जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी 23 सप्टेंबर रोजी महाराजा हरिसिंग यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असेल असे जाहीर केले आणि त्याबरोबर शेवटचे डोगरा शासक ठरलेल्या महाराजा हरिसिंग यांच्याबाबत चर्चा सुरु झाली. या निर्णयामुळे जम्मू काश्मीरमधील राजकीय वातावरण पुन्हा तापू लागले असले तरी या निर्णयामुळे जम्मू काश्मीरमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती झाल्याची प्रतिक्रीया व्यक्त होत आहे.
2019 मध्ये जम्मू आणि काश्मीरमधून 370 कलम हटवण्यात आले. त्यानंतर घेतलेला हा आणखी एक महत्त्वाचा निर्णय मानण्यात येतो. शेवटेचे डोगरा शासक आणि जम्मू काश्मीरचे महाराजा हरिसिंग यांची कारकीर्द नेमकी कशी होती हे जाणण्यासारखे आहे.

जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी एका कार्यक्रमात महाराजा हरिसिंग यांनी केलेल्या योगदानाची माहिती देत त्यांच्या जन्मदिनी, म्हणजेच 23 सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. आता दरवर्षी 23 सप्टेंबर रोजी जम्मू काश्मीरमध्ये सार्वजनिक सुट्टी असेल आणि तेव्हा महाराजा हरिसिंग यांनी केलेल्या कार्याची माहिती युवा पिढीला देण्यात येणार आहे. हा निर्णय महत्त्वाचा ठरला आहे.
युवा राजपूत सभा, ट्रान्सपोर्ट युनियनसह अनेक संघटनांनी या निर्णयाचे स्वागत करुन, महाराजा हरिसिंग हे एक महान शिक्षणतज्ज्ञ, पुरोगामी विचारवंत, समाजसुधारक होते. त्यांना वंदन करण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. एवढेच नाही तर, महाराजा हरिसिंग यांचे पुत्र आणि माजी केंद्रीय मंत्री करण सिंग यांनीही सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

शेवटचे डोगरा शासक महाराजा हरिसिंग यांच्या जयंतीनिमित्त सरकारी सुट्टी जाहीर केल्याची बातमी आल्यावर परिसरात जल्लोष करण्यात आला. अगदी ढोल ताशांच्या गजरात नागरिकांनी महाराज हरिसिंग यांच्या पुतळ्याजवळ जमून आनंद व्यक्त केला.
या सर्वांमुळे महाराजा हरिसिंग यांच्याबाबत सोशल मिडीयावरही उत्सुकता निर्माण झाली आहे. आत्तापर्यंत फक्त जम्मू काश्मीरचे शेवटेचे महाराजा अशीच त्यांची ओळख सांगण्यात येत होती. मात्र महाराजा हरिसिंग हे सुधारवादी विचारसरणीचे होते. त्यांनी आधुनिक शिक्षण प्रणालीचा प्रचार केला होता. तसेच शाळांचीही स्थापना केली होती.
महाराज हरिसिंग हे जम्मू आणि काश्मीर संस्थानातील शेवटचे शासक ठरले. महाराजा हरिसिंग यांच्या वडिलांचे नाव अमरसिंह आणि आईचे नाव भोटियाली छिब होते. त्यांना जम्मू आणि काश्मीरच्या गादीचा वारसा त्यांचे काका महाराज प्रताप सिंग यांच्याकडून मिळाला. हरिसिंग यांचेच पुत्र म्हणजे माजी केंद्रीय मंत्री करण सिंग.
==========
हे देखील वाचा : मोबाईल बँकिंगचा वापर करत असाल तर व्हा सावध! वेगाने पसरतोय ‘हा’ वायरस
==========
हरिसिंग यांनी जम्मू राज्याला एकसंघ ठेवले. जम्मू राज्याला 1947 पर्यंत स्वायत्तता आणि अंतर्गत सार्वभौमत्व लाभले. बहुसांस्कृतिक आणि बहु-धार्मिकच असलेल्या या राज्यात हरिसिंग यांच्या प्रशासनाचे कसब खूप महत्त्वाचे होते. त्यांची लष्करी ताकदही मोठी होती. त्याकाळी हरिसिंग यांचे चलनही स्वतंत्र होते.
राजपरिवाराच्या शिस्तीत वाढलेल्या हरिसिंग यांचे शिक्षण अजमेरच्या मेयो कॉलेजमध्ये झाले. काकांच्या मृत्यूनंतर, हरिसिंग 23 सप्टेंबर 1923 रोजी जम्मू-काश्मीरचे नवे महाराजा बनले. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले आणि बालविवाहास प्रतिबंध करणारा कायदा अस्तित्वात आणला. त्यावेळी या घटनेचा क्रांतीकारी घटना म्हणून उल्लेख झाला होता.
मुस्लिम लीग आणि त्यांच्या सदस्यांच्या जातीयवादी विचारांना त्यांनी उघडपणे विरोध केला. द्वितीय विश्वयुद्धादरम्यान 1944-1946 पर्यंत शाही युद्ध मंत्रिमंडळाचे ते सदस्य होते. 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर महाराजा हरिसिंग यांना जम्मू आणि काश्मीर हे स्वतंत्र राज्य म्हणून स्थापन करायचे होते. पृथ्वीवरील नंदनवन असा ते काश्मीरचा उल्लेख करीत. हे नंदनवन कायम स्वतंत्र हवे, अशी त्यांची इच्छा होती. मात्र पाकिस्तानी सैन्याच्या आक्रमणापासून आपले राज्य वाचवण्यासाठी त्यांनी आपले संस्थान भारतात विलीन करण्याचा निर्णय घेतला.

