पुरीमध्ये भगवान जगन्नाथांची यात्रा आता अवघ्या दोन दिवसांवर आली आहे. या रथयात्रेसाठी तीन रथ तयार करण्यात आले आहेत. भगवान जगन्नाथांचा नंदीघोष रथ. भाऊ बलभद्र यांचा तलध्वज आणि बहिण सुभद्रेचा दर्पदलन रथ तयार झाला आहे. यात फक्त भगवान जगन्नाथांना विराजमान करण्याचा अवधी आहे. या रथयात्रेसाठी जगभरातून लाखो भाविक या पुरी नगरीमध्ये दाखल झाले आहेत. भगवान जगन्नाथांच्या मंदिराबाबत अनेक रहस्य सांगितली जातात. (Jagannath Temple)
तशीच रहस्य त्यांच्या रथयात्रेबाबतही आहेत. त्यातील एक रहस्य म्हणजे, रथयात्रेदरम्यान, भगवान जगन्नाथांचा रथ एका मुस्लिम भक्ताच्या कबरीसमोर थांबतो. सालबेग असे या भगवान जगन्नाथांच्या भक्ताचे नाव आहे. दरवर्षी रथयात्रा निघाल्यावर या कबरीसमोर भगवान थांबतात, आणि आपल्या भक्ताला दर्शन देतात, अशी मान्यता आहे. पुरीमध्ये जगप्रसिद्ध जगन्नाथांची रथयात्रा आता अवघ्या काही तासात सुरु होणार आहे. परंपरेनुसार या रथयात्रेमध्ये भगवान जगन्नाथ आणि त्यांचे भाऊ, बलभद्र, बहिण सुभद्रा यांचे रथ सामिल असतील. या तीन रथांसह चालू झालेली रथयात्रा पुरीच्या ग्रँट रोडवरून जाईल आणि सालबेगच्या कबरीसमोर काही काळ थांबली जाईल. थोड्यावेळानंतर भगवान जगन्नाथांच्या नावाचा जयघोष करत पुन्हा ही यात्रा सुरु होईल. धर्मानं मुस्लिम असलेला सालबेग हा भगवान जगन्नाथ यांचा भक्त होता. (Social News)
सालबेगनं भगवान जगन्नाथांची अनेक भजनंही लिहिली आहेत. सालबेगच्या आधी पुरीतील श्री जगन्नाथ मंदिरात फक्त संस्कृत श्लोकांचे पठण केले जात होते. मात्र सालबेगनं भगवान जगन्नाथांवर स्थानिक उडिया भाषेमध्ये अनेक भजनं लिहिली. उडिया भाषेतील ही भजनं सर्वसामान्य लोकांपर्यंत लगेच पोहचली आणि त्यांचे गायन होऊ लागले. या भजनांमध्ये, गोपी, ब्रज संस्कृती आणि कृष्णाच्या महिमांचे वर्णन करण्यात आले आहे. ‘वत्सला’ या नावाने लोकप्रिय असलेल्या या भजनांमध्ये भगवान कृष्णांच्या बाललिलांचे वर्णन सालबेगनं केलं आहे. भगवान जगन्नाथ भक्तीची कथा पुरीमध्ये सर्वत्र सांगितली जाते. त्यानुसार जहांगीरच्या कारकिर्दीत, लालबेग नावाचा एक मुघल गव्हर्नर ओरिसाच्या दौ-यासाठी आला होता. तिथे त्याचे एका ब्राह्मण महिलेवर प्रेम जडले. त्यानं या महिलेबरोबर लग्नही केलं. हिंदू-मुस्लिम आई-वडिल असलेल्या सालबेगला लहानपणापासूनच भगवान श्रीकृष्णाची ओढ होती. (Jagannath Temple)
वडिलांनी त्याला सैन्यात दाखल करुन घेतले. एका युद्धात तो गंभीर जखमी झाला. त्याच्या जीवाची आशा नव्हती, अशावेळी त्याच्या आईनं त्याला भगवान जगन्नाथांचा नामजप कऱण्यास सांगितले. त्यानंतर सालबेगची तब्बेत ठणठणीत झाली आणि त्यानं आपलं अवघं आयुष्य भगवान जगन्नाथांच्या चरणी समर्पित केलं. सालबेगला कायम भगवान जगन्नाथांचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याची इच्छा होती. मात्र तो मुस्लिम असल्यानं त्याला कधीही जगन्नाथ मंदिरात प्रवेश मिळाला नाही. अशावेळी सालबेग कृष्णभक्तीमध्ये तल्लीन होण्यासाठी वृंदावनमध्ये गेला. तिथे त्याला भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेसाठी एक साधुंचा गट जाणार असल्याचे कळले. या गटासोबत सालबेगही भगवान जगन्नाथांचे दर्शन घेण्यासाठी पुरीला येण्यासाठी निघाला. मात्र वाटेतच तो आजारी झाला आणि त्याला त्याच ठिकाणी काही काळ थांबावे लागले. इकडे जगन्नाथ रथयात्रा निघाली, आणि रस्त्यातच एका ठिकाणी यात्रा थांबली. (Social News)
=============
हे ही वाचा :
Odisha : भगवान जगन्नाथाचे रहस्यमयी स्वयंपाकघर !
==============
भगवान जगन्नाथांचा रथ काही केल्या हलला नाही. यासाठी हत्ती, घोडेही वापरण्यात आले. मात्र रथ जागचा हलला नाही. शेवटी काही दिवसांनी सालबेग ठिक झाला आणि या जागी येऊन उभा राहिला. त्यानं भगवान जगन्नाथांचे दर्शन घेतल्यावर रथयात्रा पूर्ववत सुरु झाली. हा देवाचा चमत्कार बघून सर्वांनी भगवान जगन्नाथांना वंदन केले. पुढे ज्या जागी सालबेगला भगवान जगन्नाथांचे दर्शन झाले, तिथेच बसून तो भगवान जगन्नाथांची भजनं गाऊ लागला. त्याचे निधन झाल्यावर त्या जागी त्याची कबर उभारण्यात आली. तेव्हापासून दरवर्षी या कबरीसमोर भगवान जगन्नाथांची रथयात्रा काही काळ थांबते. 17 शतकातील कवी सालबेगच्या भक्तीची ही कथा आजही पुरीमध्ये सांगितली जाते. आजही मंदिरापासून सुमारे 200 मीटर अंतर पार केल्यानंतर भगवानांचा रथ सालबेगच्या कबरीजवळ थांबतो. या सालबेगनं लिहिलेली भजनं रथयात्रेत भक्तीभावानं गायली जातात. (Jagannath Temple)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics