारे जाऊन तिथे पाण्याची तळी तयार झाली होती. मोरोक्कोच्या हवामानशास्त्र महासंचालनालयाचे हौसिन यूआबेब यांनी गेल्या 30-50 वर्षांत पहिल्यांदाच इतक्या कमी कालावधीत इतका पाऊस झाला असल्याचे सांगितले.
======
हे देखील वाचा : आशिया खंडातील एकमेव वाहनमुक्त हिल स्टेशन “माथेरान”
======
या पावसाला हवामानशास्त्रज्ञ एक्स्ट्राट्रॉपिकल वादळ म्हणतात. अशा प्रकारची वादळे या भागात वारंवार झाली तर या भागातील हवामान बदलण्याची आशा त्यांना आहे. तसेच या भागात वृक्षसंपदा वाढवण्यासाठी जे प्रयत्न होत आहेत, त्यात वाढ होईल, असेही त्यांनी सागंतिले. कारण गेल्या काही वर्षापासून मोरोक्कोच्या बहुतांश भागामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. यातून मार्ग काढण्यासाठी येथील शेतक-यांनी शेततळी बांधली होती. पण पाऊसच नसल्यामुळे ही शेततळी आणि जमिनी सोडून शेतकरी अन्यत्र स्थलांतरीत झाले होते. मात्र पावसामुळे ही शेततळीही भरली आहेत. शिवाय जमिनीमध्येही माफक प्रमाणात पावसाचे पाणी साठले असल्यानं या भागातील स्थलांतरीत झालेले शेतकरी पुन्हा येण्याची शक्यता आहे. असाच पाऊस यानंतरही काही दिवस येईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
सई बने