सध्या देशात होत असलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपैकी सर्वांचे लक्ष प.बंगालच्या निवडणुकीकडे अधिक केंद्रित झाले आहे. आणि ते साहजिकच आहे कारण प. बंगालमध्ये भाजपने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसला पराभूत करण्याचा चंगच बांधला आहे. प. बंगालमध्ये गेल्या दहा वर्षांपासून असलेली तृणमूल काँग्रेसची सत्ता उखडून टाकण्यासाठी भाजपने ‘साम-दाम-दंड-भेद’ ही आपली नेहमीची रणनीती अवलंबिली असून त्याचे प्रत्यंतर गुरुवारी झालेल्या ‘नंदीग्राम’च्या निवडणुकीदरम्यान आले. नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक लढवीत असून त्यांच्या विरोधात भाजपतर्फे उभे असलेले ममतादीदी यांचेच एकेकाळचे विश्वासू सहकारी सुव्येंदु अधिकारी (Suvendu Adhikari) यांनीच त्यांना तगडे आव्हान दिले आहे.
‘काट्यानेच काटा काढावयाचा’ हे तंत्र भाजपने प. बंगालच्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच वापरले आहे. त्यामुळे राज्यातील भाजप पक्ष (BJP) बळकट करण्यासाठी भाजपचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी तृणमूल काँग्रेसलाच खिंडार पाडले. टीएमसीचे अनेक प्रमुख नेते भाजपमध्ये पावन करून आणि प्रामुख्याने त्यांनाच निवडणुकीच्या रिंगणात उभे करून भाजपने वेगळी चाल खेळली आहे. तृणमूल काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावण्याचे प्रयत्न या चालीमुळे यशस्वी होताना दिसत आहेत. यावेळी राज्यात भाजपची सत्ता येणारच अशी हवा निर्माण करण्यात भाजप नेत्यांनी कोठेही कसर ठेवलेली नाही.निवडणूक जाहीर होताच नंदिग्रामला पहिल्यांदाच आल्यानंतर एका अपघातात त्यांच्या पाय जायबंदी झाल्यामुळे ममतादीदी ‘व्हीलचेअर’ वरूनच प्रचार करीत आहेत. या अपघाताचे खापर त्यांनी अर्थातच भाजपवर फोडले आहे मात्र भाजपच्या मते ‘ते’ सारे नाटक त्यांनी मतदारांची सहानभूती मिळविण्यासाठी केले आहे. त्यामुळे आधीच ‘चिडक्या’ असलेल्या ममतादीदींच्या चिडचिडीत भर पडली आहे.
गुरुवारी नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतदानाच्यावेळी घडलेले प्रकार पाहता ममतादीदींना पराभूत करण्यासाठी भाजपने ‘सर्वयंत्रतंत्रमंत्र’ वापरल्याचे दिसून येते. पोलीस, केंद्रीय सुरक्षा दल, शिवाय रॅपिड ऍक्शन फोर्सचे जवान यांच्यामुळे अनेक निवडणूक केंद्रांना लष्करी छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यांना केंद्रीय गृहखात्याचे अभय असल्यामुळे आमच्या मतदारांना मतदान करू दिले जात नाही असा आरोप खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आणि शेवटी वैतागून ममतादीदींना घटनास्थळावरूनच राज्यपालांना तसेच निवडणूक आयोगाला आपली कैफियत सादर करावी लागली परंतु साहजिकच त्याची कसलीही दखल घेण्यात आली नाही. एखादा राज्याचा मुख्यमंत्री, मतदानाच्या दिवशी आपल्याच मतदारसंघात एवढा हतबल झालेला यापूर्वी तरी कधी दिसला नसेल.
=====
हे देखील वाचा: शरद पवार – अमित शहा यांच्या भेटीचे गौडबंगाल
=====
गेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा वेगळा मतदारसंघ होता. मात्र यावेळी त्यांनी ‘नंदीग्राम’ मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. २०१६ च्या निवडणुकीत या मतदारसंघातून तृणमूलतर्फे सुव्येंदु अधिकारी हे विजयी झाले होते. त्या निवडणुकीत अधिकारी यांना एक लाख ३४ हजार मते मिळाली होती. यावेळी ममतादीदींनी नंदीग्राम मतदारसंघातूनच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यावर भाजपने लगेच सुव्येंदु अधिकारी यांना आपल्या पक्षात घेऊन त्यांना तेथून तिकीटही दिले. अधिकारी यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे. पी नड्डा, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी आदींच्या प्रचारसभा झाल्या आणि ममतादीदींविरोधात प्रचाराची राळ उडविण्यात आली त्यामुळे ममतादीदींना नंदिग्राममध्येच अडकून पडावे लागले. त्यातच त्यांचा एक पाय जायबंदी झाल्यामुळे त्यांच्या निवडणूकप्रचारावर मर्यादा आली. नेमक्या याच संधीचा भाजपने फायदा घेऊन त्यांना त्यांच्याच मतदारसंघात जेरीस आणण्यात यश मिळविले.
सुमारे अडीच लाख मतदार असलेल्या नंदीग्राम मतदारसंघात सत्तर टक्के हिंदू आणि तीस टक्के मुस्लिम मतदार आहेत. मुस्लिमांची एकगठ्ठा मते आपल्यालाच मिळतील असा विश्वास ममतादीदींना वाटतो तर आपल्याला ९० टक्के हिंदूंची मते मिळतील असा विश्वास अधिकारी यांना आहे. त्यामुळे मुस्लिमांबरोबरच हिंदूंची किती टक्के मते ममतादीदींना मिळतात त्यावरचा त्यांचा जय-पराजय अवलंबून आहे, वास्तविक नंदीग्राम हा एकेकाळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला होता परंतु गेल्या दोन विधानसभा निवडणुकीपासून तृणमूलने त्यांचा हा गड उद्ध्वस्त केला. याही निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवार मीनाक्षी मुखर्जी या मैदानात आहेत. मतदारांमध्ये त्यांचीही प्रतिमा चांगली आहे त्यामुळे त्या मुस्लिमांची तसेच हिंदूंची किती मते खातात यावरही ममतादीदी किंवा अधिकारी यांच्या विजयाचे पारडे अवलंबून आहे. त्या मतदारसंघात गुरुवारी झालेले सुमारे ८२ टक्के मतदान पाहता ममतादीदींचा पराभव होणे कठीण आहे असे मानले जाते. एवढे करूनही त्यांचा पराभव झालाच तो एक ‘चमत्कार’ मानावा लागेल. मात्र भाजपची निवडणुकीतील ‘साम -दाम -दंड-भेद’ ही रणनीती लक्षात घेता भाजपाला काहीही साध्य होऊ शकते असे म्हणावे लागेल. त्यासाठी घोडा मैदान जवळच आले आहे. दोन मे रोजी जाहीर होणाऱ्या निवडणूक निकालात ते कळून येईलच.
– श्रीकांत ना. कुलकर्णी