Home » साॅइल सोऽल साहित्यिक 1

साॅइल सोऽल साहित्यिक 1

by Correspondent
0 comment
Share


साहित्यिक, त्याच्या लेखणीचा आत्मा, ज्या भूमीतून तो रुजून येतो ती माती आणि त्या लेखणीचा बहर यांचा मागोवा घेणारी लघुलेख – मालिका.

‘त्याच्या’ कथेला त्याच्या खिशात लपून बसण्याची सवय होती. शोधू म्हणता त्याला ती सापडत नसे.

‘ मी कथांचा लेखक ‘असण्याचा’ प्रयत्न करतो, आव आणतो, तशा नेमक्या पोझमध्ये बसण्याचा प्रयत्न करतो. एका मागून एक सिगारेट शिलगावत राहतो. पण काहीही होत नाही. मग उठतो आणि इतर गोष्टी करतो.माझ्या खिशात, माझ्या नजरेआड पडून राहिलेली ती नाठाळ गोष्ट काही माझ्या मनात येत नाही. मी तुम्हाला शपथेवर सांगतो की, मी कसा लिहितो याबद्दल मला काहीही माहिती नाही.

मग मी पेन उचलतो आणि काही ओळी खरडायला सुरुवात करतो. माझे मन अजूनही रिक्त असते — पण एव्हाना माझा खिसा भरलेला असतो. आणि मग जादू व्हावी तशी आपोआपच एक पक्व कथा बाहेर डोकावते.या अर्थाने मी मला तितकासा लेखक मानत नाही तर खिसेकापू समजतो. मी माझा स्वतःचाच खिसा कापतो आणि त्यातल्या गोष्टी तुमच्याकडे सुपूर्द करतो.
माझ्यासारखा खुळा माणूस तुम्ही कधी बघितला आहे का?’

खिशातल्या गोष्टी इतरांना वाटणारा असा हा कलमबहाद्दर. सआदत हसन मंटो. मंटो… ह्यांचा उल्लेख असा एकेरी करावा की करू नये? कुठल्याही ज्येष्ठ, प्रसिद्ध व्यक्तींचा उल्लेख कसा करावा, याबद्दलही आपल्याकडे वाद होतात. इतरांचं सांगू शकत नाही, पण ‘मंटो’ ह्या व्यक्तीबद्दल एक वेगळं आकर्षण वाटतं. असं वाटतं, तो हिरो आहे त्याच्याच कथेचा. लिहिण्याच्या ओघात जसं लिहिलं जातं, गाईडमधला देव, अनाडीमधला राज, साहब-बीबीमधला गुरुदत्त, जंजीरमधला अमिताभ… तसा उर्दू कथांमधला हा आपला मंटो. म्हणून ‘हे’ मंटो नाही तर ‘हा’च मंटो.



43 वर्षांच्या आयुष्यात, म्हणजे खरं तर पहिली 12-15 सोडली तर, 30 वर्षांच्या आयुष्यात लिहिल्या गेलेल्या त्याच्या खिशातल्या कथांनी त्याला शतकातला एक महान कथाकार बनवलं. मनस्वीपणा हे महान व्यक्तिमत्त्वांचं एक व्यवच्छेदक लक्षण असावं, जे त्याच्या चरित्रात, लेखनात दिसतं. हिन्दुस्तान नाव असलेल्या विशाल उपखंडाची दोन शकलं झालेली ज्या संवेदनशील मनाच्या लेखकांनी, कवींनी, कलाकारांनी पाहिली, अनुभवली विशेषतः आपल्या बालवयातआणि तारुण्यात; त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर या भयंकर घटनेचा जबरदस्त प्रभाव दिसून येतो. दुभंगलेला पंजाब आणि उत्तरवायव्य प्रदेश इथून स्वातंत्र्योत्तर काळात भारतात अनेक कलाकार आले, अनेक इथून पाकिस्तानात गेले. त्यामुळे स्थलांतरितांचे जगण्याचे प्रश्न, मानसिक आंदोलनं, बदललेल्या विचारधारा यांची प्रतिबिंबं या कलाकारांच्या स्वातंत्र्योत्तर कलाकृतींमध्ये दिसतात. बदललेल्या आयुष्यामुळे काही लेखकांच्या लेखनशैलीतही बदल झाला. मंटो त्यापैकी एक.