22 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीर राज्यावर सशस्त्र आक्रमण सुरू केले. पाकिस्तानी टोळ्यांनी काश्मीरमध्ये केलेल्या अत्याचाराच्या बातम्यांनी त्यांना धक्का बसला. हरिसिंग यांना पाकिस्तानी हल्ल्याची माहिती मिळेपर्यंत, लष्करांनी मुझफ्फराबाद आणि उरीच्या बाहेरील महत्त्वाचे शहर, श्रीनगरच्या राजधानीपासून जेमतेम 100 मैलांवर काबीज केले होते. शेवटी आपल्या संस्थानाचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी भारत सरकारकडे मदत मागितली आणि 26 ऑक्टोबर 1947 रोजी जम्मू-काश्मीर भारतात विलीन करण्याच्या कागदपत्रावर स्वाक्षरी केली. अशा प्रकारे त्यांचे जम्मू राज्य अखंड भारतात सामिल झाले. ही घटना जम्मू – काश्मीर आणि भारताच्या इतिहासातलीही मोठी घटना मानली जाते.
भारत सरकारने राजेशाही संपुष्टात आणल्यामुळे महाराजा हरिसिंह हे 1952 पर्यंत राज्याचे उपायुक्त महाराजा राहिले. त्यांनी आयुष्यातील शेवटचे क्षण त्यांच्या जम्मूतील हरी निवास या राजवाड्यात घालवले. 26 एप्रिल 1961 रोजी मुंबईत त्यांचे वयाच्या 65 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे अस्थिकलश जम्मूला आणून तवी नदीत वाहून नेण्यात आली.
महाराजा हरिसिंग यांना काश्मीरचा अभिमान होता. आपली संस्कृती आणि परंपरा कायम रहावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मध्यंतरीच्या काळात या महाराजाचीही ओळख जम्मू – काश्मीरमधून पुसून टाकण्याचा प्रयत्न झाला. मात्र आता नव्यानं महाराजा हरिसिंग यांची ओळख तरुण पिढीला करुन देण्यात येणार आहे.
– सई बने