नाताळ म्हटल्यावर सर्वांच्या समोर येते ती मोठी सुट्टी आणि गोवा ट्रिप. गोव्यामध्ये नाताळचं सेलिब्रेशन करण्याची मजा काही वेगळीच असते. गोव्याचा समुद्रकिनारा आणि निसर्गसौंदर्य अनुभवत नाताळ साजरा करण्याचं स्वप्न अनेकजण बघत असतात.
मुंबई, पुणे यासारख्या महानगरांमध्येही नाताळच्या सणाचं वेगळेपण जपणारी काही ठिकाणं आहेत, ज्यांचा स्वतःचा असा स्वतंत्र इतिहास आहे. मुंबईमध्ये तुम्हाला गोव्याच्या वातावरणाचा आनंद घ्यायचा असेल तर हक्काचे ठिकाण आहे. विशेष म्हणजे या ठिकाणाला दीडशेहून अधिक काळाचा इतिहास आहे. हे ठिकाण म्हणजे आपल्या ‘मराठमोळ्या’ गिरगावातील ‘खोताची वाडी’. मराठी आणि ख्रिस्ती संस्कृतीचे मिश्रण पाहायचे असेल, तर खोताच्या वाडीला आवर्जून भेट द्या.
असे म्हणतात की, दादोबा वामन खोत हे या वाडीचे मूळ मालक. अठराव्या शतकातील गोष्ट असेल, त्यांनी इथली जमीन विकत घेतली आणि मग ती जागा ईस्ट इंडिअन्सना विकल्या. इथे इंडो पोर्तुगीज शैलीमध्ये बांधलेले अनेक बंगले तुम्हाला दिसतील. पूर्वी अशा पद्धतीचे इथे तब्बल ६५ बंगले होते, पण आता मात्र असे वीस ते पंचवीस बंगले शिल्लक आहेत. या बंगल्यांकडे बघताना तुम्हाला नक्की असे वाटेल की, आपण मुंबईमध्ये नाही, तर चक्क गोव्यात आलो आहोत.
याच खोताच्या वाडीमध्ये ‘जेम्स परेरा’ यांचा बंगला दिमाखात उभा आहे. तब्बल दोनशे वर्ष जुना असलेला बंगला अगदी आवर्जून पाहायला हवा. या बंगल्याचे वैशिष्टय म्हणजे, त्यांच्या बंगल्यात संपूर्ण खोताच्या वाडीचा नकाशा आहे.
हे ही वाचा: भारतातील ‘या’ ५ मंदिरांमध्ये पुरुषांना प्रवेश नाही
जेम्स परेरा हे सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर आहेत. डिसेंबरमध्ये नाताळनिमित्त ही खोताची वाडी, तेथील बंगले आणि चर्च सुद्धा सजलेले असतात. या चर्च संदर्भात एक गोष्ट अशी सांगितली जाते की, जेव्हा अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात मुंबईत प्लेगची साथ आली होती. त्यातून सर्वांचे रक्षण व्हावे, अशी प्रार्थना केली गेली आणि मग येथील लोकांचे रक्षण झाल्याने हे च्यापल बांधले गेले .
या खोताची वाडीला जागतिक वारसा अर्थात ‘हेरिटेज’ दर्जा लाभला आहे. यामुळे या ठिकाणाचे परदेशी पर्यटकांना विशेष आकर्षण आहे. त्यामुळे मुंबईमधील पर्यटन स्थळांमध्ये ‘खोताची वाडी’ या ठिकाणालाही इतर ठिकाणांइतकेच महत्व आहे.
हे ही वाचा: गणपती बाप्पा मोरया! गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, लाडक्या बाप्पाची जगातली सर्वात उंच मुर्ती कुठे आहे
जसा गोव्याच्या झगमगाटात इथला नाताळ झाकोळला गेला आहे, तसंच मुंबईमधील इतर प्रेक्षणीय स्थळांच्या मांदियाळीमध्ये ‘खोताची वाडी’ काहीशी दुर्लक्षित झाली आहे. परंतु, ज्यांना खोताची वाडीने जपलेला ऐतिहासिक वारसा माहिती आहे, ते नाताळच्या काळात इथे आवर्जून भेट देतात. या दिवसात ‘खोताची वाडी’ म्हणजे पर्यटकांसाठी मोठं आकर्षण असतं.
नाताळच्या निमित्ताने इथे रोषणाई केली जाते आणि मुख्य म्हणजे इथे सांताक्लॉज सुद्धा येतो. तेव्हा नाताळचा सण साजरा करायला गोव्यात जायची गरज नाही, आपल्या मुंबईतल्या ‘खोताच्या वाडीत’ जाऊनही तितकाच उत्साही सण साजरा करता येईल.
– गणेश आचवल