Home » कोण आहेत जस्टीस यू यू ललित? 

कोण आहेत जस्टीस यू यू ललित? 

by Team Gajawaja
0 comment
Justice Uday Lalit
Share

भारताचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून 27 ऑगस्ट रोजी उदय उमेश ललित (Uday Lalit) हे कार्यभार स्विकारणार आहेत. जस्टिस यू यू ललित म्हणून त्यांची ओळख आहे. हे जस्टिस ललित आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. न्यायमूर्ती यू यू ललित हे सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक ऐतिहासिक निकालांचा एक भाग आहेत. 2G स्पेक्ट्रम, तिहेरी तलाक, पद्मनाभस्वामी मंदिराचा कारभार अशा खटल्यांमध्ये जस्टीस ललित यांचा सहभाग होता.  (Justice Uday Lalit)

अभ्यासू आणि तेवढेच मितभाषी व्यक्तिमत्व अशी ओळख असलेले न्यायमूर्ती ललित 27 ऑगस्ट रोजी देशाचे सरन्यायाधीश होणार आहेत. प्रसिद्धीपासून दूर रहाणारे जस्टीस ललित सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील तो क्षण तमाम मराठीजनांसाठी अभिमानाचा असणार आहे. 10 ऑगस्ट 2022 रोजी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ललित यांच्या नियुक्तीला मान्यता दिली तेव्हापासून ते चर्चेत आले.  

न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1957 रोजी झाला. जून 1983 मध्ये त्यांनी वकील म्हणून काम सुरू केले आणि डिसेंबर 1985 पर्यंत मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली. त्यानंतर ललित दिल्लीला गेले. तिथे त्यांनी कायद्याचा अभ्यास सुरू केला आणि एप्रिल 2004 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ललित यांना वरिष्ठ वकील म्हणून नामांकित केले. यापूर्वी 2G स्पेक्ट्रम वाटप प्रकरणाच्या सुनावणीसाठी त्यांची केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) चे विशेष सरकारी वकील म्हणून ललित यांची नियुक्ती करण्यात आली होती. (Who is Justice Uday Lalit?)

13 ऑगस्ट 2014 रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.  या सर्व प्रवासात ललित यांच्या अभ्यासूवृत्तीचे मान्यवरांनी कौतुक केले आहे. त्यामागचे कारण म्हणजे त्यांचा अनुभव.  ललित यांनी 1986 ते 1992 पर्यंत, भारताचे माजी ऍटर्नी जनरल सोली सोराबजी यांच्यासोबत काम केले आहे. 

====

हे देखील वाचा – मनीष सिसोदिया यांच्या घरी CBI यांनी का छापेमारी केली? कोणत्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी सुरुयं तपास

====

29 एप्रिल 2004 रोजी ललित यांची सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त करण्यात आली.  कोर्टात त्यांच्या तयारीबाबत मान्यवर वृत्तपत्रांनीही कौतुक केले आहे. खटल्यांचा युक्तिवाद करताना ललित यांची तयारी, संयम आणि संयमशील वर्तन याचा कायम उल्लेख केलेला असायचा. या कालावधीत ललित यांनी अनेक हाय-प्रोफाइल गुन्हेगारी प्रकरणे हाताळली आहेत.  

ललिल यांचे नाव पहिल्यांदा चर्चेत आले ते 2G स्पेक्ट्रम प्रकरणात. 2011 मध्ये, न्यायमूर्ती जीएस सिंघवी आणि एके गांगुली यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 2G स्पेक्ट्रम प्रकरणांमध्ये केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) साठी विशेष सरकारी वकील म्हणून ललित यांची नियुक्ती केली. ही नियुक्ती करताना निष्पक्ष खटल्याच्या हितासाठी, ललित यांची नियुक्ती अत्यंत योग्य असल्याचा शेराही देण्यात आला होता. (Who is Justice Uday Lalit?)

2017 मध्ये, ललित हे तिहेरी तलाकच्या असंवैधानिक स्वरूपाविरुद्धच्या खटल्यातील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाचा भाग होते. तिहेरी तलाक बंदी हा ऐतिहासीक निर्णय मानला गेला. न्यायमूर्ती ललित यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने त्रावणकोरच्या तत्कालीन राजघराण्याला केरळमधील ऐतिहासिक श्री पद्मनाभस्वामी मंदिराचे व्यवस्थापन करण्याचे अधिकार दिले होते. हे सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे.  

ललित यांच्या खंडपीठाने ‘स्किन टू स्किन टच’ हा निकाल दिला होता. मुलाच्या शरीराच्या लैंगिक भागांना स्पर्श करणे किंवा ‘लैंगिक हेतूने’ शारीरिक संबंध असलेले कृत्य हे POCSO कायद्याच्या कलम 7 अंतर्गत ‘लैंगिक अत्याचार’ ठरेल, असे या निकालात म्हटले आहे. नुकतेच न्यायमूर्ती ललित यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने फरारी मद्यसम्राट विजय मल्ल्याला न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी चार महिन्यांचा तुरुंगवास आणि 2000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.  (Who is Justice Uday Lalit?)

न्यायमूर्ती ललित 27 ऑगस्ट रोजी सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील. सध्याचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण एक दिवस अगोदर म्हणजे 26 ऑगस्टला निवृत्त होणार आहेत. न्यायमूर्ती ललित यांचा हा कार्यकाळ तीन महिन्यांपेक्षा कमी असेल. 8 नोव्हेंबर रोजी ते वयाच्या 65 व्या वर्षी निवृत्त होणार आहेत.  CJI म्हणून, न्यायमूर्ती ललित कॉलेजियमचे प्रमुख असतील, ज्यात न्यायमूर्ती चंद्रचूड, न्यायमूर्ती कौल, न्यायमूर्ती नझीर आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांचा समावेश असेल. एकूण तमाम मराठी जनांसाठी हा अभिमानाचा क्षण असणार आहे.  

– सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.