राजस्थान रॉयल्सचा अनुभवी फिरकीपटूयु जवेंद्र चहलने विक्रम रचला आहे. चेन्नईचा माजी गोलंदाज ड्वेन ब्राव्होला मागे टाकत तो आयपीएल (IPL) मधील सर्वाधिक बळी मिळवणार गोलंदाज ठरला आहे. कोलकाताविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने या विक्रमाला गवसणी घातली. आपल्या फिरकीच्या जोरावर भल्याभल्या फलंदाजांना नाचवणाऱ्या चहलच्या नावापुढे ‘आयपीएल (IPL) मधील सर्वाधिक बळी मिळवणारा गोलंदाज’ हा सन्मान लागला आहे.
कोलकाता विरुद्धच्या सामन्यात चहलने कर्णधार नितीश राणाला बाद करत हा विक्रम आपल्या नावावर केला. या सामन्यात त्याने ४ षटकात २५ धावा देत ४ बळी आपल्या नावावर केले. त्याचबरोबर चालू हंगामातील सर्वाधिक बळी मिळवणारा गोलंदाज म्हणून तो पर्पल कॅपचा देखील मानकरी ठरला आहे. आयपीएलच्या (IPL) चालू हंगामात १२ सामने खेळत त्याने २१ बळी आपल्या नावावर केले आहेत. त्याच्याखालोखाल मोहम्मद शमी आणि रशीद खान यांनी प्रत्येकी १९ बळी मिळवले आहेत.
आयपीएलमध्ये (IPL) सर्वाधिक बळी मिळवण्याचा विक्रम याअगोदर ड्वेन ब्राव्हो याच्या नावावर होता. ब्राव्होने १६१ सामन्यात १८३ विकेट्स घेतल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्स कडून खेळणारा ब्राव्हो हा मुंबई इंडियन्स आणि गुजरात लायन्स या संघाचा देखील सदस्य होता. ब्राव्हो मागे टाकणाऱ्या यजुवेंद्र चहलच्या नावावर आता १८७ बळींची नोंद आहे. हा पराक्रम करण्यासाठी त्याला १४३ सामने खेळावे लागले. विशेष म्हणजे तो ब्राव्होपेक्षा १८ सामने कमी खेळला आहे. याअगोदर चहल बरीच वर्ष बंगळूरूचा सदस्य राहिलेला आहे. सुरुवातीच्या काळात तो मुंबई इंडियन्सचा देखील सदस्य होता.
आयपीएलमधील (IPL) सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजाबद्दल बोलायचं झाल्यास यजुवेंद्र चहल याचा पहिला क्रमांक लागतो. त्यापाठोपाठ ड्वेन ब्राव्होचा क्रमांक लागतो. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर भारताचा दिग्गज फिरकीपटू पियुष चावला आहे. त्याने १७६ सामने खेळत १७४ बळी आपल्या नावावर केले आहेत. चौथ्या आणि पाचव्या स्थानावर देखील भारतीय गोलंदाजांचा दबदबा बघायला मिळतो. भारताचा वरिष्ठ फिरकीपटू अमित मिश्राने १६० सामन्यात १७२ बळी मिळवत चौथ्या स्थानावर आपला हक्क सांगितला आहे तर रविचन्द्रन अश्विनने १९६ सामन्यांत १७१ बळी मिळवत पाचवे स्थान बळकावले आहे.
=======
हे देखील वाचा : द जयस्वाल शो… कोहलीकडून कौतुक!
======
तत्पूर्वी सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाताने २० षटकांत आठ गडी गमावून १४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने १३.१ षटकात १ गडी गमावत १५१ धावा करत सामना जिंकला. त्याच्यासाठी यशस्वी जैस्वालने ४७ चेंडूत नाबाद ९८ धावांची तुफानी खेळी केली. कर्णधार संजू सॅमसनने नाबाद ४८ धावा करत त्याला चांगली साथ दिली, दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी केली. संघाला एकच धक्का बसला तो जोस बटलरच्या रूपाने. दुसऱ्याच षटकात तो खाते न उघडता धावबाद झाला.