आयुष्याची शेवटची काही वर्षं त्याने पाकिस्तानमध्ये काढली. फाळणीपूर्वी तो मुंबईतल्या चाळीत राहत असे. मुंबईतील फिल्म स्टुडियोंमध्ये नोकरी करत असे. नंतर मुंबईहून लाहोरला जाऊन तो स्थायिक झाला. ‘त्याच्या स्वतःच्या कुटुंबातील सगळेच लहान होते, ते बघता आणि मुंबईतील त्या वेळचा (फाळणीच्या वेळचा) हिंस्रपणा लक्षात घेता त्याने मुंबई सोडली यात काही आश्चर्य नाही. पण तो परत का आला नाही, ही गोष्ट मात्र उलगडत नाही. ते एक रहस्यच आहे.मंटो तिकडे गेल्यामुळे एक गोष्ट झाली, ती म्हणजे तो लेखक म्हणून आमूलाग्र बदलला.मुंबईतील खेळकरपणा त्याच्या लेखनातून हरपला. त्याचे सगळ्यात निराशावादी लेखन आणि काही विपरीतता आविष्कृत करणारे लेखन या नव्या देशातच लिहिले गेले.’


आकार पटेल ह्यांनी जो निष्कर्ष काढला आहे त्यावरून एक लक्षात येतं की, लेखकाचा बदललेला भोवताल हा त्याच्या जगण्यावर आणि पर्यायाने लेखनावर कसा प्रभावशाली ठरतो, याचं मंटो हे एक उत्तम उदाहरण आहे. खरं तर पूर्वसूरींशी, भूतकाळाशी लेखक-कवीचं एक विचित्र नातं असतं. आपल्या लेखनात कधी तो आवर्जून भूतकाळाचे संदर्भ घेतो, कधी रूपकात्मक पद्धतीने, कधी काही. काही लेखक-कवी आपल्या इतिहासातील, भूतकाळातील अनेक घटनांना, माणसांना आपल्या कलाकृतीचं श्रेय देतात. तर भविष्यकाळाबद्दल लेखक-कवीला कमालीची उत्सुकता असते. भविष्याच्या स्वप्नात रममाण व्हायला त्याला आवडतं.पण मंटो हे दोन्ही काळ नाकारतो.

‘माझ्या दृष्टीने भूतकाळातल्या आठवणी म्हणजे नुसती बरबादी. आणि आसवांचा काय उपयोग? माहिती नाही मला. मी कायमच ‘आज’वर लक्ष केंद्रित करतो. ‘काल आणि उद्या’मध्ये मला अजिबात रस नसतो. जे घडून जायचे होते ते घडून गेलेले असते आणि जे घडायचे असेल ते पुढे घडणार असते.’

केवळ ‘आज’ला मानणा-या आणि ‘आज’बद्दल लिहिणा-या या लेखकाची लेखणी ‘भूतकाळात’ जमा झालीच नाही. ती ‘कालातीत’ ठरली. याचं एक उत्तम उदाहरण…

‘हिन्दुस्तान को लीडरों से बचाओ ! —

हे लोक — नेते मंडळी — धर्म आणि राजकारण म्हणजे एखादा पांगळा, लुळा माणूस असावा असे त्यांना वागवतात. पैशाची भीक मागण्यासाठी त्याला सगळीकडे हिंडवतात. त्याचे शव खांद्यावर घेऊन मिरवतात.पण प्रत्यक्षात असे आहे की धर्म जसा होता तसाच आहे आणि नेहमी तसाच राहील. धर्माचे तत्त्व हे अबाधित आणि भक्कम आहे. ते अपरिवर्तनीय आहे, लाटांच्या धडकांनीही कधीच न झिजणा-या एखाद्या पर्वतासारखे आहे. प्रचंड मिरवणुकांच्या अग्रभागी राहून, जाडजूड हारांच्या वजनांनी वाकून, पोकळ शब्दांची न संपणारी भाषणे करून, ते त्यांच्यासाठी सत्तेकडे जाणारा रस्ता तयार करतात.
भारताला अशा आपापल्या सुरात गाणा-या भरमसाठ नेत्यांची अजिबात आवश्यकता नाही.’

भूत-भविष्याला नाकारणारा असा हा ‘अल्पजीवी’ लेखक आणि त्याची ‘कालजयी’ लेखणी. अभिव्यक्ती-स्वातंत्र्य नसलेल्या परकीय राजसत्तेत जगताना मंटोची लेखणी कथेसारख्या साहित्य प्रकारातूनही ज्या पद्धतीनं अभिव्यक्त झाली ते पाहून आश्चर्य वाटतं.त्याच्या लेखणीला मद्याच्या धुंदीचा गंध आहे. तिच्यामध्ये सिगारेटच्या धुराची वलयं आहेत. बेफिकीर जगण्याचा माज आहे. तिच्यावर स्वतःच्या आणि इतरांच्या आयुष्यालाही निराशेच्या गर्तेत लोटण्याचा आरोप आहे.

