Home » B.R. shetty : ज्यांनी १८ हजार कोटींची कंपनी ७४ रुपयांना विकली

B.R. shetty : ज्यांनी १८ हजार कोटींची कंपनी ७४ रुपयांना विकली

by Team Gajawaja
0 comment
B.R. shetty
Share

एक माणूस त्याच्या घरातून फक्त ६६५ रुपये घेऊन निघाला आणि एक दिवस त्याच्या नावावर प्रायवेट जेट, रोल्स रॉयस आणि बुर्ज खलीफा मधील दोन पूर्ण फ्लोअर असतात आणि अनेक कोटींची संपत्ति सुद्धा. ऐकायला काल्पनिक गोष्ट किंवा एखाद्याने पाहिलेलं हे स्वप्नं वाटत असलं तरी ही खरी स्टोरी आहे. बवागुथू रघूराम शेट्टी यांची. एक सामान्य भारतीय माणूस जो अरब देशात जाऊन करोडपती बनला. फॉर्ब्सच्या लिस्टमध्ये तो जगातील ४२ व्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला. पण एका ट्वीटमुळे त्यांनी उभं केलेलं साम्राज्य कोसळलं, जवळ जवळ १८ हजार कोटींची कंपनी त्यांना फक्त ७४ रुपयांना विकावी लागली. त्यांची करोडोंची संपत्ती सरळ शून्यावर आली, पण हे कसं झालं ? कोट्याधीश असणाऱ्या बी. आर. शेट्टी यांनी त्यांची १८ हजार कोटींची कंपनी ७४ रुपयांना का विकली ? हे जाणून घेऊ.  (B.R. shetty)

१९४२ साली कर्नाटक मधील उडपी येथे तुल्लू भाषिक कुटुंबात बी.आर. शेट्टींचा जन्म झाला. मध्यमवर्गीय कुटुंब त्यामुळे कष्टाने बी.आर. शेट्टींनी कन्नड मिडियम शाळा ते फार्मास्युटिकल्स असं शिक्षण घेतलं. त्यानंतर ७० च्या दशकात बी.आर. शेट्टींनी उडपीमध्ये एका फार्मास्युटिकल कंपनीचा डिस्ट्रीब्युटर म्हणून आपली करियरची सुरूवात केली. पण यावेळीच त्यांच्यावर त्यांच्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी आली. पण बहिणीच्या लग्नासाठी त्यांना पैसे जमवता आले नाही. मग शेट्टींनी बहिणीच्या लग्नासाठी एका बँकेकडून कर्ज घेण्याचा निर्णय घेतला. पण कर्ज फेडताना शेट्टींना नाकी नऊ आले. त्यांच्या असलेल्या पगारात हे कर्ज फेडणं कठीण जात होतं. म्हणून त्यांनी पैसे कमवण्यासाठी परदेशात जाऊन काम करण्याचा निर्णय घेतला.

७० आणि ८० च्या दशकातील तो काळ असा होता की तेव्हा बहुतेक भारतीय तरुण परदेशात नोकरी करण्यासाठी जात होते. तेव्हा शेट्टींकडे एवढे पैसे नव्हते की ते यूएस किंवा यूके सारख्या मोठ्या देशांमध्ये जाऊ शकतील, म्हणून शेट्टी यांनी गल्फ कंट्रीजमध्ये जाण्याचा विचार केला. युनायटेड अरब एमिरेट्स, हा नवीन देश तयार झाला होता आणि भारतातून अनेक लोक तिथे काम करण्यासाठी जायचे. म्हणूनच १९७३ साली शेट्टी यांनीही यूएईला जाण्याचा निर्णय घेतला. (Businessman)

त्यावेळी बी.आर. शेट्टी हे घरातून फक्त ६६५ रुपये घेऊन निघाले होते आणि यूएईला पोहचल्यानंतर त्यांची बॅग तिथे चोरीला गेली होती. कसे बसे त्यांनी दिवस काढले आणि नंतर त्यांना मेडिकल रिप्रेजेंटेटिव्ह म्हणून काम मिळालं. बी.आर. शेट्टी रोज यूएईच्या जळजळीत उन्हात औषधांनी भरलेली बॅग घेऊन फार्मसी आणि क्लिनिक्सच्या चकरा मारत असत. त्यांचा एक किस्सा म्हणजे तेव्हा त्यांच्याकडे एकच शर्ट होता. तो घामाने भिजलेला शर्ट घरी आल्यानंतर ते धुवायचे आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी तोच वापरायचे. अशाप्रकारे बी.आर. शेट्टीने खूप मेहनत केली आणि केवळ 2 वर्षांच्या आत त्यांच्यावर असलेले सर्व कर्ज फेडलं. (B.R. shetty)

