‘हिंदी आणि उर्दू गेले काही दिवस भांडत आहेत. हिंदीला पाठिंबा देण्यात हिंदू त्यांचा वेळ का वाया घालवत आहेत? आणि मुस्लीम उर्दूच्या संरक्षणाविषयी इतके चिंताग्रस्त का झाले आहेत? भाषा घडवल्या जात नाहीत, त्या आपापल्या घडतात आणि कोणताही मानवी प्रयत्न अस्तित्वात असलेली भाषा नष्ट करू शकत नाही.मी यावर एक निबंध लिहायला सुरुवात केली, पण त्याऐवजी माझ्या पेनातून एक संवादच कागदावर उतरला.’
(‘हिंदी और उर्दू, ‘मंटोके मज़ामीन, 1954 मधून’)
या प्रस्तावनेनंतर मंटोच्या लेखणीतून उतरलेला संवाद म्हणजे त्याच्या कल्पनाशक्तीचा एक सुंदर आविष्कार आहे. मूळ मुद्दा हा स्वातंत्र्योत्तर काळात हिंदी-उर्दू या दोन भाषांपैकी कोणाला राष्ट्रभाषा म्हणून मान द्यावा, याविषयी चाललेल्या वादासंबंधी आहे.
मुन्शी आणि इक्बाल या दोनच पात्रांमध्ये घडलेला हा अडीच पानी संवाद म्हणजे दोन समाजप्रवृत्तींमधील दोन रंगी शाब्दिक चकमक आहे. वरवर जरी ही दोन पात्रं वाद घालताना दिसत असली, तरी ती अर्थातच प्रातिनिधिक आहेत. त्या प्रत्येकामागे
बुरसटलेल्या विचारसरणींचे अनेक जण उभे असल्याचं दिसतं. जणू ते अनेक जण या दोघांना कठपुतली बनवून नाचवत आहेत. संवाद संपत आल्यावर तर आपणच त्या कठपुतल्यांच्या जागी तर नाही? असाही प्रश्न अनेक वाचकांच्या मनात येऊ शकतो.
या पात्रांच्या नावावरूनच कोणत्या भाषेचा झेंडा घेऊन कोण उभं आहे हे कळतंच, पण गंमत अशी आहे की, ही दोन पात्रं सरळ सरळ भाषिक मुद्द्याला हात घालतच नाहीत. या संपूर्ण संवादात्मक लेखामध्ये कुठेही हिंदी किंवा उर्दू भाषेचा उल्लेखही नाही. वर उल्लेख केलेली एक लहानशी प्रस्तावना करून मंटो संवादाला सुरुवात करतो.
मग हा मुन्शी आणि हा इक्बाल कशाबद्दल बोलतात, तर चक्क सोडा आणि लेमन यामध्ये श्रेष्ठ कोण, याविषयी. म्हणजे मुन्शी हा लेमन घेणारा आणि इक्बाल हा सोडा घेणारा. संवाद जसा पुढे सरकतो तसे हे सोडा-लेमन एकमेकांमध्ये असे काही मिसळू लागतात की, नक्की कोण सोडाप्रेमी नि कोण लेमनभक्त असा सवाल उभा रहावा.
यातील एकेका वाक्याला असलेला तत्त्कालीन राजकीय, सामाजिक, भाषिक संदर्भ लक्षात घेऊन वाचणा-यास तर मनातल्या मनात हसू फुटल्याशिवाय राहणार नाहीच, पण ज्या वाचकाला या लेखाचा कोणताच संदर्भ माहीत नाही त्या वाचकाकरताही हा संवाद म्हणजे निखळ हास्याचा आनंद देणारा ठरतो.भाषेच्या बाबतीत परंपरावादी असणा-या भाषाभिमान्यांना मंटो हलकेच चिमटा काढतो.
‘मुन्शी : माझ्या मते, लेमन जास्त चांगलं आहे.
इक्बाल : असेल. पण माझ्या बापजाद्यांना सोडा चांगला असतो असं सांगताना मी ऐकलंय.
मुन्शी : त्याचं काय? माझ्या वाडवडिलांना लेमन चांगलं असतं असं म्हणताना मी ऐकलंय.
इक्बाल : माझं मत म्हणाल तर… माझ्या मते … मी म्हणेन… पण तुम्ही तुमचं मत मला का नाही सांगत ?
