बंगाली भाषा. तोंडात रसगुल्ला ठेवून बोलायची भाषा. हिची चव अति गोड. हवेतून वाहत येणा-या लहरींवरून जरी ह्या भाषेतले शब्द कानावर आले, तरी ते साखरेच्या पाकात घोळवलेल्या गुलाबांच्या पाकळ्यांसारखी मधुर चव घेऊनच येतील.
बंगाली भाषेतली नावं फारच अनवट. अतिशय अर्थपूर्ण. एक प्रकारचा अंतर्गत नाद असणारी.त्या माणसाची दाट ओळख करून देणारी. वानगीदाखल ही काही… अवनीन्द्रनाथ, गीतांजली, मृणालिनी, कादंबरी, व्योमकेश इ. बंगाली साहित्याचं, कलेचं योगदान भारतीय सांस्कृतिक इतिहासात मोलाचं आहे. इथल्या जनतेनं, भूमीनं, भाषेनं रक्तरंजित काळ भोगताना आपली जगण्यातली, लढण्यातली विजिगीषा मात्र ढळू दिली नाही.
बांग्लादेश मुक्तिसंग्रामाविषयी काही वाचनात आलं. ते वाचल्यावर असं वाटलं,मातृभाषेकरता माणूस इतका टोकाचा लढा देऊ शकतो? आजच्या काळात मातृभाषेविषयी इतकं अपरंपार प्रेम करणं, तिच्याकरता लढा देणं, जिवावर उदार होणं हे फार भाबडं, संकुचित विचारसरणीचं वाटू शकतं. मानवी भाषा, मातृभाषा इत्यादींबद्दलच्या परिभाषाच किती बदलत चालल्या आहेत.
पण हा इतिहास वाचताना केवळ एक भाषेचा मुद्दाच नव्हे तर भारतीय म्हणून जे काही संचित घेऊन आज एकविसाव्या शतकात आपण जगत आहोत, त्या संचिताच्या मुळाशी असलेल्या काही गोष्टींचा पुनर्विचार करावा असं वाटलं.आपल्या बंगाली मातृभाषेच्या हक्कासाठी लढणारे मुस्लीम नागरिक, हे आहे बांग्लादेशच्या स्वातंत्र्याचे एक रक्तरंजित पान. मातृभाषेचा खरा अभिमान बाळगणार्यांनी त्यांच्याविषयी जरूर सखोल वाचावं.
1947 मध्ये अखंड हिन्दुस्थानची झालेली फाळणी, पंजाब सीमेवरील दृश्यं इत्यादीगोष्टी चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या मनावर कोरल्या गेल्या आहेत. स्थलांतरितांचे जगण्याचे दाहक प्रश्न.सामान्य माणसापासून अनेक कलाकारांपर्यंत, अशा सगळ्या स्तरांवरील माणसांच्या आयुष्यात झालेले आमूलाग्र बदल इत्यादींबद्दल कला-साहित्यात अनेक प्रकारे लिहिलं, मांडलं गेलं आहे.पण त्याचवेळी जन्माला आला पूर्वेकडील पाकिस्तान. भारताच्या ईशान्य दिशेला.ब-याचदा हा इतिहास आपल्या लक्षात येत नाही. तेथील हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही समाजांनी सहन केलेले अत्याचार हादेखील एक काळा इतिहास आहे.
1947 ते 1971 एवढ्या मोठ्या कलावधीमध्ये येथील नागरिकांनी विशेषतः भाषेच्या बाबतीत पश्चिम पाकिस्तानचे अनन्वित अत्याचार सहन केले. बॅ. जिना यांनी पश्चिम व पूर्व या दोन्ही पाकिस्तानची राष्ट्रभाषा उर्दू असेल असं घोषित केलं. प्रत्येक सरकारी कामामध्ये, अभ्यासक्रमामध्ये बंगालीला नाकारून फक्त उर्दू आणि इंग्रजीला स्थान दिलं गेलं. कारण बंगाली ही हिंदूंची भाषा होती.मुस्लिमांच्या देशात ती मातृभाषेच्या स्थानी कशी काय चालली असती?
21 फेब्रुवारी, 1952 रोजी ढाका विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या भाषिक आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्यात बंगाली भाषेचाचा आग्रह धरणारे काही मुस्लीम विद्यार्थी हे बळी ठरले. 1952 पासून पेट घेतलेल्या या असंतोषाची इतिश्री 16 डिसेंबर 1971 रोजी झाली. भारतीय सेनेच्या मदतीने बांग्लादेशचं मुक्तियुद्ध यशस्वी झालं.हिंदू-मुस्लीम शत्रुत्व हा जणू या उपखंडाला मिळालेला शाप. कधीकधी वाटतं, इथल्या पोथ्या-पुराणांमध्ये एखाद्या शापाला असलेल्या उःशापाच्या कितीतरी कथा आहेत. मग या शापाला एखादा उःशाप असेल का? काय केलं म्हणजे तो मिळेल? इथलं राजकारण ह्या समस्येचं भांडवल किती काळ करत राहील कोण जाणे? पण बांग्लादेश मुक्तियुद्ध हे एका गोष्टीकरता अप्रूपाचं ठरलं.
