तुमच्या मुलाला वेड लागलं आहे. तुम्ही एका राक्षसाला जन्म दिला आहे. या राक्षसाचा मृत्यू कधी होईल, याची अवघ्या जगाला प्रतीक्षा आहे. अशा आशयाची एक चिठ्ठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आई वडिलांच्या (Putin Parents) थडग्यावर सापडली. नेमकी व्लादिमीर पुतिन यांच्या वाढदिवसाच्या आगोदर ही चिठ्ठी सापडली आणि सुरक्षा व्यवस्था सतर्क झाली. पुतिन यांच्या आई-वडिलांना दफन केले आहे, त्या ठिकाणी एक कागद तेथील सुरक्षा व्यवस्थकाला मिळाला. या घडी केलेल्या कागदातील मजकूर वाचून तो घाबरला. थेट पुतिन यांच्या मृत्यूचे साकडे यात घालण्यात आले होते. त्यानं तो कागद सुरक्षा यंत्रणांकडे सोपवला. तेथून तपास सुरु झाला आणि पुतिन यांच्या आई-वडिलांच्या (Putin Parents) थडग्याजवळ घुटमळणा-या महिलेचे फोटो कॅमे-यातून काढण्यात आले. लगेच हालचाली सुरु झाल्या या महिलेला अटकही झाली आणि आता तिला मास्को न्यायालयानं दोन वर्षासाठी तुरुंगवासाची शिक्षा दिली आहे. या घटनेमुळे सर्वसामान्यांच्या मनात पुतिन यांच्याबाबत काय भावना आहेत, हे स्पष्ट झाले आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबाबत युक्रेन युद्ध सुरु झाल्यापासून काही प्रमाणात रशियामध्ये नाराजी पसरली आहे. त्याचाच परिणाम म्हणून एका 60 वर्षीय महिलेला तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. व्लादिमीर पुतिन यांच्या आई-वडिलांच्या थडग्यावर या महिलेनं द्वेषपूर्ण चिठ्ठी लिहून टाकली होती. त्यामुळे या महिलेवर पुतिन यांच्या कुटुंबियांचा अपमान केल्याचा आरोप ठेवण्यात आला. मास्को न्यायालयाने सेंट पीटर्सबर्ग येथील या महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ऑक्टोबरमध्ये झालेल्या या घटनेमुळे रशियामध्ये खळबळ उडाली होती. (Putin Parents)
इरिना सिबानेवा नावाच्या या 60 वर्षीय महिलेने पुतिनच्या आई-वडिलांच्या (Putin Parents) थडग्याजवळ एक चिठ्ठी लिहून टाकली होती. त्यात एका राक्षसाला आणि खुन्याला तुम्ही जन्म दिला आहे. तुम्ही एका वेड्याचे पालक आहात. पुतिन जगासाठी संकट निर्माण करत आहेत, तुम्ही त्यांना तुमच्याकडे बोलावा. पुतिन मरण पावावेत, अशी संपूर्ण जग प्रार्थना करत असल्याचे लिहिले होते. आरोप सिद्ध झाल्यावर इरिना सिबानेवा यांना कोर्टात आपली बाजूही मांडली. त्यात युद्धाच्या बातम्या पाहून मी घाबरले. माझी भीती इतकी वाढली होती की मला ते थांबवता येत नव्हते. त्या भीतीपोटीच मी ही चिठ्ठी लिहिली. मला कोणालाही दुखवायचे नव्हते, असे स्पष्ट करत इरिनानं कोर्टाची माफीही मागितली. पण याचा काहीही परिणाम झाला नाही. व्लादिमीर पुतिन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांच्या आई-वडिलांचा (Putin Parents) आणि समस्त कुटुंबियांचा हा अपमान असल्याचे मत कोर्टानं यावर नोंदवलं आणि इरिनाला शिक्षा सुनावली.
ही घटना झाल्यानंतर अगदी दोन दिवसानं रशियाच्या लष्करी न्यायालयाने निकिता तुष्कानोव्ह या इतिहासाच्या शिक्षकाला साडेपाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. गेल्या वर्षी क्रिमियातील केर्च ब्रिजवर युक्रेननं हल्ला केला होता. या हल्ल्याचे निकिता यांनी जाहीर समर्थन केले होते. हा लष्कराचा अपमान असल्याचे मानले गेले. त्यानंतर न्यायालयाने निकिता यांना लष्कराचा अपमान आणि हिंसाचाराचे समर्थन केल्याबद्दल दोषी ठरवले. इतिहास शिक्षिका असलेल्या निकिता तुष्कानोव्ह यांनी क्रचवरील हल्ल्याला पुतिनसाठी वाढदिवसाची भेट असल्याचा उल्लेख सोशल मिडियामध्ये केला होता.
=======
हे देखील वाचा : लव्हर बॉय इम्रान खान
=======
पुतिन यांच्याबाबत अशा घटना रशियामध्ये वारंवार घडत आहेत. रशियानं केलेल्या युक्रेनवरील हल्ल्याला रशियन नागरिकही विरोध करत आहेत. 24 फेब्रुवारी 2022 रोजी, रशियाने युक्रेनवर आक्रमण केले. प्रत्युत्तरादाखल, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनीही त्याला तोंड दिले. रशियाच्या मानानं अगदी छोट्या असलेल्या युक्रेननं गेल्या वर्षभर रशियाचे आक्रमण सहन केले आहे आणि वेळप्रसंगी रशियन सैन्याला चोख उत्तरही दिले आहे. मात्र आता या युद्धाला रशियाचे नागरिकही कंटाळल्याची परिस्थिती आहे. रशियन सैन्यामध्ये भरती होण्यासाठीही युवक उत्सुक नाहीत. त्यांना धाक किंवा आमिष दाखवून रशियन सैन्यात भरती करण्यात येत आहे. या युद्धामुळे दोन्ही देशांमध्ये प्रचंड प्रमाणात मनुष्य हानीही झाली आहे. त्यामुळेच आता नागरिकही या युद्धाचा विरोध करीत आहेत.
सई बने