सध्याची ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता इंडस्ट्रीयल ऐवजी कोविड हॉस्पिटलमध्ये प्राधान्याने ऑक्सिजन द्या अशी सूचना आपण आणि आमदार अनिलराव बाबर यांनी जिल्ह्याच्या ऑक्सिजन एजन्सीला दिल्याची माहिती खासदार संजय पाटील यांनी दिली. तसेच पालकमंत्री जयंत पाटील यांनी मुंबईतील डॉक्टर आणि स्टाफ आपल्या जिल्ह्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले असून लवकरच त्यास यश येईल असेही खासदार संजय पाटील यांनी सांगितले आहे.
विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी हायफ्लो ऑक्सिजन मशीन देण्यात आले. त्याचे वितरण खासदार संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संजय पाटील हे बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, गेल्या दोन दिवसांपूर्वी विटा बचाव कोरोना समितीने बैठक घेतली. यावेळी काही उपाययोजना सांगितल्या होत्या. त्यामध्ये हायफ्लो ऑक्सिजन मशीनची गरज होती. मी देखील जवळपास २८ मशीनची ऑर्डर दिली आहे. त्यातील काही मशीन देखील विट्याला देणार आहे. विट्याचा राजा मंडळाने रुग्णांची गरज ओळखून चांगले काम केले आहे. यातून लोकांचे जीव वाचणार आहेत. दरम्यान, मशीन मिळाल्या असल्या तरी लागणारा ऑक्सिजन उपलब्ध होणे गरजेचे आहे. याची कमतरता आहे
याबाबत प्रश्न विचारला असता यावर खा. संजय पाटील म्हणाले, मी स्वतः काल जिल्ह्याच्या एजन्सीला बोललो, आमदार अनिलभाऊ सुद्धा कराडच्या डिलरशी बोलले आहेत. ज्या ठिकाणी लिक्विड ऑक्सिजन तयार होतो, तिथेही संपर्क साधला आहे. ऑक्सिजनच्या ड्युरा मशिन्स आवश्यकतेनुसार मिळतील. तसेच इंडस्ट्रीत ऑक्सिजन देण्यापूर्वी प्राधान्याने हॉस्पिटलमध्ये पुरवठा करावा, यासाठी शासकीय पातळीवर बोलणे होऊन सूचना देण्यात आल्या आहेत, तासगावात आम्ही आज दुपारी कोविड रुग्णालय सुरू करतोय. त्यासाठी खासगी डॉक्टरांची मदत घेत आहोत. पॅरामेडिकल स्टाफसाठी काही सेवानिवृत्त लोकांशी बोलणे झाले आहे. त्यांना आमची पालिका पगार देणार आहे.
सांगली, विटा परिसरातील शिकाऊ विद्यार्थी, स्वयंसेवक तयार आहेत. अशी यंत्रणा आपल्याकडेही उभा राहावी याबाबत आमदार बाबर आणि स्थानिक कोरोना बचाव समितीने प्रयत्न करावेत. खासगी डॉक्टर धाडसाने पुढे येत आहेत. शासकीय ऑर्डर असेल तर त्यांना विम्याचे संरक्षण मिळते. ही मंडळी जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, शिवाय पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे.
मुंबईतील काही स्टाफ आणि मशिन्स जिल्ह्यात यावेत यासाठी त्यांचे काम सुरु आहे. लवकरच तिकडूनही मदत येईल. परिस्थिती गंभीर आहे. सर्वांनी मदतीची भूमिका घेऊन लोकांना दिलासा देण्याची गरज आहे.यावेळी आमदार अनिल बाबर, विट्याचा राजा मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक अमोल बाबर, माजी जि. प. सदस्य तानाजी पाटील, सुहास बाबर, फार्मसी कौन्सिल अध्यक्ष विजय पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष रवीअण्णा देशमुख, डॉ. अलोक नरदे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन हेमंत बाबर, मंडळाचे उपाध्यक्ष पप्पू दाजी कदम, सौरभ रोकडे, नंदकुमार पाटील, सुरेश पाटील, महेश घोरपडे, शिवसेना शहराध्यक्ष राजू जाधव, दिलीप किर्दत, प्रकाश बागल आदी उपस्थित होते.