धर्माने मुस्लीम असूनही परंपरेने ज्या भाषेच्या समाजात आपल्या पिढ्या पोसल्या गेल्या त्या बंगाली भाषेलाच आपली मातृभाषा मानून लढा देणारे इथले मुस्लीम नागरिक हे मातृभाषेच्या इतिहासाकरता एक वेगळं उदाहरण ठरले. त्यांच्या सन्मानार्थ युनेस्कोने 21 फेब्रुवारी हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन’ म्हणून घोषित केला गेला.आता ह्या घटनेवरून ते बांग्लादेशी मुस्लीम म्हणजे खरे हिंदूच, फक्त बाटवलेले. मग ते बंगालीच बोलत असले तर त्यात कसलं कौतुक. कोकणी मुसलमान नाही का मराठी बोलत. किंवा पुणे, औरंगाबाद इकडचा मुस्लीम माणूस अस्खलित मराठी बोलतो, असंमनात येणं साहजिक आहे.
मुंब्र्याच्या मुस्लीम वस्तीत राहणारा, ठाण्याला नोकरी करणारा एक मुस्लीम तरुण काही कामानिमित्त मला भेटला. त्याचं नाव कळेपर्यंत माझ्या मनात कणभरानेही ही शंका आली नाही की, हा मुस्लीम असू शकेल. मराठी टायपिंग करणारा तो तरुण, त्याची मराठी व्याकरणाबद्दलची, साहित्याबद्दलची जाण पाहून मलाही आश्चर्य वाटलं. तो हसत म्हणाला, मराठी शाळेतच शिकलोय.घरीही मराठीच बोलतो. आमच्या समाजात गेलो तरच हिंदी. ही अशी अनेक उदाहरणं आपल्याला आजही आजूबाजूला दिसतात.
पण एखाद्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्याकरता एका भारतीय भाषेला कसोटीवर लावणं, तिच्याकरता विद्यार्थ्यांनीही प्राण पणाला लावणं हे आश्चर्याचं वाटतं आणि हे सगळं अशा एका समाजाकडून, जो समाज भारताचा इतिहास, नकाशा,भविष्यकाळ बदलवण्यास कारणीभूत ठरला.
बंगाली भाषेत संभाषण करणारा, तीच आमची भाषा असं सांगणारा एक मध्यमवयीन बांग्लादेशी मुस्लीम गृहस्थ कलकत्त्याच्या प्रवासात भेटला. त्यावेळी हा इतिहास आठवला. त्याला अनेक प्रश्न विचारून मी भंडावून सोडलं. पण तो आपला त्या मिठास असलेल्या बंगाली भाषेतून हिंदीमिश्रित कायसं बोलत राह्यला. गोल मुसलमानी टोपी, पांढरीशुभ्र दाढी, टिपिकल मुस्लीम पेहराव. त्याच्या पानानं भरलेल्या तोंडावाटे आक्रमक हिंदी नव्हे तर गोड बंगाली ऐकायला अगदी वेगळं वाटत होतं.
तेव्हा मनात आलं, मातृभाषेला जीवनमरणाच्या कसोटीवर लावून आयुष्याचा डाव खेळणारे मूर्ख आणि स्वभाषेचा अभिमान वगैरे अंधश्रद्धा मानून, भाषांबद्दल उदार धोरण ठेवणारे शहाणे, इतकं हे भाषा-प्रकरण काळं-पांढरं ह्या दोनच रंगांत विभागण्याएवढं सोपं आहे का? खरंच खूप मोठा विषय आहे हा. तो मुस्लीम चाचा ज्या बंगालीमिश्रित हिंदीत बोलत होता, ती बंगाली मात्र माझ्या कानाला गोडपणाचा अर्क वाटत होती, हे खरं.
‘रक्तमाखा पथे जन्म तोमार….आमि कि भुलिने पारि ।’….– रक्ताने माखलेल्या वाटेवर जन्म तुझा…मी कसा काय विसरू शकतो ?
(–आधार — मूळ बांग्लादेशी बंगाली लेखक – गोलाम मुरशिद, भाषांतर – प्रसाद बर्वे, ‘केल्याने भाषांतर’- त्रैमासिक.)
– © डाॅ निर्मोही फडके.