मध्यप्रदेशमधील उज्जैनमधील श्री महाकालेश्वर हे भारतातील बारा प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या मंदिरात अहोरात्र शिवरात्र भक्तांची गर्दी असते. मात्र या महाकालेश्वर मंदिरासोबत आणखी एक महाकाला मंदिर आपल्या देशात आहे. हे दुसरे मंदिर भारतातील देवभूमीमध्ये म्हणजेच हिमाचल प्रदेश मध्ये आहे. हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत. त्यातील बैजनाथ मंदिर हे भारतातील दुसरे महाकाल मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. हे मंदिर त्यातील तांत्रिक परंपरेने ओळखले जाते. या मंदिराचा महाभारत काळाबरोबरही संबंध आहे. येथेच पांडवांनी माता कुंतीसोबत तपश्चर्याही केली होती. शिवाय रावणानंही याच मंदिरात भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केल्याचे सांगण्यात येते. (Baijnath Temple)
हिमाचल प्रदेशमध्ये अनेक प्राचीन मंदिर आहेत. त्यातील एक मंदिर म्हणजे कांगडा जिल्ह्यातील बैजनाथ मंदिर. या मंदिराला भारतातील दुसरे महाकाल मंदिर म्हणूनही ओळखले जाते. या बैजनाथ मंदिराबाबत अनेक आख्यायिका आहेत. शिवाय मंदिरबाबत अनेक गुढ कधाही सांगितल्या जातात. त्यातील एक म्हणजे, बैजनाथ मंदिरातील शिवलिंग भगवान शंकराच्या तेजातून प्रकट झाल्याचे मानण्यात येते. या शिवलिंगावर सतत पाणी आणि दूधाचा अभिषेक होत असतो. हा अभिषेक नेमका कुठून होतो, हे अद्यापही समजत नाही. हे पाणी आणि दूध कुठून येते, याचा शोध घेण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. बैजनाथ मंदिरात अभिषेक केल्यास अपमृत्युचा धोका कमी होतो, अशी भक्तांची धारणा आहे. त्यामागे एक कथा आहे. भगवान भोलेनाथ यांनी महाकालाचे रूप घेऊन जालंधर राक्षसाचा येथेच वध केला असल्याचेही सांगितले जाते. (Baijnath Temple)
मृत्यूसमयी जालंधराने महादेवाला त्याची शेवटची इच्छा सांगितली. त्यानुसार त्याच्या मृत्यूनंतर येथे येणा-या प्रत्येक भक्ताला अकाली मृत्यूपासून मुक्ती मिळेल. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे, देशातील हे असे एकमेव मंदिर आहे, जिथे भगवान महाकाल सोबत शनि महाराजांचे मंदिरही आहे. या मंदिरात भगवान शंकराची पूजा केल्यावर शनिची साडेसाती दूर होते अशी भक्तांची श्रद्धा आहे. येथे शनिदेवाची पूजा भगवान शंकराचे शिष्य म्हणून करण्यात येते. या शनिदेव मंदिरात 12 राशींचे खांब आहेत. या खांबांवर भाविक दोरा बांधतात. यातील आपल्या राशीच्या स्तंभावर धागे बांधल्याने शनीची शांती होते आणि जीवनातील आजार, अल्प मृत्यू आणि कोर्ट केसेसपासून मुक्ती मिळते, साडेसातीची परिणाम कमी होतो असेही सांगतात. भाद्रपद महिन्यात भगवान शनी आपले गुरु श्री महाकाल यांच्या चरणी निवास करतात अशी आख्यायिका आहे. यावेळी मोठी जत्रा भरते. याला लाखो भाविकांची गर्दी होते. (Baijnath Temple)
पाच दशकांपूर्वी बैजनाथ मंदिर अघोरी साधंचे निवासस्थान म्हणून प्रसिद्ध होते. त्यावेळी मंदिरात शिवभक्तांना फक्त महाशिवरात्रीला येण्याची परवानगी होती. मात्र या भागातील अघोरी साधू अन्यत्र गेल्यामुळे शिवभक्त आता रोज या मंदिरात गर्दी करतात. या मंदिरात स्वामी विवेकानंदांनीही काही काळ मुक्काम केल्याचे सांगितले जाते. त्याच दरम्यान मंदिर परिसरात मॉं दुर्गा मंदिराची उभारणी केल्याची माहिती आहे. काही भाविक हे माँ दुर्गेचे प्राचीन मंदिर सुमारे 450 वर्षांपूर्वी मंडीच्या राजाने बांधले असल्याचे सांगतात. मात्र त्यावेळी देवी मातेच्या मूर्तीच्या स्थापनेत अनेक अडचणी आल्या. तेव्हा ही प्रतिष्ठापना होऊ शकली नाही. 1982 मध्ये स्वामी रामानंदजींनी दुर्गा मातेची स्थापना केली होती. मंदिराच्या प्रांगणात गणेश, पार्वती, भैरव, नंदी आणि इतर देवता विराजमान आहेत. मंदिराच्या आतील भिंतींवर अनेक कलात्मक चित्रे कोरलेली आहेत. पांडवांनी वनवासात या ठिकाणी पूजाही केली होती, त्याचे पुरावे म्हणजे, मंदिराजवळील कुंती कुंडात पांडव आणि माता कुंती यांच्या मुर्ती सापडल्या आहेत. मंदिर बांधल्यानंतर पांडवांनी माता कुंतीसह येथे महाकालाची पूजा केली, असेही सांगितले जाते. (Baijnath Temple)
======
हे देखील वाचा : शिवलिंगाला तुळशीच्या पानांचा सुगंध !
======
मंदिर परिसरात सप्तर्षींचेही वास्तव्य होते. या परिसरात असताना सात तलावांची स्थापना झाली. यापैकी ब्रह्मा कुंड, विष्णू कुंड, शिव कुंड आणि सती कुंड ही चार कुंडे आजही मंदिरात आहेत. लक्ष्मी कुंड, कुंती कुंड आणि सूर्य कुंड हे तीन तलाव मंदिराच्या बाहेर असल्याचे सांगितले जाते. ब्रह्मा कुंडाचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते, शिवकुंडाच्या पाण्याने महाकालाला अभिषेक केला जातो आणि हे पाणी आंघोळीसाठीही वापरले जाते, तर सती कुंडाचे पाणी वापरले जात नाही. या ठिकाणी एकेकाळी तीन राण्या सती झाल्याचे मानले जाते. कांगडा येथील स्थानिक बैजनाथ मंदिराला ग्रामदेवतेचा मान देतात. या परिसरातील कुठल्याही गावात शुभकार्य असल्यास त्याचे आमंत्रण पहिल्यांदा महाकाल मंदिरात देण्यात येते. घरातील शुभकार्य चांगले पार पाडावे म्हणून देवाची प्रार्थना करण्यात येते. तसेच शुभकार्य झाल्यावरही महाकाल मंदिरात येऊन ग्रामस्थ देवाचे आभार व्यक्त करतात. (Baijnath Temple)
सई बने