एखाद्या निवांत रात्री गच्चीवर पडून असताना आभाळातून चमचमत जाणार विमान बघून आपल्या मनात एक प्रश्न सहज डोकावून जातो. लाल, हिरवी अन पांढरी ही चकाकणारी लाईट्स विमानाला (Airplane light) का असतात? रोडवर चालणाऱ्या गाड्यांना लाईटाची गरज असते हे आपण समजू शकतो. पण विमानाला याची काय गरज?
प्रामुख्याने दोन कारणांसाठी विमानाला लाईटची (Airplane light) गरज भासते. विमान लँड किंवा टेक ऑफ करताना पायलट्सना रनवेवर स्पष्टपणे बघता यावं यासाठी काही लाईटची सोय केलेली असते आणि हवेत असतांना विमानांना एकमेकांची दिशा, जागा कळावी यासाठी देखील काही लाईट्स विमानात (Airplane light) बसवलेले असतात. आता प्रत्येक लाईट्स कुठे आणि कशाकरता बसवलेला असतो याची सविस्तर माहिती घेऊया.
टॅक्सी लाईट्स
हे लाईट्स विमानाच्या समोरील भागावर किंवा पंखांवर बसवलेले असतात. आपल्या गाड्यांच्या लाईट्सचा जसा रस्ते बघण्यासाठी उपयोग केला जातो. ह्यांचा देखील अगदी तसाच लँड किंवा टेक ऑफ करतांना रनवे बघण्यासाठी उपयोग केला जातो. हे लाईट्स विमानाच्या पुढे कित्येक फुटांपर्यंतचा रस्ता प्रकाशित करू शकतात.
लँडिंग लाईट्स
लँडिंग लाइट हे विमानावरील (Airplane light) सर्वात मोठे, तेजस्वी लाईट्स आहेत. ते सामान्यत: पंखांवर, लँडिंग गियरवर किंवा विमानाच्या मुख्य बॉडीखाली बसवले जातात. लँडिंग लाइट्समध्ये खूप अरुंद बीम असते आणि ते थोडेसे खालच्या बाजूने निर्देशित केले जातात त्यामुळे ते टेक ऑफ आणि लँडिंग दरम्यान रनवे प्रकाशित करतात. लँडिंग करताना, विमान जमिनीपासून सुमारे 200 फूट उंचीवर असताना हे लाईट्स रनवेवर प्रकाश टाकू शकतात.
नेव्हिगेशन लाईट्स
हे लाल आणि हिरवे लाईट्स विमानाच्या (Airplane light) पंखांच्या टोकांवर असतात. ते नेहमी जमिनीवर आणि हवेत चालू असतात. लाल लाईट हा डाव्या बाजूला तर हिरवा लाईट उजव्या बाजूला असतो. हे जमिनीवर असलेल्या कोणालाही किंवा उड्डाण करताना इतर विमानांना विमानाची स्थिती आणि दिशा दाखवायला मदत करतात.
========
हे देखील वाचा : ‘या’ परिवारातील सर्व सदस्यांची एक समानच नावे, ऐकून व्हाल हैराण
========
स्ट्रोब लाईट्स
आधुनिक विमानात पंखांच्या मागच्या बाजूला पांढरे लाईट्स लावले जातात त्यांना स्ट्रोब लाईट्स म्हणून संबोधले जाते. विमानांची टक्कर टाळण्यासाठी, विमानांना एकमेकांची स्थिती लक्षात येण्यासाठी या लाईट्सचा वापर केला जातो.
बीकन लाईट्स
विमानाच्या खालच्या आणि वरच्या भागात लाल रंगाचे लाईट्स बसवलेले असतात त्यांना बीकन लाईट्स असे म्हणतात. विमानांची टक्कर टाळण्यासाठी यांचा वापरा होतो.
याव्यतिरीक्त कंपनीच्या लोगोंना प्रकाशित करण्यासाठी देखील विशिष्ट लाईट्सचा वापरा केला जातो. अशाप्रकारे वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या लाईट्सचा वापर विमानात केला जातो.