त्यानंच लिहून ठेवलंय ‘मला लेखनाचे व्यसन आहे, जसे मला पिण्याचे व्यसन आहे. मी जेव्हा लिहीत नसतो तेव्हा मला वाटते की, मी विवस्त्र आहे, मी अंघोळ केली नाहीये, मी माझे पहिले ड्रिंक घेतले नाहीये.’ भारतीय वाचकांसाठी, भारतीय भाषेत (नस्तलिक भाषा) लिहिणारा असूनही पाकिस्तानी लेखक म्हणून त्याच्यावर शिक्का आहे. विद्रोहाचे, कायदेशीर कारवायांचे खटले आहेत. तेव्हाही मंटोची लेखणी नाकारली गेली होती आणि आताही काही प्रमाणात, काही वर्तुळांतून नाकारली जाताना दिसते. इतकं असूनही ती लेखणी गेल्या शतकातील उच्च लेखण्यांच्या यादीत स्थान मिळवून आहे.

कदाचित आज त्याच्या लेखनाबद्दल कौतुकानं लिहिणारे, त्याच्या कथांना आदर्श मानून वाचणारे, त्या कथांपासून प्रेरणा घेणारे साहित्यविश्वात अनेक जण असतील. पण असाच एखादा मंटो आज आपल्या अवतीभवती असेल तर आपल्याला तो सहन होईल का? आज आपल्या तथाकथित पुरोगामी देशात त्याच्या लेखणीप्रमाणे किती लेखण्या व्यक्त होतात आणि किती पुरोगाम्यांना त्या सहन होतात? असेही काही सवाल या निमित्ताने मनात आले.

खरं तर लेखक-कवीच्या लेखणीला त्याच्या कलाकृतीतून तिच्यापुरतंच शोधावं. तिच्या आत्म्यामधून, त्या लेखकाच्या जगण्यामधून शोधणं तसं कठीणच. शोधूही नव्हे म्हणतात. गुंता होतोच. अर्थात कलाकार, साहित्यिक यांच्याबद्दल, त्यांच्या कलाकृतींबद्दल सत्यकथा, दंतकथा, काल्पनिक कथा, सुरस कानगोष्टी हा आजच्या ई-तंत्रज्ञान युगातील एक वेगळा लेखनप्रकार होऊ शकेल. (आणि तसंही गेल्या शतकभरातील या कलाकार लोकांनी असा भरपूर चटकदार मसाला आपल्याभोवती आपल्या आत्मचरित्रांतून आणि त्यांच्याबद्दल लिहिणा-या चरित्र-समीक्षकांनी त्यांच्या चरित्रांतून तयार करून ठेवला आहे, असं म्हणतात. असो.)



तरी हा गुंता अलवारपणे हाताळला तर साॅईल-सोल-साहित्यिक अशी जी संगती सापडत जाते, ती वाचक म्हणून आनंद देते. अर्थात ही संगती शोधताना तिच्यातून समोर येणारे वैचारिक ‘इझम’, ‘वाद’, टीका इत्यादी यांचा विचार करणंही अपरिहार्य ठरतं. मंटोच्या लेखणीचा आत्मा, जिथे ती रुजली ती भूमी, त्याचा-तिचा भोवताल.
तिच्यातून प्रत्ययास येणारे बहर.आजही आपण त्याची अनुभूती घेतच आहोत, या लेखांमधून घेत राहू. त्यांना शोधण्याचा, उलगडण्याचा प्रयत्न करू.

त्यानंच लिहून ठेवलंय…जेव्हा माझ्या हातात फाऊंटन पेन नसते तेव्हा मी केवळ सआदत हसन असतो.
असा एक माणूस की, ज्याला माहिती असते, पण फारसे व्यक्त करता येत नाही. मग माझे पेन, माझी लेखणी मला मंटोमध्ये बदलते.’

—–सआदत हसन मंटो.

(क्रमशः-)

(संदर्भ — ‘मी का लिहितो?’- संपादन – आकार पटेल – अनुवाद – वंदना भागवत)
( परवानगीसह साभार — सकाळ प्रकाशन, पुणे, प्रथम आवृत्ती, 2016.)

———- © डाॅ निर्मोही फडके.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.