मुन्शी : माझं मत… मला काय वाटतं… त्याचं काय आहे… पण मी माझं मत पहिल्यांदा का सांगू?’
(‘हिंदी और उर्दू, ‘मंटोके मज़ामीन, 1954 मधून’)
हे असे फुकटचे भाषाभिमानी, स्वतःचं ठाम मत नसलेले.या दोघांच्या संवादांतून अगदी साध्या शब्दांतील कोपरखळ्या, अनेक हलके फुलके शालजोडीतील फटके मंटोची लेखणी मारते. तेव्हा, सोडा आणि लेमन एकाच कारखान्यात बाटलीबंद होतात. दोन्हीही एकाच यंत्रावर भरली जातात. असं दोघांचं एकमत होतं. तर मग या वादाचा शेवट काय, तर लेमन-सोडा मिक्सच बरं.
‘मुन्शी : हे बघा, आपण ही दोन्ही पेयं मिसळून हा वाद संपवू.
इक्बाल : मला सोडा-लेमन असं मिसळून हवंय.
मुन्शी : आणि मला लेमन-सोडा असं पेय हवंय.’
(‘हिंदी और उर्दू, ‘मंटोके मज़ामीन, 1954 मधून’)
उर्दू आणि हिंदी यांच्याबद्दलचा गंभीर वाद, अशा प्रकारे सोडा-लेमनच्या रूपकातूनआणि इक्बाल-मुन्शीच्या खुसखुशीत संवादरूपात मंटो लिहितो. इथे कुठेही कुणाच्याही नावाचा थेट उल्लेख नाही की, कुठल्याच एका बाजूचा पुरस्कर्ता असल्याचा आव नाही.परंतु एक कलमबहाद्दर म्हणून वास्तव मांडण्याची कळकळ आहे.
‘लेकी बोले सुने लागे’च्या किंवा ‘सुज्ञास सांगणे न लगे’च्या थाटात मंटोची लेखणी चालते. त्याच्या लेखणीचं एक मिश्कील पण तथ्य दर्शवणारं स्वरूप वाचकांना अनुभवण्यास मिळतं. भारतामधील भाषा-वाद आजचा नाही, तर स्वातंत्र्य मिळाल्यापासून भाषिक प्रांतवार रचनेनंतरही वेगवेगळ्या पातळ्यांवर, वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या प्रांतांमध्ये हा वाद चालूच आहे, हे गेल्या 70 वर्षांचा इतिहास सांगतो. राष्ट्रभाषेचा वाद तर अजूनही चालूच आहे. तेव्हा या गंभीर विषयाला सोडा-लेमन करून हसवता हसवता मंटो वाचकाला विचारमग्न करतो, ही त्याच्या लेखणीची हातोटी.
आज एका जागतिक आपत्तीच्या अनुभवांतून सगळं जग जात आहे. हवं तसं जगण्याचा आनंद गमावणं म्हणजे काय हे थोड्या-बहुत प्रमाणात अनुभवत आहे. अशाच पण वेगळ्या प्रकारच्या दोन मोठ्या जागतिक आपत्ती मागील शतकात जगातील बहुतेक राष्ट्रांनी अनुभवल्या, त्या म्हणजे दोन जागतिक महायुद्धं.

वंशविद्वेष आणि अणुबाॅम्बचा हल्ला यामुळे दुसरं महायुद्ध अधिक विनाशकारी ठरलं. 1939 ते 1945 या सहा वर्षांच्या काळात घडलेल्या या जागतिक आपत्तीमध्ये भारतीय जनता दोन आघाड्यांवर लढत होती. एक ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्यलढ्याची आणि दुसरी महायुद्धाची. ब्रिटिशांचे गुलाम असलेले, जबरदस्तीने सैन्यभरती केले गेलेले भारतीय जवान हे ब्रिटनतर्फे महायुद्धात लढत होते आणि त्याच वेळी सर्वसामान्य जनता आर्थिक मंदी, अन्नधान्य टंचाई, रेशनिंग, महागाई, काळा बाजार यांना तोंड देत होती. या दरम्यान 1942 साली गांधीजींच्या चले जाव चळवळीचे आंदोलन, सुभाषबाबूंच्या आज़ाद हिंद सेनेच्या कारवाया यांचा जोर वाढला होता. या सगळ्या गदारोळात मुंबईतील फिल्म इंडस्ट्रीतील सर्व प्रकारचे कलाकारही आर्थिक अडचणींमध्ये सापडले. त्यांतील अनेकांशी लेखक या नात्याने मंटोची मैत्री होती.
