सर डोनाल्ड जॉर्ज ब्रॅडमन म्हणजेच डॉन ब्रॅडमन यांचा जन्म २७ ऑगस्ट १९०८ न्यू साऊथ वेल्स, ऑस्ट्रेलिया येथे झाला. सर डॉन ब्रॅडमन यांच्या वडिलांचे नाव जॉर्ज आणि आईचे नाव एमिली होते. त्यांचे आईवडील येवूयेवू या शहरात रहात होते. आजोबा इटालियन होते ते १८२६ मध्ये ऑस्ट्रलियामध्ये स्थाईक झाले. लहानपणापासून ब्रॅडमन हे स्वतःच्या पद्धतीने क्रिकेट खेळ खेळत असे. म्हणजे सराव करताना बॅटच्या जागी स्टंपचा वापर करीत असे आणि चेंडू म्हणून गोल्फ बॉल घेत असे. हा चेंडू खूपच टणक असे. घराच्या मागील विटांच्या भिंतीवर मारलेला चेंडू वेगाने परत यायचा तेव्हा तो परत तसाच वेगाने फटका मारून भिंतीवर परत मारायचा. ह्यामुळे परत येणाऱ्या चेंडूचे टायमींग आणि फटक्याची अचूकता याचा सराव व्हायचा. अश्या कठीण, खडतर सरावांमुळे त्यांचे फटके अचूक असत. त्यांनी शालेय जीवनात पहिले शतक १२ व्या वर्षी केले तेव्हा त्यांनी १२५ धावा काढल्या होत्या.
सर डॉन ब्रॅडमन यांच्याबद्दल किती लिहावे हे थोडेच आहे. कारण प्रचंड अचूकता, कठोर परिश्रम त्याचप्रमाणे कोणत्याही प्रसंगाला तोड देण्याची सवय. ह्यामुळेच ते अनेक विक्रम करू शकले. जे आजपर्यंत अबाधित आहेत. सर डॉन ब्रॅडमन यांनी पहिला कसोटी सामना खेळला तो ३० नोव्हेंबर १९२८ रोजी इंग्लंड विरुद्ध खेळला. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी अनेक रेकॉर्डस् केले आहेत त्यातील काही अजून अबाधित आहेत. १९३२ साली इंग्लंडच्या ‘बॉडीलाईन’ गोलंदाजीला त्यांनी न डगमगता तोंड दिले. त्यांना इतकी प्रसिद्धी मिळाली की त्याचा त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत असे म्हणून त्यांनी निवृत्तीनंतर एकांतवास पत्करला. मला आठवतंय १९८० सालची गोष्ट असेल मुंबईला एका स्पोर्स्ट शॉपमध्ये त्यांचे एक पुस्तक पाहिले त्यावर त्यांची मोठी स्वाक्षरी प्रिंट केली होती. त्यावेळी इंटरनेट वगैरे काही नव्हते. त्यांचा पत्ता मिळवून त्यांना जवळ जवळ २० पत्रे पाठवली. तरी स्वाक्षरी आली नव्हती. एका पार्टीमध्ये सुनील गावस्कर यांना मी सांगितले इतकी पत्रे पाठवली परंतु त्यांची स्वाक्षरी आली नाही तेव्हा ते म्हणाले. निश्चित पाठवतील. ते नेहमी पत्रांना उत्तर देतात. दुसऱ्या वर्षी परत पत्र पाठवले ते त्यांच्या वाढिवसाच्या आधी. सुनील गावस्कर यांचा वाढदिवस १० जुलैला असतो आणि सर ब्रॅडमन यांचा २७ ऑगस्टला. दोघांनाही वाढदिवसानिमित्त पत्रे पाठवली होती. सप्टेंबर महिन्यात पोस्टमनने दोन पाकिटे घरात टाकली. त्यामध्ये एक पाकीट होते सुनील गावस्कर सरांचे. सुनील गावस्कर यांनी पत्राला उत्तर देताना लिहिले होते सर डॉन ब्रॅडमन यांच्यावर पत्राचा वर्षाव करू नकोस, धीर धर आणि पुढे लिहिले होते ‘पेशन्स इज द की’ तर दुसऱ्या पाकीटात सर डॉन ब्रॅडमन यांची स्वाक्षरी होती.
सर डॉन ब्रँडमन यांनी शेवटचा कसोटी सामना खेळला तो १८ ऑगस्ट १९४८ ला तो इंग्लंड विरुद्धच. दुसऱ्या महायुद्धामुळे जास्त क्रिकेटचे सामने झाले नाहीत, जर झाले असते तर सर डॉन ब्रॅडमन यांचे कितीतरी रेकॉर्ड झाले असते. ब्रॅडमन यांनी ५२ कसोटी सामन्यात ६,९९६ धावा केल्या त्या ९९.९४ च्या सरासरीने. त्यात त्यांची २९ शतके आणि १३ अर्धशतके आहेत, सर्वोच धावसंख्या होते ३३४ तर त्यांनी २३४ फर्स्टक्लास क्रिकेट सामन्यात २८,०६७ धावा केल्या त्या ९५.१४ च्या सरासरीने. त्यात त्यांची ११७ शतके आणि ६९ अर्धशतके आहेत आणि त्यांची सर्वोच धावसंख्या होती नाबाद ४५२. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांनी ३५ धावांमध्ये ३ विकेट्स घेतल्या, तर एकूण ३६ विकेट्स घेतल्या. तसेच त्यांनी १३१ झेल पकडले. डॉन ब्रॅडमन यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक ७० मिनिटामध्ये केले ते टास्मानिया विरुद्ध. १९३५-३६ मध्ये त्या इनिंगमध्ये त्यांनी ३६९ धावा केल्या. त्याचप्रमाणे त्यांनी एका दिवसात त्रिशतक तर केले हे सर्वश्रुत आहेच परंतु त्यांनी त्यांच्या संपूर्ण कसोटी क्रिकेटमध्ये फक्त ६ षटकार मारले त्यातले ५ इंग्लडविरुद्व होते आणि एक भारतीय संघाविरुद्ध.
सर डॉन ब्रॅडमन यांनी दोनदा त्रीशतके केली. तर १० वेळा द्वीशतके केली. खरे तर दोनशेच्यावर १२ वेळा धावसंख्या केली असेही म्हणावे लागेल. सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील त्यांची फलंदाजीची सरासरी ८४ च्या वर आहे हे लक्षात घेतले पाहिजे. भारतीय संघाविरूद्ध त्यांनी ५ सामन्यात ६ इनिंग्समध्ये १७८.७५ या सरासरीने ७१५ धावा केल्या त्यामध्ये एक शतक आणि ४ अर्धशतके होती.
अशा या महान फलंदाजाला ‘सर’ हा किताब तर दिला, तर ऑस्ट्रेलियाने ब्रॅडमन यांची प्रतिमा कोरलेले ५ डॉलरचे सोन्याचे नाणे काढले. आजही सर डॉन ब्रॅडमन यांचे नाव संपूर्ण क्रिकेट विश्वात आदराने घेतले जाते.
सर डॉन ब्रॅडमन यांचे २५ फेब्रुवारी २००१ रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी आधीच सांगितले होते मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी जवळच्याच लोकांनी हजर राहावे, रेकॉर्डस् हे तुटण्यासाठीच असतात परंतु सर डॉन यांचे काही रेकॉर्डस् न तुटण्यासाठी आहेत हे पण लक्षात येते.
लेखक: सतीश चाफेकर