त्यानंतर त्यांनी आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला, आणि मग १९७५ मध्ये शेट्टी यांनी दोन खोलींच्या अपार्टमेंटमध्ये एक क्लिनिक आणि फार्मसी सुरू केली, ज्याचं नाव त्यांनी एनएमसी म्हणजेच न्यू मेडिकल सेंटर ठेवलं. तिथली पहिली डॉक्टर होती, चंद्रा कुमारी शेट्टी, जी त्यांची पत्नीच होती. यानंतर त्यांचं नशीबच पालटलं. त्यांची एनएमसी ही लवकरच यूएईतील सर्वात मोठ्या हेल्थकेअर ग्रुपपैकी एक बनली. त्याच्या ऑपरेशन्समध्ये ४५ हून अधिक हॉस्पिटल्स सामील झाले आणि त्यात २००० हून अधिक डॉक्टर्स काम करू लागले. Of course, हे फक्त लक नाही, तर त्यांच्या महेनतीची सुद्धा कमाल होती.

बी.आर. शेट्टींच्या हेल्थकेअर व्यवसायाने झेप घेतल्यानंतर, त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात सुद्धा पाऊल टाकायचं ठरवलं. १९८० मध्ये त्यांनी यूएई एक्सचेंज नावाची मनी ट्रान्सफर आणि बिल पेमेंट करणारी कंपनी विकत घेतली. ही कंपनी मनी ट्रान्सफरवर खूप कमी शुल्क घेत होती, ज्यामुळे या कंपनीला यूएई मध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये खूप लोकप्रियता मिळाली. त्यांनी ३१ देशांमध्ये ८५० पेक्षा जास्त ब्रांचेस उघडून मनी रेमिटन्स क्षेत्रात आपलं वर्चस्व स्थापित केलं. त्यानंतर २००१ मध्ये शेट्टींनी एक्सप्रेस मनी नावाची एक मनी ट्रान्सफर सेवा सुरू केली, ज्याचं ऑफिस लंडनमध्ये होतं. २०१४ मध्ये शेट्टींनी एक आणखी मोठा करार केला, तो म्हणजे ब्रिटनमधील सर्वात मोठ्या फॉरेन एक्सचेंज कंपन्यांपैकी एक, ट्रॅव्हल एक्सला त्यांनी १ बिलियन पाउंड मध्ये विकत घेतलं. बी.आर. शेट्टी यांनी २०१८ पर्यंत अशा वेगवेगळ्या कंपन्या विकत घेऊन अबू धाबीमध्ये या सर्व कंपन्यांची एक मुख्य कंपनी तयार केली, ज्याचं नाव होतं फिनाब्लर.(Businessman)

हे सर्व होत असताना त्यांना अनेक पुरस्कारसुद्धा मिळाले. २००७ मध्ये त्यांना प्रवासी भारतीय सम्मान पुरस्कार मिळाला आणि २००९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. बी.आर. शेट्टींनी आपल्या आयुष्यात खूप काम केलं. अखेर, त्यांनी निवृत्त होऊन सामाजिक कार्य करण्याचा निर्णय घेतला आणि २०१८ मध्ये बिल गेट्स आणि वॉरेन बफे यांच्या “द गिविंग प्लेज” या commitment अंतर्गत भविष्यात आपली अर्धी संपत्ती दान करण्याचं वचन दिलं. निवृत्त होण्या आधी कंपनीची धुरा कोणाच्या तरी हाती सोपवावी लागणार होती. म्हणून त्यांनी केरळच्या दोन भावांना, प्रशांत मंगत आणि प्रमोद मंगत यांना आपल्या कंपन्यांची कमान सांभाळण्याची जबाबदारी दिली. या दोघांनी २००३ मध्ये शेट्टींसोबत काम करायला सुरुवात केली होती. प्रशांतने २०१२ मध्ये एनएमसी हेल्थला लंडन स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट करून आपलं कर्तुत्व सिद्ध केलं आणि प्रमोदने देखील मेहनत करून २०१९ मध्ये फिनाब्लरला लंडन स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट केलं. अशाप्रकारे, खूप कमी वेळात शेट्टींचा विश्वास जिंकून, त्यांच्या दोन्ही कंपन्यांचे ते सीईओ झाले. प्रशांत एनएमसीचा सीईओ बनला आणि प्रमोद यूएससी एक्सचेंजचा सीईओ. (B.R. shetty)

