Home » Noah Ark : रहस्य एका बोटीचे !

Noah Ark : रहस्य एका बोटीचे !

by Team Gajawaja
0 comment
Noah Ark
Share

बायबल हा ख्रिश्चन धर्माचा पवित्र धर्मग्रंथ आहे. याच बायबलमधील एक कथा नव्यानं सांगितली जात आहे. ही कथा आहे, नोहा नावाच्या व्यक्तिची. पृथ्वीवर हिंसाचार वाढल्यानं देवानं मानवजातीचा नाश करण्यासाठी मोठा पूर आणण्याचे ठरवले. पण त्यातून वाचण्यासाठी नोहाला एक मोठे जहाज बांधण्याची आज्ञा दिली. या जलप्रलयातून नोहाला जे जहाज बांधण्याची आज्ञा देवानं केली होती, त्यात प्राण्यांनाही रहाण्यासाठी जागा ठेवायला सांगितले होते. जहाजाची बांधणी पूर्ण झाल्यावर देव जोरदार पाऊस आणि महापूराची निर्मिती करतात. यावेळी नोहाचे सगळे कुटुंब, त्यांचे प्राणी या जहाजावर चढतात आणि आपला जीव वाचवतात. काही काळानंतर पाऊस आणि महापूर कमी होतो. या महापूरामध्ये मोठ्या प्रमाणात सजीवांची हानी होते, मात्र नोहाचे कुटुंब सुरक्षित रहाते. (Noah Ark)

महापूराचे पाणी कमी झाल्यावर मग याच नोहाचे कुटुंब पुन्हा पृथ्वीवर सुखसमाधानानं राहू लागते, अशा आशयाची ही कथा आहे. या कथेचा व्यापक अर्थ लावण्यात येतो. यातील नोहा आणि त्याचे जहाज, काहीजण प्रतिकात्मक मानतात. त्यामागे देवाच्या आज्ञेनुसार कृती केल्यावर जीवनात कितीही संकटे आली तरी त्यावर विजय प्राप्त करता येतो, असा संदेश दिला जातो. मात्र या सर्व संकल्पनांना धक्का लावणारा एक मोठा शोध नुकताच लागला आहे. बायबलमधील या नोहाच्या कथेतील जहाज सापडल्याचा दावा अमेरिकेच्या संशोधकांनी केला आहे. तुर्की या देशामध्ये 4300 वर्ष जुन्या नोहाच्या जहाजाचा शोध लागल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. हे भव्य जहाज तीन मजली आहे. 1948 मध्ये या जहाजाचा शोध एका भूकंपामुळे लागला होता. आता त्यावरील माती हटवण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. एवढ्या जुन्या जहाजाला पाहून शास्त्रज्ञच आश्चर्यचकीत झाले असून बायबलमधील नोहाचे जहाज हेच असल्याची शक्यता त्यांना वाटत आहे. (International News)

बायबल या पवित्र ग्रंथात सांगितलेल्या 4300 वर्षापूर्वीच्या कथेतील जहाजाचा शोध लागल्याचा खुलासा शास्त्रज्ञांनी केला आहे. बायबलमधील कथेनुसार, पृथ्वीवर आलेल्या महाप्रलयामध्ये नोहाच्या एका मोठ्या जहाजाने मानवांना आणि प्राण्यांना वाचवले होते. बायबलमध्ये या जहाजाचे वर्णन करण्यात आले आहे. त्याच वर्णनाशी मिळत्याजुळत्या जहाजाची रचना पूर्व तुर्कीतील द्रुपिनारमध्ये सापडली आहे. ही रहस्यमय रचना बायबलमध्ये वर्णन असलेल्या नोहाच्या जहाजाशी तंतोतंत जुळते. ही रचना अरारत पर्वतापासून 29 किलोमीटर अंतरावर आहे. 538 फूट लांब आणि 13 फूट रुंद अशा या रचनेमुळे बायबलमधील नोहाची कथा पुन्हा एकदा जिवंत झाली आहे. बायबलमधील कथेनुसार पृथ्वीवर तब्बल 150 दिवस महापूर होता. यात सर्व सजीव सृष्टी नष्ट झाली. फक्त नोहानं तयार केलेले जहाजच एवढे मजबूत होते की, त्यावर असलेले मानव आणि प्राणी वाचले. हेच मजबूत जहाज आता तुर्कीमध्ये सापडल्याचा दावा कऱण्यात येत आहे. (Noah Ark)

पूर्व तुर्कीमध्ये असलेल्या द्रुपिनार नावाच्या ठिकाणी शास्त्रज्ञांना अशाच भव्य जहाजाची रचना सापडली आणि पुन्हा बायबलमधील नोहाच्या कथेचा अभ्यास करण्यात आला. या कथेनुसार महाप्रलयानंतर नोहाचे जहाज अरारत पर्वताच्या टेकड्यांवर थांबले. आता जी रचना सापडली आहे, ती रचना अंदाजे 538 फूट लांब आणि 13 फूट रुंद आहे. बायबलमध्ये नोहाचे जहाजही एवढेच असल्याचे सांगण्यात आले आहे. वास्तविक 1948 मध्येच ही रचना सापडली होती. त्यावेळी या भागात मोठा पाऊस झाला. सोबत भूकंपही झाला. त्यामुळे या भागात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य झाले. यावेळी एका मेंढपाळाची नजर या रचनेवर गेली. काहीतरी वेगळा आकार असल्याचे त्याच्या लक्षात आल्यावर त्यांनी या भागातील प्रमुखांना ही बातमी सांगितली. मग त्याचा अधिक शोध घेण्यात येऊ लागला. सुरुवातीला या रचनेवरील माती काढण्यात आली. मग ही रचना सामान्य नसल्याचा अंदाज आल्यावर येथे संशोधकांना बोलवण्यात आले. (International News)

=======

हे देखील वाचा : Train : रेल्वेच्या बोगी वेगवेगळ्या रंगाच्या का असतात?

Tourism : एक असा देश ज्याची लोकसंख्या आहे केवळ 800

=======

आधुनिक सामुग्री मागवण्यात आली. त्यानंतर रडारचीही मदत घेण्यात आली. त्या रडारच्या सहाय्यानं काढलेल्या फोटोमध्ये ही जहाजाची तीन मजली रचना असल्याचे स्पष्ट झाले. जमिनीपासून सहा मीटर खाली गाडलेल्या या रचनेचे फोटो समोर आल्यावर हे जहाज कधीचे आहे, याचा शोध कऱण्यात येऊ लागला. अमेरिकन संशोधक अँड्र्यू जोन्स आणि त्यांची टिम यासाठी या भागात काही वर्ष ठाण मांडून आहे. बोटीच्या लाकडाचे घन तुकडे अद्याप सापडले नसले तरी, शास्त्रज्ञांना काही रासायनिक अवशेष सापडले आहेत. शास्त्रज्ञ आता या रचनेचा अधिक सखोल अभ्यास करत या रचनेच्या आसपास ड्रिलिंग करुन लाकडाचे तुकडे काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा शोध केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच नाही तर धार्मिक दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वाचा मानला जात आहे. (Noah Ark)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.