काहीजण ‘उंटावरचे शहाणे’ असतात मात्र रामदेवबाबा यांनी स्वतःचे वेगळेपण सिद्ध करण्यासाठी ‘हत्तीवरचे शहाणे’ होण्याचे ठरविले आहे काय?
डॉक्टरांबद्दल अपशब्द, ॲलोपॅथीला विरोध… की प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट??
– श्रीकांत ना. कुलकर्णी
गेल्या काही दिवसापासून योगगुरू रामदेव बाबा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. देशात आणि साऱ्या जगातच सध्या थैमान घातलेल्या कोरोना महामारीच्या संदर्भात रामदेव बाबा यांनी ‘ॲलोपॅथीच्या’ उपचारांनाच आव्हान दिले आहे. आपल्या दैनंदिन शिबिरात योग शिकविता शिकविता अखंड बडबड करणाऱ्या रामदेव बाबांनी ॲलोपॅथीच्या औषधांनाच आक्षेप घेतला आहे. असल्या औषधांनी कोरोना कधीच बरा होणार नाही असे सांगताना त्यांनी आयुर्वेदिक औषधांची (म्हणजे त्यांनी स्वतःच तयार केलेल्या) भलामण केली आहे. गेल्या काही वर्षात रामदेव बाबांनी ‘योग’ शिकविता शिकविता स्वदेशीचा मूलमंत्र जपत आपला ‘एक डोळा’ त्याच्या ‘बाजारीकरणाच्या’ फायद्यावर कसा ठेवला हे सांगायची आता आवश्यकता नाही.

योग आणि आयुर्वेदाच्या प्रसारासाठी त्यांनी बघता बघता स्वतःचे ‘दुकान’ उघडले आणि त्याद्वारे आता ‘मीठा’ पासून ‘आट्या’ पर्यंत सारे पदार्थ विक्रीसाठी ठेवले आहेत. देशातील अनेक शहरात उभारण्यात आलेल्या ‘पतंजली मॉल’ मार्फत या पदार्थांची विक्री केली जाते. गेल्यावर्षीच त्यांनी कोरोनावर हमखास उपाय म्हणून ‘कोरोनील’ नावाच्या गोळ्या बाजारात आणल्या होत्या. मात्र त्या औषधाला केंद्रीय आरोग्य खात्यानेच चाचणीअंती अधिकृत परवानगी न दिल्यामुळे रामदेवबाबांचा भ्रमनिरास झाला. तरीही या गोळ्या अजून बाजारात विकल्या जात आहेतच. अर्थात त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही ही गोष्ट वेगळी.
रामदेवबाबांनी (Ramdev Baba) घेतलेल्या ‘ॲलोपॅथी औषधांच्या’ आक्षेपांना साहजिकच इंडियन मेडिकल असोसिएशनने (इमा) तीव्र हरकत घेतली आहे. रामदेवबाबांविरूद्ध एक हजार कोटींचा दावा करताना ‘इमा’ने त्यांच्याविरूद्ध राजद्रोहाचा खटला भरण्याची आणि त्यांना अटक करण्याचीही मागणी केली आहे. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी विचारणा करताच त्यांनी आपण ‘ते’ विधान मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. मात्र त्याचबरोबर दुसरीकडे रामदेवबाबांनी योग शिकविता शिकविताच आडवे होत “मला अटक करायची कोणाच्या बापाची हिम्मत आहे?” अशा शब्दात ‘इमा’ला आव्हान दिले आहे. रामदेवबाबांचे देशाच्या ‘प्रधान सेवकांशी’ असलेले सख्य लक्षात घेता त्यांचे हे म्हणणे बरोबरच आहे. रामदेवबाबांवर लगेच कारवाई होण्याची शक्यता फारच कमी आहे.

त्यामुळेच शेफ़ारलेल्या रामदेवबाबांनी आपली ‘ॲलोपॅथीविरुद्धची मोहीम’ चालूच ठेवली आहे. ॲलोपॅथी म्हणजे ‘मूर्ख विज्ञान’ आहे असे सांगताना रामदेवबाबा यांनी, ॲलोपॅथीच्या उपचारांनाच आव्हान दिले आहे. ॲलोपॅथीवर टीका करतांना त्यांनी कोरोनावरील उपचारासाठी वापरलेली औषधे कशी कुचकामी ठरली व त्यामुळे हजारो रुग्णांचे कसे बळी गेले त्याचा पाढा वाचला आहे. पुढे जाऊन रामदेव बाबांनी प्रश्न केला, “ज्या डॉक्टरांनी वॅक्सिनचे दोन्ही डोस घेतले होते आशा 1000च्या वर डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
जर डॉक्टरांचाच कोरोनामुळे मृत्यू होत असेल तर अशी डॉक्टरी काय कामाची…?” जगभरात कोरोनाच्या उपचारबाबत संशोधन चालू आहे. आजही WHO, ICMR ज्याप्रमाणे गाईडलाईन्स देतील त्याप्रमाणे उपचारात बदल करावा लागत आहे. मूठभर अपवाद वगळता जगभरातील डॉक्टर्स स्वतःचा, परिवाराचा जीव धोक्यात घालून कोरोना पेशंटची सेवा करीत आहेत. जगभरातून डॉक्टर्स, नर्सेस, हेल्थवर्कर्सवर कौतुकाचा वर्षाव होत असताना रामदेव बाबांची ही वक्तव्य कितपत योग्य आहेत असा सवाल समाजातून विचारला जात आहे.