कलाकार म्हटलं की, बहुतेक तो कोणत्या ना कोणत्या लहान-मोठ्या व्यसनाच्या अधीन असणारच, अशी एक खूणगाठ सर्वसामान्य माणसाने स्वतःशी बांधलेली असते. अर्थात ब-याच अंशी ह्या समजुतीला कारणीभूत असतात कलाकारांच्या सवयी आणि त्यांच्याविषयीच्या अफवा, गाॅसिप. आता या धामधुमीच्या काळात जिथे रोजच्या जेवणावरही रेशनिंग लागायची वेळ आली होती, तिथे स्वतःच्या व्यसनांचे शौक पूर्ण करणं, हे सामान्य परिस्थितीमधील कलाकारांना अशक्य होतं. पण व्यसनाधीन माणसं आपली सोय कशी तरी करतातच.
फुकटे मित्र नावाची एक जमात एरवीही अस्तित्वात असते, पण अशा अणीबाणीच्या काळात या जमातीमध्ये वाढ होते, कारण त्यांना आपले अशा प्रकारचे शौक पूर्ण करायचे असतात. माणसाच्या या व्यसनशरणतेचे दाखले विनोदी पद्धतीने मंटो त्याच्या या लेखात देतो, ज्या व्यसनाधीनतेचा तो स्वतःही शिकार होता.
मंटो स्वतः सिगरेट आणि मद्य यांचा भोक्ता होता. कोणत्या ना कोणत्या प्रकारे या काळातही त्याचं हे व्यसन चालूच होतं. त्यामुळे फुकट्या मित्रांचे आलेले अनुभव, भोवतालची निरीक्षणं यांना त्याच्या लेखणीनं हेरलं. अशा वृत्तीबद्दल कोपरखळ्या मारत, विनोदनिर्मिती करत मंटोनं लिहिलेला आणखी एक लेख म्हणजे, ‘मुफ़्त नशों की तेरा किस्मे’ अर्थात ‘फुकट्यांचे तेरा प्रकार’. फुकट सिगारेट पिणारे मित्र आणि त्यांचे तेरा प्रकार.

या फुकट्यांमधील एक प्रकार असा,
‘प्रकार 13
हा प्रकार तुमच्याबरोबर बसून थोडा वेळ गप्पा मारेल आणि मग जाताजाता, तुम्ही बाजूला टाकलेले अर्धवट भरलेले पाकीट उचलेल आणि म्हणेल, ” हे माझ्या पोरासाठी घेऊन जातो. त्याला रिकाम्या पाकिटांशी खेळायला आवडतं.”
(मुफ़्त नशों की तेरा किस्मे’, तल्ख, तर्श और शिरीन, 1954 मधून)
माणूस व्यसनाधीन असतो, म्हणजे काय आणि कशा प्रकारे स्वत्व हरवून बसतो,हे अशा प्रकारे स्वतःवरही टीका करत मंटो सांगतो, तेव्हा माणसाच्या व्यसनाधीन वृत्तीची कीव करावीशी वाटते. अतिशयोक्तीचा वापरही तो करतो, पण अशी उदाहरणं आढळणं अशक्य वाटत नाही.
तथाकथित व्यावहारिक शिक्षणाची कोणतीही पदवी न घेतलेल्या मंटोचं वाचन, व्यासंग, निरीक्षण, आकलन, विनोदबुद्धी आणि सर्जनशीलता वाखाणण्यासारखी होती. मंटोच्या लघुलेखांतून यांचा अनुभव मिळतो.
आणि…पुनश्च नेहमीचाच एक मुद्दा…
थोडाफार तपशील इकडेतिकडे, तरी माणसाची मूळ वृत्ती तशीच, या वास्तवाचा पुनःप्रत्यय मंटोच्या लेखांतून सात दशकांनंतरही येतोच.
(क्रमशः-)
(संदर्भ – ‘मी का लिहितो?’ — संपादन श्री. आकार पटेल, – अनुवाद – वंदना भागवत,
परवानगीसह साभार — सकाळ प्रकाशन, पुणे, प्रथम आवृत्ती, 2016)
– © डाॅ निर्मोही फडके.