इथेपर्यंत सगळं सुरळीत चाललं होतं, मग आलं ते ट्वीट ज्यामुळे बी.आर. शेट्टींनी इतकी वर्ष उभारलेलं साम्राज्य कोसळलं. ऑगस्ट २०१९ मध्ये मडी वॉटर्स नावाच्या एका अमेरिकन रिसर्च कंपनीने क्विट केलं, मडी वॉटर्स ही एक शॉर्ट सेलर कंपनी होती, जी मोठमोठे अकाउंटिंग फ्रॉड उघड करण्यासाठी प्रसिद्ध होती. मडी वॉटर्सने आपल्या ट्वीटमध्ये नाव न घेता म्हटलं की, “एलएससीमध्ये लिस्टेड एका कंपनीत चालू असलेल्या घोटाळा आम्ही लवकरच उघड करू”, त्यावेळी मार्केट एक्सपर्ट्ंना हे कळालं की इथे एनएमसी कंपनीबद्दल बोललं जात आहे. यामुळे त्यांच्या कंपनीची स्टॉकची किंमत खाली जाऊ लागली. मात्र, त्या वेळी शेट्टी आणि त्यांच्या टीमने या आरोपांना पूर्णपणे नाकरलं. आणि डिसेंबर २०१९ मध्ये, मडी वॉटर्सने एक सखोल रिपोर्ट सादर केला, ज्यात त्यांनी दावा केला की, एनएमसी हेल्थ कंपनीवर जवळ जवळ ५४, हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. पण कंपनीने ते फक्त १७ हजार कोटी रुपये दाखवलं आहे. यानंतर बी.आर. शेट्टी आणि त्यांच्या कंपन्यांच्या विश्वसनीयतेवर आणि पारदर्शकतेवर प्रश्न उभे राहू लागले. (Businessman)

या रीपोर्टनंतर बी.आर. शेट्टी यांच्या कंपनीने स्वत: कबुल केलं की त्यांच्या कंपनीवर खरंच ५४ हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. एवढंच नाही, तर शेट्टींच्या फिनाब्लरवरही ८३० कोटींचं कर्ज होतं. त्यांच्या कंपनीतील हा गोंधळ जसा उघडकीस आला, तसं कंपनीतील उच्च पदस्थ अधिकार्यांमध्ये गोंधळ माजला. काहींनी स्वतःहून राजीनामा दिला आणि कित्येकांना कामावरून काढून टाकण्यात आलं. या घोट्याळयात शेट्टी आणि प्रशांत मंगतसह अनेक लोकांवर फसवणूक आणि फ्रॉडचे आरोप लावले गेले आणि त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली गेली. यूएईच्या सेंट्रल बँकेने शेट्टींचे अकाउंट्स फ्रीझ केले आणि त्यांच्या कंपन्यांच्या ऑपरेशन्सवर बंदी घालण्यात आली. (B.R. shetty)

त्यानंतर, बी.आर. शेट्टी भावाच्या तब्येतीचं कारण देऊन भारतात आले. त्यांची परिस्थिती इतकी वाईट झाली होती की, त्यांनी ४५ वर्षांत जे व्यावसायिक साम्राज्य उभं केलं होतं, ते फक्त ५ वर्षांत ढासळलं. शेट्टी पूर्णपणे बँकरपट होऊन गेले होते आणि आपल्या कर्जांची परतफेड करण्यासाठी त्यांनी आपल्या कंपन्या आणि मालमत्ता विकायला सुरुवात केली.

================

हे देखील वाचा : Maharashtra Budget : फडणवीस सरकार 2.0 ने महाराष्ट्राला काय दिलं ?

================

डिसेंबर २०२० मध्ये, त्यांनी फिनाब्लर जी १८ हजार कोटी रुपयांच्या किमतीची कंपनी होती, ती इज़राइलच्या प्रिज्म ग्रुप आणि यूएईच्या रॉयल स्ट्रेटेजिक पार्टनर यांनी एकत्र मिळून फक्त ७४ रुपयांना विकली. इतक्या वर्षांची त्यांची मेहनत, फक्त ६६५ रुपयांपासून उभारलेलं करोडोंचं साम्राज्य धुळीस मिळालं. पण हे कोणामुळे? त्यांच्या स्वत:मुळे की आणखी कोणामुळे? तर २०२० मध्ये, बी.आर. शेट्टी यांनी सीबीआय आणि ईडीला तक्रार केली होती की, मंगत ब्रदर्स आणि बँकर्स व ऑडिटर्सनी त्यांच्या कंपन्यांमध्ये अरबों डॉलरची हेराफेरी केली आहे. याशिवाय, बी.आर. शेट्टींनी न्यूयॉर्क सुप्रीम कोर्टात बँक ऑफ बडोदा आणि मंगत ब्रदर्सविरुद्ध 8 बिलियन डॉलरची केस दाखल केली होती. मात्र, जुलै २०२४ मध्ये न्यूयॉर्क कोर्टाने या केसाला डिसमिस करत सांगितलं की, त्यांना योग्य न्यायालयामध्ये जाऊन ही केस दाखल करावी लागेल. (B.R. shetty)

यात चूक कोणाची आहे हे सिद्ध झालं नाही आणि ते जगासमोर आलेलं नाही. पण या प्रकरणातून एक सिद्ध होतं की, इज्जत आणि पैसा कमावला इज्जत आणि पैसा कमावला तरी त्यावरचं नियंत्रण टिकवून ठेवणं खूप अवघड असतं. एका चुकीच्या पाऊलामुळे होत्याचं नव्हतं होऊ शकतं.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.