ठरवून केलेल्या प्रवासात कधी कधी अचानक एखादं स्थान बघण्याचा योग येतो आणि त्यामुळे आयुष्यातील आणखी एक दिवस उजळतो. ज्या मातृभाषेनं आपल्या अवघ्या जीवनाचं मानसिक, बौद्धिक, वैचारिक. सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यात भरणपोषण केलं, तिच्या अलंकृत अस्तित्वाचा प्रारंभ करणाऱ्या कविराजांच्या समाधीचं दर्शन घेण्याचा सुयोग एकदा जुळून आला. तेव्हा फार अप्रूप वाटलं.
आंबेजोगाई देवस्थानच्या परिसरानं सरत्या पावसाळ्यात नयनरम्यता धारण केली होती. दोन डोंगरांमधून खोलवर वाहणारा जयवंती नदीचा खळाळता प्रवाह, हिरवे डोंगरकडे, त्यावरून वाहणारे धवलरंगी धबधबे, पार्श्वभूमीवर निळं-पांढरं आकाश आणि गहिर्या शांततेला गोडवा आणणारा केका (मयूरध्वनी).
डोंगरकड्यांमधून झिरपणारा गारवा अंगावर घेत अशा अप्रतिम रंगचित्रातून तीस-पस्तीस पायऱ्या खाली उतरत जाणा-या. अश्वत्थ आणि इतर वृक्षांच्या सान्निध्यात एका लहानशी कपार. तिथे मराठीतील आद्य कवी मुकुंदराज यांची समाधी पाहून मन स्तिमित झालं. या कपारीचं नैसर्गिक रूप तसंच ठेवून तिला बाहेरच्या बाजूनं लहानसं प्रवेशद्वार आणि दगडी पायर्या बांधल्या आहेत. त्या आठ-दहा पायऱ्या चढून दारातून वाकून त्या कपारीत शिरायचं. का कुणास ठाऊक काही वेगळी आंतरिक शांतता जाणवली तिथे. जेमतेम दोन माणसं दोन बाजूला बसू शकतील एवढीच जागा.
समोर समाधीची शिळा आणि तिच्या डाव्या बाजूला अखंड झिरपणारा दगडातील जलप्रवाह. इतकंच स्थलवर्णन. तिथं बसल्यावर त्या कविराजांशी मनाचा एक हळुवार मुक्त संवाद झाला. “सुमारे आठशे-साडे आठशे वर्षांपूर्वी तुम्ही ज्या मराठी भाषेत ‘विवेकसिंधू’ रचलात ती मराठी भाषा आता सप्तसिंधूपार गेली आहे. मराठीच्या जडणघडणीच्या पर्वातील तुमची ओवीबद्ध काव्यरचना. तुमची प्रतिभा किती, कशा प्रकारे साकार होत गेली हो? आधुनिक काळात आम्ही आमच्या अल्पकुवतीनुसार मातृभाषेची पालखी खांद्यावर घेऊन तिचे भोई बनलो खरे. पण हे सगळे या पूर्वसूरींचे आशीर्वाद.
ज्ञानेश्वर माउलींच्या चरणी जायचा योग अनेक वेळा येतो किंबहुना आवर्जून जाणंं होतं, पण तुमच्या दर्शनाचा लाभ आज पहिल्यांदा मिळाला आणि तो ही अवचित. या प्रशांत ठिकाणी येऊन न मागता खूप काही मिळाल्याचं समाधान घेऊन जात आहे. आशीर्वाद असावेत.” समाधीस्थानाच्या बाहेर मुकुंदराजांच्या जीवनाविषयी एक लोककथा लिहिलेला मोठा फलक आहे. संत ज्ञानेश्वर किंवा इतर संतकवींविषयी ज्याप्रमाणे दंतकथा प्रचलित आहेत तशीच काहीशी ही कथा आहे.
जयत्पाल राजा आणि मुकुंदराज यांच्यविषयीची. त्यात नमूद केलेला काळही चुकीचा वाटला. त्यांच्या रचना असणारे फलक तिथे लावले असते तर पर्यटकांना अकराव्या, बाराव्या शतकातील आपल्या मातृभाषेचं रुपडं बघायला, वाचायला मिळालं असतं. असो.
कुलदैवतस्थानी जाणं हे कुळाचार म्हणून करणं ठीकच. सश्रद्ध मनं हे करतच असतात. परंतु त्याव्यतिरिक्त काही नेमधर्म असतात असं नेहमी वाटतं. ते प्रत्येकानं आपल्या कर्मानुसार ठरवावेत. माझ्या मातृभाषेतील आद्य कवीच्या त्या कुठलाही धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक बडेजाव नसलेल्या साध्या पण निसर्गसंपन्न समाधीस्थानानं माझ्या लेखनविषयक कर्माच्या कुळाचारात मात्र भर टाकली एवढं खरं.
– ©निर्मोही फडके.