थोडक्यात यानिमित्ताने आयुर्वेदाच्या प्रचारासाठी त्यांनीॲलोपॅथीच्या औषधांविरुद्ध जाणीवपूर्वक मोहीम उघडलेली दिसते. रामदेवबाबांच्या अशा विधानांचा तीव्र निषेध करताना इंडियन डॉक्टर्स फेडरेशनने एक जून रोजी संपूर्ण देशात ‘काळा दिवस’ पाळायचं ठरवलं आहे. रामदेवबाबांच्या ॲलोपॅथीविरुद्धच्या अपप्रचाराला वेळीच आवर घालावा अशी मागणीही डॉक्टर्स फेडरेशनने केली आहे.
रामदेवबाबांच्या या ‘उठाठेवी’बद्दल बिहार प्रदेश भाजपचे अध्यक्ष संजय जयस्वाल यांनीही त्यांना खडे बोल सुनावले आहेत. रामदेवबाबा ‘योगा’ मध्ये निश्चितच पारंगत आहेत परंतु त्यांनी ‘योगा’चा ‘कोकाकोला’ सारखा ‘स्वस्त प्रसार’ केला. तसेच एक ‘योगी’ म्हणून त्यांच्यात खूप उणीवा आहेत असे संजय जयस्वाल यांनी म्हटले आहे. थोडक्यात रामदेवबाबा हे फक्त योगगुरू आहेत, ‘योगी’ नाहीत असे जयस्वाल यांचे स्पष्ट म्हणणे आहे. भाजपचे नेते असलेले जयस्वाल हे स्वतः उत्तम डॉक्टर आहेत. मात्र रामदेवबाबा यांच्यासारख्या वाचाळवीरांकडे ‘इमा’ने दुर्लक्षच करावे असाही सल्ला त्यांनी दिला आहे.
तसे पाहता रामदेवबाबा हे ‘योगी’ नाहीत हे यापूर्वीही सिद्ध झाले आहे. काही वर्षांपूर्वी नवी दिल्लीत अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन चालू असताना या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेलेले रामदेवबाबा व्यासपीठावर असतानाच पोलिसांनी लाठीमार व अटकसत्र सुरु केले. त्यावेळी हेच रामदेवबाबा एका महिलेची ओढणी (दुपट्टा) घेऊन त्याच्या सहाय्याने आपले तोंड झाकून तेथून पळून गेले होते. एखादा खराच ‘योगी’ पुरूष असता तर त्यांच्यावर अशी पाळी आली नसती. अशा प्रसंगाला त्यांनी धीराने तोंड दिले असते.

‘योगा’च्या प्रसाराबरोबरच रामदेवबाबांनी स्वतःची आणि स्वतःच्या संस्थांची इतकी प्रसिद्धी आणि मार्केटिंग करून घेतले की त्यांच्या हरिद्वार येथील ‘पतंजली योगविद्यापीठ’ आणि ‘पतंजली आयुर्वेद लि.’ या संस्था अल्पावधीतच भरभराटीला आल्या. देशात ठिकठिकाणी सशुल्क योगशिबिरे आयोजित करणे आणि त्यामध्ये ‘पतंजली’ने उत्पादित केलेल्या मालाचा प्रसार करणे या दोन गोष्टींमुळे त्यांची आर्थिक भरभराटही खुप लवकर झाली. योगप्रसारासाठी त्यांनी स्वतःचे ‘आस्था’ हे चॅनेल सुरू केले. रामदेवबाबांना तसा प्रसिद्धीचा खूप हव्यास दिसतो.
त्यासाठी ते वेगवेगळ्या तंत्रांचा अवलंब करताना दिसून येतात. ‘इंडियन आयडॉल’, ‘कपिल शर्मा शो’ यासारख्या रिऍलिटी शो मध्ये देखील ते बिनधास्तपणे सहभागी होतात. एका रिऍलिटी शो मध्ये ते कुस्तीही खेळले आहेत. मध्यंतरी त्यांनी हत्तीवर बसून योगासने करण्याचा प्रयोग केला होता. अर्थात तो यशस्वी झाला नाही कारण तसा प्रयोग करणे त्या हत्तीलाच आवडले नसावे त्यामुळे त्या हत्तीनेच त्यांना आपल्या पाठीवरून सरळ खाली फेकून देऊन शीर्षासन करण्यास भाग पाडले. काहीजण ‘उंटावरचे शहाणे’ असतात मात्र रामदेवबाबा यांनी स्वतःचे वेगळेपण सिद्ध करण्यासाठी ‘हत्तीवरचे शहाणे’ होण्याचे ठरविलेले दिसते. त्यामुळेच त्यांचा हा ‘स्टंटबाजी’चा प्रयोग फसला असावा.
कदाचित रामदेवबाबांची ॲलोपॅथीविरुद्धची (Allopathy) वादग्रस्त विधाने हे देखील ‘प्रसिद्धीसाठी केलेला स्टंटही’ असू शकतो. त्याचबरोबर आपला माल खपावा हाही त्यामागे एक प्रमुख उद्देश असू शकतो. आपल्याविरूद्ध देशातील सर्व ॲलोपॅथी डॉक्टरांनी तक्रार केली तरीही काहीच कारवाई होणार नाही याची त्यांना खात्री आहे. त्यामुळे रामदेव बाबांचे हे प्रकरण म्हणजे चहाच्या पेल्यातील वादळच ठरण्याची शक्यता आहे. कारण आपल्या योगशिबिरात राजकीय नेत्यांना आवर्जून बोलावून त्यांना आपल्या ‘पाया’ पडायला लावणारे रामदेवबाबा पक्के ‘राजकारणी’ आहेत. त्यामुळेच त्यांना ‘योगगुरू’ म्हणण्याऐवजी ‘योगबाजारी’ म्हणणे अधिक संयुक्तिक ठरणार आहे.
-श्रीकांत ना. कुलकर्णी
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
—–
हे देखील वाचा: अॅलोपॅथीविरोधात रामदेवबाबांची शस्त्रे म्यान!
—–